पं. निखिल बॅनर्जी
पं. निखिल बॅनर्जी
कलकत्त्याला सवाई गंधर्व महोत्सवासरखाच डोव्हर लेन नावाचा महोत्सव होतो. सुमारे १९८२-८३ साल असेल. त्या महोत्सवात जगद्विख्यात सतारिये पद्मभूषण पं. निखिल बॅनर्जी यांनी वाजवलेले एक ध्वनीमुद्रण कानावर आले. भैरव रागाची आलापी आणि अहिर भैरवमधील गत. संगतीला उस्ताद झाकीरभाई. ते एकदा ऐकले आणि नंतर कित्येक दिवस तेच अद्भुत ध्वनीमुद्रण ऐकतच राहिलो. अनेकदा ऐकूनही समाधान होईना. हे सगळं आज आठवायचं कारण म्हणजे २७ जानेवारीला पं. निखिलदांना जाऊन ३१ वर्ष झाली. निखिलदांच्या बाबतीत थोडसं नाही चिरा, नाही पणती असं झालं आहे असं वाटतं. कुणी नाव घ्यावं, त्यांचा संगीताचा वारसा चालवावा असे शिष्य नाहीत. कुटुंबात दोन मुलीच, त्याही स्वत:च्या वडिलांच्या दैवी संगीताविष्काराच्या वाटेपासून दूरच राहिल्या. हा मनस्वी, आत्ममग्न आणि द्रष्टा कलाकार तसा दुर्दैवीच म्हणायचा. एवढ्या मोठ्या कलाकाराचं असं का झालं माहिती नाही, पण असं काहीसं झालं आहे त्याचं वाईट वाटतं.
तसं पाहिलं तर पं. रविशंकर, उ. विलायतखाँ या मागील पिढीतील हे दोन सतारिये म्हणजे जणू दोन ध्रुवच म्हणायला हवेत. एकाने तालाच्या किंवा लयकारीच्या आणि एकाने स्वर किंवा गायकी अंगाने दोन्ही ध्रुव अक्षरश: काबीज केले होते. त्यातले कोण, कोणत्या मार्गाने गेले, हे ज्याने त्याने ठरवावे. या दोघांना कोणत्या मार्गाचा पाइक म्हटले तरी काहीच बिघडत नाही इतके हे दोन जण आपापल्या शिखरावर अत्त्युच्च पदावर पोहोचले होते. अशा परिस्थितीत जणू तिसरा ध्रुव निर्माण करण्याची अचाट कामगिरी निखिलदांनी लीलया करुन दाखवली. आजही त्यांचे कोणतेही ध्वनीमुद्रण ऐकताना अपोआप डोळे मिटतात. काहीतरी आपण विलक्षण ऐकतोय हे जाणवतं. या दोघांपेक्षा निखिलदा अनेक बाबतीत वेगळे, काही बाबतीत नि:संशय उजवेही म्हणता येतील असे होते.
१४ ऑक्टोबर १९३१ ही त्यांची जन्मतारीख. जितेंद्रनाथ आणि दुर्गाराणी बॅनर्जी यांचे निखिलदा हे दहापैकी सातवे मूल. स्वत: जितेंद्रनाथ उत्तम सतारिये होते. त्यांचेच बाळकडू निखिलदांना मिळाले. जितेंद्रनाथांना स्वत:च्या वाद्याच्या बाबतीत अतिशय जागरूक होते कोणालाही हात लावू देत नसत. पण एकदा निखिलदा ५ वर्षांचे असताना त्यांनी त्यांच्या नकळत सतारीवर हात टाकला आणि त्या त्यांच्या वादनाने प्रभावित होउन वडीलांनी निखिलदांचे रीतसर संगीत शिक्षण सुरु केले. इनायतखॉसाहेबांचे शागिर्द अॅन्ड्र्युज गोमेझ हे त्यांचे पहिले गुरु. निखिलदा ८ वर्षांचे असताना त्यांच्या गुरुंच्या सांगण्यावरुन त्यांनी आकाशवाणी स्पर्धेत भाग घेतला होता. व जवळ जवळ सहाशेच्यावर स्पर्धकांमध्ये निखिलदा पहिले आले होते. त्यानंतर उ. मुश्ताक अली काही दिवस, त्यानंतर श्री. बीरेंद्रकिशोर रायचौधरी आणि पं. राधिकामोहन मित्र अशा गुरुंकडे शिकून निखिलदा पोहोचले थेट उस्ताद बाबा अल्लाउद्दीनखॉसाहेबांकडे. त्यांच्या प्राथमिक जडणघडणीत मुख्य वाटा बीरेंद्रकिशोर रायचौधरींचा होता. आकाशवाणीतील स्पर्धेत पहिले आल्यापासूनच वंग संगीत सम्मेलन, या मोठ्या संगीत समारोहात सुरु झालेला निखिलदांचा मंचावरील प्रवासही, शिक्षणाबरोबर हळुहळु, पण बरोबरीनेच जणू सुरु झाला. पण बाबा म्हणजे उ. अल्लाउद्दीनखाँसाहेबांकडे गेल्यावर संगीताची तालीम म्हणजे काय, इतकंच नव्हे तर संगीत म्हणजे काय, याचाच जणू सक्षात्कार निखिलदांना झाला. नुसत्या छूट ताना, सपाट ताना म्हणजे संगीत नाही, मन उत्तेजित करणारे नव्हे तर मनाला शांती देणारे संगीत कसे निर्माण होते, याचा वस्तुपाठ उ. बाबा अल्लाउद्दीन खॉसाहेबांच्या तालमीने दिला. तंतूवाद्यावरील आपल्या अफ़ाट सामर्थ्याने सार्या विश्वावर अधिराज्य गाजवणारे पं. रविशंकर, उ. अलि अकबर खॉ आणि पं. निखिल बॅनर्जी असे जणू ब्रह्मा, विष्णू, महेश यांसारखे तीन महान तंतूवादक निर्माण करणार्या बाबा अल्लाउद्दीनखॉसाहेबांच्या काही वर्षांच्या तालमीने, निखिलजींच्या संगीतसाधनेला एक सुयोग्य दिशा सापडली. प्रत्येक शिष्याच्या क्षमतेनुसार बाबा प्रत्येकाला वेगवेगळी तालीम देत. त्यांची शिस्तही तशीच होती. मूर्छना, काही पलटे, सकाळी भैरव तर संध्याकाळी यमनची तालीम चालत असे. मात्र बाबा त्यांच्या नातवाला आशिषखॉना एक दिवस एका वेगळ्याच रागाची तालीम देत होते. ती चालू असलेली तालीम, त्या रागाचे स्वरूप निखिलजींना मोहवून गेले. आणि न राहवून तो राग मनात साठवून तंतोतंत तसा वाजवायचा प्रयत्न केला. निखिलजींच्या दुर्दैवाने त्यांची ही हरकत बाबांच्या कानावर गेली, बाबांचा संताप अनावर झाला आणि दुर्दैवाने त्या दिवसापासून निखिलजींचा मैहरचा मुक्कामही संपला. बाबांच्या कडक शिस्तीचा पहिला फ़टका निखिलजींनाच बसला. त्यानंतर निखिलजींनी मुंबईला गुरुबंधू उ. अली अकबरखाँ यांच्याकडून तालीम घ्यायला सुरवात केली. ती तालीम बरेच दिवस चालली. त्यातूनच उ. अली अकबरखॉ व निखिल बॅनर्जी अशा युगलवादनाचे कार्यक्रमही सुरु झाले.
निखिलदांचे वादन पं. रविशंकर आणि उ. विलायतखाँ यांच्यापेक्षा खूपच वेगळे होते. पं. रविशंकर आलापी पूर्णपणे तंत अंगाने असे. निखिलदा आणि रविजी दोघेही एकाच गुरुकडे शिकूनही, निखिलदांच्या आलापीमध्ये गायकी अंग प्रकर्षाने जाणवते, इतकेच नव्हे, तर अनेकदा त्यांच्या आलापीमधून उ. अमीरखाँ स्पष्टपणे जाणवतात. उ. अमीरखाँ यांचा त्यांच्यावर खूपच प्रभाव होता. स्वरांचे लगाव, रागाची बढत ऐकताना निखिलदांच्या वादनातून उ. अमीरखाँची अस्पष्ट प्रतिमा सतत दृग्गोचर होत राहते. स्वत:चे तंत्र आणि वादनशैलीमध्ये त्यांनी एक वेगळीच वाट शोधली होती. तंत अंग आणि गायकी अंग यांचा सुरेख संगम व समतोलही त्यांनी साधला होता. प्रचंड रियाज व योग्य मार्गदर्शनामुळे आलापीमधील शिस्त, कुठेही घाई किंवा विचारातील गोंधळ नाही. भरपूर रियाजामुळे आत्मसात झालेल्या तंत्रावरील प्रभुत्वामुळे, जे मनात येईल ते सहज हातातून येत असे. विचाराची, रागाची पकड कुठेही ढिली पडत नसे. जोडकामातून दिसणारी लयीची करामत. जोडकाम मग ते आलापीतील असो किंवा तालप्रक्रियेतील असो त्यातही तयारी दाखवण्यासाठी नसे, तर रागविस्तारासाठी व आविष्काराची जेवढी गरज तेवढेच असे. श्रोत्यांकडून टाळ्या पडेपर्यंत झाला वाजवायचा, असा प्रकार त्यांनी कधीच केला नाही. एकूणच त्यांच्या वादनात श्रोत्यांवर छाप पाडण्यासाठी, टाळ्या मिळवण्यासाठी असे काहीच गिमिक्स नसत. श्रोत्यांवर छाप पाडण्यासाठी तबलजीबरोबर सवाल-जवाब करणे, असल्या क्लृप्त्यांचीही त्यांना कधी गरज भासली नाही. रागाच्या विस्तारप्रक्रियेत जे व जेवढे आवश्यक तेवढेच वाजवायचे. निखिलदा स्वत:च त्या रागात एवढे भिनलेले असत कि श्रोतेही आपोआप त्या रागाच्या ओघात गुंगून जात. सुरवातीला मनसोक्त आलाप, जोड, झाला असा रागाविस्तार करत ठेक्याबरोबर लयीशी आवश्यक एवढी लयकारी करत. लयकारीतून रागातील स्वरवाक्ये गुंफ़त, सहज ओघात समेवर येणार्या तिहायाही अतिशय आकर्षक असत. वादनकौशल्याबरोबर उ. विलायतखाँ व पं. रविशंकर यांच्यापेक्षा निखिलदा त्यांच्यापेक्षा अधिक सरस होते, कारण हे दोघेही आणि बहुतेक सर्वच सतारिये काळी एकच्या सुरात वादन करतात. निखिलदा पांढरी दोन म्हणजे आणखी वरच्या पट्टीत तेही जाड तारेवर वाजवत. जे विशेषत: मींडकामासाठी खूपच कठीण असते. त्यावर लीलया गमकेच्या ताना वाजवत. बोटांना जाड तारेचा ताण वेदनादायक असतो. पण त्यामुळे येणारा सतारीचा विशिष्ट टोन अधिक गोड असे.
परवा पं. आनिंदो चॅटर्जींना भेटलो. निखिलदांच्या बद्दल त्यांना विचारले. कारण त्यांच्या सर्वात जवळचे, त्यांचा भरपूर सहवास लाभलेले आणि त्यांच्या बरोबर अनेक वर्षे तबलासाथ केलेले आनिंदोदादा, त्यांचे नाव काढताच एकदम भावूक झाले. ते माझे गुरु नसले तरी मला गुरुसमान होते. त्यांच्यासारखा वादक होणे शक्य नाही. दोन कलाकारांविषयी नुकतीच एक गंमतीशीर गोष्ट वाचनात आली. दोनही कलाकारांवर इश्वर प्रसन्न होतो. काय पाहिजे ते मागा म्हणल्यावर एकाने माझा कलाविष्कार ऐकायला हजारो श्रोते, आणखी बरेच काही मागितले. दुसर्या कलाकाराला काय हवं असं विचारताच, त्याने सांगितले, मला बाकी काही नको, मोजकेच पण फ़क्त समजदार श्रोते दे, बाकीचे मी पाहून घेईन. पं. निखिल बॅनर्जींनी त्या दुसर्या कलाकाराचा मार्ग निवडला होता !
हेमकांत नावडीकर
navdikar@gmail.com

निखीलजीं म्हणजे माझे दैवतच म्हणले तर वावगे ठरणार नाही.सूर म्हणजे परमेश्वर मानणारे आणि त्या परमेश्वराच्या अगदी जवळ गेलेले,एकनिष्ठ झालेले निखीलदा म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीताला लाभलेलं एक अनमोल रत्न आहे.त्यांची मैफिल प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला नाही ही मनाला कायमची खंत राहणार आहे. आपण त्यांच्याबद्दल लिहिलेला हा लेख अतिशय छान शब्दबद्ध केला आहे.निखीलजींचे अधिक अंतरंग आपण असेच रसिकांपर्यंत पोहोचवा ही विनंती.धन्यवाद
ReplyDeleteमनापासून धन्यवाद 🙏
Deleteनिखिलजी यांचे वादन ऐकण्याचा दुर्मीळ योग मुंबईत आला.नक्की साल व ठिकाण आठवत.नाही पण त्यांनी आलापी मधेच असे वादन केले की थक्क झालो.करामतऊल्ला यांची संयमित साथ.अजूनही आठवणीने डोळे पाणावतात.
ReplyDeleteवाह, क्या बात है ...
Delete