एक अद्वितीय कलाकार - पं. रविशंकर

पं. रविशंकर - एक अद्वितीय कलाकार


पं.रविशंकरांना प्रथम केंव्हा ऐकलं हे माझ्या चांगलंच लक्षात आहे. संगीतातील विद्यार्थीदशा एव्हाना सुरु झालेली होती. १९७७ डिसेंबर मध्ये पेरुगेटजवळील मुलांच्या भावेस्कूलच्या प्रांगणात कार्यक्रम झाला होता. रविजींनी प्रथम बिहाग, परमेश्वरी आणि सिंध भैरवी त्यांनी सादर केली होती. त्या कार्यक्रमाला नेहेमीप्रमाणेच भरगच्च गर्दी होती. पं. किशनमहाराज साथीला होते. हा कार्यक्रम लक्षात राहण्याचे अजून एक कारण म्हणजे पं. किशनमहाराजजींचा रुबाब ! पं. रविजींचा आलाप, जोड, झाला, होइपर्यंत पं. किशनमहाराजजी ग्रीनरूममध्येच होते. तबल्यावरील गत सुरु होताना पं. किशनमहाराजजी स्टेजवर दाखल झाले ! वीरासन घातलेले त्यांचे देखणे व्यक्तिमत्व, कपाळावर भला मोठा टीका असा त्यांचा थाट मात्र अजूनही नजरेसमोर आहे. पं. किशनमहाराजजींचे वादन लक्षात रहाण्याएवढी समज नव्हती. पण पं. रविशंकरांच्या वादनाने प्रचंड प्रभावित झालो आणि पुण्या-मुंबईमध्ये झालेले जवळजवळ सर्व कार्यक्रम झपाटून ऐकले. कधी तिकिट काढून, तर कोणाची ओळख काढून, तर कोणाचे शेपूट पकडून. पण प्रत्येकवेळी त्यांच्या वादनातील रंग काही औरच होता. 

आमच्याही सांगितिक जडण-घडणीचा तो काळ होता. त्यामुळे त्यांचे वादन हे विशेषत: तबलावादकांना पर्वणीच असे. रविजींचा तालाकडे बघण्याची दृष्टी इतरांपेक्षा खूपच वेगळी होती. त्यांच्या वादनात एक अफ़ाट शक्ती होती फ़क्त वादनातच नव्हे तर त्यांचे अवघे व्यक्तिमत्वच, ज्याला इंग्रजी मध्ये मॅग्नेटिक पर्सनॅलिटी म्हणतात तसे होते. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक आकर्षित करण्याची ताकद होती. सेंट झेविअर्सच्या प्रांगणातील त्यांच्या अनेक मैफ़ली ऐकल्या. कोणी कितीही त्यांच्याहून लांब बसलेला असो, ते त्या कोपर्‍यात असलेल्या ग्रीनरूममधून बाहेर पडले, कि सार्‍यांच्या नजरा आपोआप त्यांच्यादिशेने आकृष्ट होत. त्यांची मैफ़ल हा एक जणू एखादा समारंभ आहे कि काय असे भासे. त्यांच्याइतके मैफ़लीबाबत जागरुक असलेला दुसरा कोणी कलाकार माझ्या तरी नजरेसमोर नाही. रविजी कर्यक्रमस्थळी कार्यक्रमाच्या ठरलेल्या वेळेच्या जवळजवळ दोन ते तीन तास अगोदर दाखल होत. स्वागताला हजर असलेल्या व्यक्तिंशी हस्तीदंती करत, रविजी रंगमंचावर दाखल होत. ध्वनीसंयोजकाला अगोदर बोलावलेले असे. पंडीतजी व त्यांचे साथीदार तबलजीसुद्धा मंचावर दाखल होत. व थेट वादनालाच जणू सुरवात होई. एकीकडे वादन करता करता साउंडचे बॅलन्सिंग होत असे. एकदा मनासारखे बॅलन्सिंग, म्हणजे खरंतर मनसोक्त वादन करुन झाल्यावर, पंडीतजी ग्रीनरूमध्ये दाखल होत व तेथेही पुन्हा झकास मैफ़ल जमे. त्यांच्या ग्रीनरूममध्ये प्रवेश असा सहजी मिळत नसे. संगीतातली दिग्गज, खाशी मंडळी व शिष्योत्तम यांनाच तेथे प्रवेश असे. आतमध्ये गप्पाटप्पांपेक्षाही वादन आणि वादनच होई. जे बाहेर वाजवायचे आहे, त्याची आतमध्ये प्रॅक्टीस असले काही नसे. ठरलेल्यावेळी बरोबर रविजी मंचावर येत व मैफ़लही दणक्यात होत असे. मैफ़लमध्ये त्यांनी वादनात कुठे हयगय, काटकसर किंवा हात राखून वाजवणे असे कधी झाले नाही. एकदा मंचावर दाखल झाले कि मनसोक्त व भरपूर वाजवत. त्यांची छोटेखानी मैफ़ल असे ऐकण्यातच नाही. म्हणजे कधीतरी कमी श्रोत्यांपुढे त्यांनी वाजवलेही असेल पण तेही भरपूर वेळ. कारण संगीत हा त्यांचा श्वास होता. आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे गुरु उ. अल्लाउद्दीनखॉसाहेबांच्या कडक शिस्तीमध्ये, प्रचंड वेळ केलेल्या रियाजामुळे, खूप वेळ वाजवण्याची सवय व क्षमता त्यांच्या रक्तातच भिनली होती असे म्हणल्यास काहीच चूक नाही. त्यामुळे त्यांच्या मैफ़लीत श्रोते कधी कंटाळलेत, इकडेतिकडे बघताहेत, किंवा रविजींच्या वादनातील ओघ कुठे तुटला आहे, सुटला आहे असे कधी झाल्याचे मला तरी स्मरत नाही. प्रचंड रियाजामुळे वादनात आलेली सहजता, ना त्यांना तालाचे बंधन होते, ना रागाचे. त्रितालाइतकेच सहज ते इतर कुठल्याही तालात रागविस्तार करत. रविजी नुसतेच रियाजी नव्हते, तर तितकेच प्रतिभावानही, त्यामुळे ७,९,१०,११,१५ अशा अनवट व पूर्णांक मात्रांच्या तालाबरोबरच, ७॥, ८॥, १०॥ अशा अपूर्णांक मात्रांच्या तालावरही त्यांचे तेवढेच प्रभुत्व होते. प्रतिभेच्या जोडीला प्रयोगशीलता, नावीन्याचा ध्यास, यामुळे त्यांची आनंदभैरवची ध्वनिमुद्रिका म्हणजे एक अद्भुत सादरीकरण आहे. १०॥ च्या मात्रेच्या तालातील गत त्यांनी सादर केली आहे, पण ठेका मात्र रूपक, म्हणजे ७ मात्रांचा. तो दिडीच्या वजनाने जातो त्यामुळे ७ दिडं १०॥ च्या हिशोबाने, गत १०॥ मात्रांची व ठेका ७ मात्रांचा ! पण दोन्ही एकाच क्षणी समेवर येतात तेंव्हा आनंदभैरव म्हणजे आनंदाची परमावधीच जणू वाटतो ! अशी अद्भुत कल्पनाशक्ती आणि त्यांचे लालित्यपूर्ण सादरीकरण ऐकले कि खरोखरच रविजींपुढे नतमस्तक व्हावेसे वाटते. असे अद्भुत सादरीकरण चुकुन कधीतरी एकदाच झाले आहे, सहज वाजून गेले आहे असेही नाही. तीच उंची आणि असे अनोखे प्रयोग रवीजींच्याकडून नेहमीच होत असत, हीसुद्धा  एक आश्चर्याचीच गोष्ट होती. त्यांची कल्पनाशक्ती नुसतीच चमत्कृतीपूर्ण नव्हती तर त्या कल्पनाशक्तीला घराण्याचे वळण व शिस्त होती, त्यामुळे त्यांचे प्रयोग हे प्रयोग न राहता संगीताला एक परिमाण देउन गेले असे मला वाटते. त्यांनी बांधलेले नवीन राग असोत, किंवा कर्नाटक संगीतातील अनेक हिंदुस्थानी संगीतात सादर करणे असो, नवीन वाद्यांबरोबरची जुगलबंदी असो त्यात कुठेही उथळपणा नाही. सादरीकरणातील व प्रयोगशीलतेतील आनंद घेणे मात्र जरुर होते. अगोदरच्या पिढीमध्ये अभिजात संगीतातील सादरीकरणातीतल जाड्य त्यांनी कमी करुन त्यात एक लालित्य, सहजपणा व एक प्रसन्न वातावरण जरुर त्यांनी आणले. 


असंख्य गोष्टींच्या पहिलेपणाचे धनीपण पं. रविशंकर या नावापुढे आहे. भारतीय शास्त्रीय संगीताची ओळख वैश्विक पातळीवर करुन देणारे कलाकार म्हणून तर ते सर्वज्ञात आहेतच, पण त्यासाठी भोगलेल्या हाल-अपेष्टेचे, टीकेचे धनीपणही त्यांनाच द्यायला हवे ! शास्त्रीय संगीतातील घराणेदार तालीम घेउन, प्रचंड विद्याभ्यास केलेला एक कलाकार, व्यावसायिक शास्त्रीय संगीत कलाकार, म्हणून यशस्वीपणे जगु शकतो, हे दर्शवणारे ते पहिले कलाकार म्हणावयास हवेत. आपल्या संगीताची पाश्चिमात्य श्रोत्यांना ओळख तर करुन दिलीच, पण ते ऐकायला लावण्याची, सवय करण्याची अवघड कामगिरी त्यांनी केली व पुढच्या अनेक पिढ्यांना सन्मानाने जगण्याचे नवीन दालन उघडून दिले. वाटतो तेवढा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. परदेशातील सामान्य श्रोत्यांना त्यांच्या वादनाने मोहिनी घातलीच, पण अखंड रियाज व संगीत हाच श्वास असलेल्या या कलाकाराची जातकुळी, यहुदी मेन्युहीनपासून जॉर्ज हॅरिसन, अशा पाश्चिमात्य संगीतकारांनाही आपलीशी वाटल्यास आश्चर्य वाटायला नको. हिंदुस्थानातील अनेक नामांकित म्हणजे जवळजवळ सर्वच तबलावादकांनी त्यांना साथ केलीच,  पण पं. रविजींचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक उदयोन्मुख व गुणी तबलावादकांना आपल्याबरोबर साथीला घेउन, हे तबलावादक तरुण व उदयोन्मुख असले, तरी तितक्याच योग्यतेचे आहेत, याचे जणू जाहीर प्रशस्तीपत्रच दिले. पूर्वीच्या काळी आलापीनंतर येणारा जोड हा पखवाजाच्या संगतीने, चार-चार मात्रांच्या लयीच्या ठोक्यात पण कोणताही ठेका न धरता करत असत. तो प्रयोग झेविअर्सच्या मैफ़लीमध्ये समक्ष ऐकायला मिळाल्याबद्दल स्वत:ला भाग्यवान समजतो. जुगलबंदी हा प्रकार रुजवण्यातही रविजींचे योगदान मोठे आहे. पण त्यातही वेडेवाकडे असे त्यांनी काही केले नाही. जुगलबंदी केली तीही उ. अली अकबर खॉसाहेब व पं. निखिल बॅनर्जी या तंतूवादकांबरोबर व तेही गुरुबंधूंबरोबर. म्हणजे समान वाद्यधर्मीं, शास्त्रधर्मींबरोबर ! या कलाकाराची सर्जनशीलता अफ़ाट होती. किती नवीन नवीन कल्पना आणि प्रयोग त्यांनी केले. पाश्चात्य सिंफ़नी बरोबर केलेला ’इस्ट मीट्स वेस्ट’ हा अल्बमही वैशिष्ट्यपूर्ण व तितकाच सहजसुंदर होता. पाश्चात्य संगीतकारांबरोबर काम करताना संगीतातले भारतीयत्व कुठे लोपू दिले नाही. कुठे सवंगपणा नाही. आपल्या संगीतातील अभिजातता, पावित्र्य कुठे ढळणार नाही याची वेगळी दक्षता त्यांना घ्यावीच लागली नाही. चित्रपटाला संगीत दिले, तिथेही स्वत:चा भक्कम ठसा उठवला. आजही अनुराधा सिनेमातील सर्वच गाणी तेवढीच भावतात. १९८२ साली एशियाडसाठी केलेलं ’स्वागतम्‌ अथ स्वागतम्‌’ अजूनही रसिकांच्या मनात रुंजी घालतं. अलिकडेच कोणीतरी शास्त्रीय संगीतात इंग्रजी बंदिशींचा प्रयोग केल्याचे ऐकले, पण रविजींनी ’I am missing you’ अशी इंग्रजी बंदिश लक्ष्मीशंकरांकडून केंव्हाच गाउन घेतली होती. 




त्यांचे प्रेझेंटेशन हा तर स्वतंत्र अभ्यासाचाच विषय करायला हवा. त्यांच्या तीन ते सात मिनिटांच्या ध्वनिमुद्रिका याचे उत्तम उदाहरण आहे. आलापीपासून द्रुत झाल्यापर्यंत, सर्व काही त्या तीन मिनिटात त्यांनी इतके सुंदर बसवले आहे, कि त्या तीन मिनिटात जणू काही संपूर्ण मैफ़ल ऐकल्याचे समाधान मिळते. तीन मिनिटांची ध्वनिमुद्रिका असो, नाही तर तीन तासांची मैफ़ल असो. त्यांचे सादरीकरण देखणेच असे. त्यांच्या मैफ़लीमध्ये सामान्य रसिकांपासून समजदार श्रोत्यांपर्यंत सर्वांसाठी सर्व काही असे. सरतेशेवटी तबलावादकाबरोबर सवाल-जबाब करुन, मैफ़लीची उत्कंठा, आणि आलेख सतत चढताच रहात असे. अगदी मैफ़लीमध्ये अंगावरील झब्ब्यांच्या रंगसंगतीबाबतही अतिशय दक्ष असत. स्वत:च्या वाद्याच्या बाबतीत इतके जागरुक तर कोणालाच पाहिले नाही. विमानप्रवासात स्वत:बरोबर वाद्य सुरक्षित रहावे यासाठी सतारीचे स्वतंत्र तिकिट काढणारे ते पहिलेच कलाकार असावेत. इतकेच काय पण आजही त्यांच्या अनेक मैफ़ली, ध्वनीमुद्रिका ऐकताना त्यांच्या सतारीचा टोन, कधी बदलल्याचे आठवत नाही. कारण आवाज किंवा टोन बदलू नये, यासाठी सतारीच्या कारागिरालाही बरोबर घेउन जाणारे पं. रविशंकर सर्वार्थाने एकमेकाद्वितीय होते.  

त्यांच्या वादनाबद्दल लिहू तेवढे थोडेच आहे. आंधळे आणि हत्तीच्या गोष्टीसारखे आहे. प्रत्येकाला त्यांच्या वादनात काहीतरी वेगळे सापडत जाते. तरी   तालावरचे विलक्षण प्रभुत्व अनुभवणे, हा त्यांच्या वादनातील मोठा आकर्षक भाग असे. आलापीनंतर जोड सुरु झाला, कि लयीशी असा अद्भुत खेळ करत. त्यांनंतर ठेका सुरु झाल्यावर, तर वेगवेगळ्या स्वरावली घेत, त्यातूनच सहज उपजणार्‍या अनोख्या अंदाजाच्या तिहाया ऐकणे, म्हणजे आनंदाची परमावधीच जणू. त्या लयकारीला तबल्यातून प्रत्युत्तर देणारे उ. अल्लारखा खॉसाहेब किंवा झाकीरभाई असे संगतकार असले, तर मैफ़लीचा आनंद शतपटीने वाढत असे. अतिद्रुतगतीतील त्यांची तयारी पाहून खरंच स्तिमित व्हायला होई. अतिद्रुत गतीतील वादन करताना माझी तयारी पहा किंवा मी किती मुश्किल काम करतोय वगैरे, असला अनाठायी रसभंग करणारा संवादही त्यांनी केला नाही. संवाद केला तो फ़क्त आणि फ़क्त सतारीतूनच. त्यांनी कुठे सवंगपणाला थारा दिला नाही. ना वाजवण्यात, ना व्यक्तिगत आयुष्यात. व्यावसायिक विश्व आणि व्यक्तिगत आयुष्य यातही कुठे गल्लत होउ दिली नाही. त्याचा समतोल त्यांनी व्यवस्थित राखला होता. सवंगपणा, प्रसिद्धी अशा बाह्य गोष्टींपेक्षा संगीतविश्वाच्या अंतरंगात शिरुन, त्यातच नाविन्य, वैविध्य कसे आणता येईल, याचा वस्तुपाठच पंडीतजींनी घालून दिला. त्यांनी स्वत:ला व्यक्त केले ते फ़क्त सतारवादनातूनच. अनेक मोठमोठे कलाकार, अनेक वर्षांच्या साधनेनंतर, तपस्येनंतर आयुष्याच्या उत्तरार्धात अनेक वेळा, मला आता कोठे संगीत समजायला लागले आहे, आता मला षड्‌ज कळायला लागला आहे, असे म्हणताना दिसतात. त्यात काही खोटे नाही, अशा दिग्गजांना संगीताचे क्षितीज सतत खूणावत रहाते. हेच विचार पंडीत रविशंकर जेंव्हा व्यक्त करतात, तेंव्हा त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वातील परिपक्वता आणि त्यांची उंची सतत अधोरेखित करत रहातात. ते एका मुलाखतीत म्हणाले होते, संगीतात अपूर्ण रहाण्याच्या वेदनेचा आनंद काही औरच असतो !!!

हेमकांत नावडीकर
navdikar@gmail.com

Comments

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान ...

मार्दवपूर्ण गाण्यांचे माळपदक : माणिक वर्मा

कुमार नावाची चिरतरुण मैफल