कलाकाराची रोजनिशी ....
कलाकाराची
रोजनिशी ....
खूप दिवसांनी आपल्या आवडत्या कलाकाराचा कार्यक्रम
जाहीर झालेला असतो. रसिकजन प्रवेशिकांसाठी रांगा लावतात. प्रत्यक्ष कार्यक्रमाचा दिवस
उजाडतो. कार्यक्रमाचे ठिकाण गजबजून जाते. मंचावर प्रकाशाचा झगमगाट असतो. सुंदर सजावटीने
रंगमंच सजवलेला असतो. ध्वनीव्यवस्था उत्तम लागलेली असते. खाण्यापिण्याचे स्टॉलही रसनेची
तल्लफ़ पुरी करण्यासाठी सज्ज झालेले असतात. श्रोते कलाकाराची आतुरतेने वाट पहात असतात.
कलाकार मंचावर येतात. कार्यक्रम मोठा बहारदार होतो. कलाकाराच्या आविष्काराच्या आठवणीत,
धुंदीत सर्व श्रोते आंदाने घरी जातात. सर्व काही छान झालेले असते. श्रोते मंत्रमुग्ध
वगैरे होतात, स्वर खूप दिवस कानात रेंगाळतात, आनंदसागरात न्हाउन निघतात, वगैरे वगैरे
दुसर्या दिवशी वृत्तपत्रात छापून येते.
मग दुसरा दिवस उजाडतो. सामान्य रसिकजनांना
विशेष फ़रक जाणवत नाही, कारण कालच्या कलाकाराच्या आविष्काराने श्रवणशक्तीची तहान भागलेली
असते. नुसत्या खुर्च्या उरलेल्या त्या भकास मांडवामध्ये संयोजक येतात. काल छान शिस्तीत
मांडलेल्या खुर्च्या आज अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. साउंडसिस्टीमवाला, मांडववाला आणि
त्या संयोजनात सहकार्य लाभलेले काही, आपापला पसारा आवरायला येतात. या सगळ्यांसाठीच्या
पाकिटांची जुळवाजुळव करताना घामेघूम झालेला संयोजक त्या मांडवात सहज ओळखू येतो. काल
उपस्थित कार्यकर्त्यांच्या फ़ौजेमधील एक-दोनच शिलेदार आज मदतीला असतात. कुणाचे देण्या-घेण्याचे
व्यवहार पूर्ण होतात, तर कुणाला वायदे करून, संयोजकाला आता कालच्या कलाकाराला निरोप
द्यायला, म्हणजे हॉटेलचे बिल द्यायला, हॉटेलवर जायचे असते. हॉटेलवर कलाकाराच्या ओळखीचे
कुणीतरी बरोबर असते, कोणी आणखी काही कारणाने भेटायला आलेले असते. हे सगळे कसेतरी पार
पडते. कलाकारही पुढच्यावेळी म्हणजे ’लवकरच’ भेटू अशा आश्वासनाने परतात. आणि संयोजक
प्रायोजकाकडे कबूल केलेला धनादेश आजतरी मिळणार ना, या शंकेने त्या दिशेने कूच करतात.
कलाकार, साथीदार आपापल्या घराकडे कूच करतात.
कलाकार खूप प्रसिद्ध असतील तर त्यांना परस्पर दुसर्या गावी, हल्ली बरेच वेळा विमानानेच
प्रवास असतो. पुन्हा तसाच रंगमंच, तसेच आपल्या कलाविष्कारासाठी तहानलेले श्रोते. पुन्हा
त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची नवी जबाबदारी. कदाचित साथीदार वेगळे असतात. सर्व
तसेच, पण नवा गडी नवा राज्य. कधी कोणी व्यवस्थापक उशीरा येतात, व्यवस्था नीट झालेली
नसते. अशा अनंत किरकोळ अडचणी. जेवणाच्या स्वत:च्या सवयी आणि गावोगावच्या चवींशी जुळवत,
स्वत:ची तब्येत उत्तमपणे सांभाळायची. बाहेरून खूप दिमाखदार असलेल्या हॉटेलच्या एसीचा
तोच कोंदट वास. जेवणासाठी तशीच मसालेदार जळजळीत पंजाबी भाजी किंवा तब्येतीला फ़ार जड
नको, म्हणून हलकेफ़ुलके सॅन्डविचही तसेच. संयोजक, त्यांचे सहकारी, यांच्याशी तेवढ्यापुरतीच
झालेली किंवा व्यावसायिक हस्तीदंती. कलाकाराच्या बरोबर प्रत्येक ठिकाणचे नवीन शिष्य,
त्यांच्या अध्यापनाची जबाबदारी, तर कधी गुरु, तर कधी वडीलधारे म्हणून तो घरी नीट पोहोचेल
कि नाही, याची काळजी. भेटायला येणारे पत्रकार मुलाखत घेउन बरेच वेळा संगीतविषयक अज्ञानातून दुसर्या दिवशी काही भलतेच छापतील कि काय याचीही भीती. अशी अनेक व्यवधाने सांभाळत मंचावर
’मंत्रमुग्ध करणारा’ आविष्कार सादर करायचा ताण, कितीही रोजचेच झाले तरी असतोच. सादरीकरणातील
किरकोळ चूकही चाणाक्षांच्या नजरेतून सुटत नाही. त्यावर हल्ली यांचे वादन किंवा गायन
पहिल्यासारखे वगैरे वगैरे होणारी टीका. या सगळ्याला सामोरे जाताना सांभाळावी लागणारी
मन:शांती, सहज कुठेच मिळत नाही. एकापाठोपाठ येणारे कार्यक्रम सोडता येत नाहीत. नाही
म्हणले, तर पुन्हा कधी बोलावतील कि बोलावणारच नाहीत याचीही धास्ती. हा रोजचा प्रवास,
अनियमित रोजनिशी, आपले गुरु, घर, नातेवाईक, मित्रमंडळी व रसिकांसमोर असलेली स्वत:ची
इमेज, या सार्याचा तोल सांभाळणे खरच अवघड असते. याशिवाय सादरीकरणातील तोचतोचपणा घालवण्यासाठी
सतत नवीन शिकणे, त्यावर स्वत:चे चिंतन करणे, या सार्यासाठी आवश्यक तो वेळ काढणे, हेही
करावेच लागते. याचबरोबर आता रोज नवनवीन येणार्या तंत्राशी, माध्यमांशी मैत्री ठेवणे,
ही सुद्धा आजच्या कलाकारांपुढील आव्हाने आहेत.
असे म्हणतात शिखरावर माणूस एकटा असतो
!!! याचा एक अर्थ म्हणजे, शिखरावर एकच जण पोहोचू शकतो आणि दुसरा म्हणजे, शिखरावर पोहोचल्यावर
तो एकटा उरतो. कटू असले तरी सत्य आहे !
हेमकांत नावडीकर
navdikar@gmail.com


हेमकांत जी, छान लिहित आहात .. असेच चालू ठेवा !
ReplyDeleteधन्यवाद चैतन्य
ReplyDelete