एक अद्वितीय कलाकार - पं. रविशंकर
पं. रविशंकर - एक अद्वितीय कलाकार पं.रविशंकरांना प्रथम केंव्हा ऐकलं हे माझ्या चांगलंच लक्षात आहे. संगीतातील विद्यार्थीदशा एव्हाना सुरु झालेली होती. १९७७ डिसेंबर मध्ये पेरुगेटजवळील मुलांच्या भावेस्कूलच्या प्रांगणात कार्यक्रम झाला होता. रविजींनी प्रथम बिहाग, परमेश्वरी आणि सिंध भैरवी त्यांनी सादर केली होती. त्या कार्यक्रमाला नेहेमीप्रमाणेच भरगच्च गर्दी होती. पं. किशनमहाराज साथीला होते. हा कार्यक्रम लक्षात राहण्याचे अजून एक कारण म्हणजे पं. किशनमहाराजजींचा रुबाब ! पं. रविजींचा आलाप, जोड, झाला, होइपर्यंत पं. किशनमहाराजजी ग्रीनरूममध्येच होते. तबल्यावरील गत सुरु होताना पं. किशनमहाराजजी स्टेजवर दाखल झाले ! वीरासन घातलेले त्यांचे देखणे व्यक्तिमत्व, कपाळावर भला मोठा टीका असा त्यांचा थाट मात्र अजूनही नजरेसमोर आहे. पं. किशनमहाराजजींचे वादन लक्षात रहाण्याएवढी समज नव्हती. पण पं. रविशंकरांच्या वादनाने प्रचंड प्रभावित झालो आणि पुण्या-मुंबईमध्ये झालेले जवळजवळ सर्व कार्यक्रम झपाटून ऐकले. कधी तिकिट काढून, तर कोणाची ओळख काढून, तर कोणाचे शेपूट पकडून. पण प्रत्येकवेळी त्यांच्या वादनातील रंग काही औरच ह...