संगीतातील सुचणे
संगीतातील सुचणे
सामान्य श्रोत्यांच्या नेहमी एक मनात येतं
की या सर्व कलाकारांना गाणं कसं सुचतं? आणि सुचतं म्हणजे नेमकं काय होतं ? गाण्याची
मांडणी हा सगळा मनाच्या कल्पनेचा डोलारा असतो, सगळी घोकंपट्टी असते, शास्त्र नियमांच्या
चौकटीत गुरुपरंपरेने सिद्ध झालेली आखीव-रेखीव मांडणी असते कि कसे ? खरं तर हा एवढा मोठा विषय आहे. ही गायक
मंडळी एवढे तासन-तास मैफ़ल सादर करतात,रोज नव्या श्रोत्यांसमोर, रोज नव्या ठिकाणी, रोज
नवे सादर करायला यांना कसं काय जमतं ? कधी कधी असेही होते कि एखाद्या कलाकाराला त्याच
गावात किंवा स्वत:च्या गावात वर्षातून अनेक मैफ़ली पण कराव्या लागतात. पण त्यातले नाविन्य,
ताजेपणा, टवटवीतपणा हे कसा काय टिकवतात बुवा असे नेहमीच श्रोत्यांच्या मनात येत असणार
त्याचा शोध घ्यायचा यथाशक्ति प्रयत्न.
खरं म्हणलं तर कोणतेही सादरीकरण पूर्ण
नवीन असं कधीच नसतं आणि म्हणलं तर रोजच नवीन असतं. संगीत ही अशी एक कला आहे, ज्या कलेला
इतर कलांपेक्षा आणखी एक परिमाण आहे. चित्रकला, साहित्यामध्ये एकदा चित्र काढून झाले,
किंवा एखादी कलाकृती लिहून झाली, हातावेगळी केली कि त्यातील सांगण्याची प्रक्रिया संपलेली
असते. संगीत या कलेला इतर कलांपेक्षा, काळ किंवा वेळ हे अजून एक परिमाण लाभलेले आहे.
संगीतकाराला काळाच्या किंवा वेळेच्या पटलावर गाणे लिहायचे असते किंवा चितारायचे असते.
जसा जसा वेळ पुढे जाईल तसे गाणे सादरीकरणाची ही प्रक्रियाही पुढे जात असते. रोज तेवढ्याच
ठिपक्यांची, त्याच गृहिणीने काढलेली रांगोळीची नक्षीसुद्धा वेगळी भासते. तेच रंग वापरताना
सुद्धा, आज हा रंग या ठिकाणी भरावासा वाटतोय तर आज निळा रंग याच चौकोनात छान वाटतोय,
असे गृहिणीने त्याच रांगोळीत घेतलेले स्वातंत्र्य यामुळेही तीच रांगोळी रोज नवीन भासते.
तसेच रागातील स्वरांच्या ठिपक्यांवर, कलाकाराने रागाच्या मर्यादेत भरलेले नवेनवे रंग,
यामुळे ते गाणे प्रत्येकवेळी नवीन भासते. जे सादर करायचे असते ते सर्व कलाकाराला माहिती
असले, तरी ते सांगताना रोज नवीन पद्धतीने सांगितले जाऊ शकते. किंवा एखाद्या वक्त्याला
एकाच विषयावर वेगवेगळ्या दिवशी बोलायला सांगितले तरी त्याचे भाषण तंतोतंत एकसारखे होऊ
शकत नाही, कारण ते वाचन नाही तर ते सर्व उत्स्फ़ूर्त आहे, तसेच संगीतातही आहे. वक्ता
तोच, विषय तोच, त्याचे त्या विषयामधील ज्ञानही तेच असले, तरी उत्स्फ़ूर्त म्हणल्यावर
नावीन्य आलेच. भाव एकच असला तरी, शब्द वेगळे होतात किंवा उर्दूमध्ये ज्याला अंदाजे
बयाँ म्हणजे सांगण्याची पद्धत वेगळी होऊ शकते, अगदी तसेच गाण्याच्या बाबतीत होते. फ़क्त
संभाषणात शब्दांच्या भाषेची आपली ओळख असते तशी स्वरांची भाषा आपण वाचू किंवा लक्षात
ठेवू शकत नाही.
संगीतातल्या मांडणीचे मुख्य दोन भाग करता
येतील. एक म्हणजे बंदिश आणि दुसरा म्हणजे उपज. बंदिश म्हणजे अर्थाप्रमाणेच बंदिस्त
भाग. गायनामधील चीज किंवा बंदिश, वादनातील गत. बंदिश म्हणजे दोन-चार ओळींचे काव्य असते.
ज्याच्या आधारावर रागाची इमारत बांधली जाते. पण बंदिश म्हणजे शब्दरूपी काव्यरूपी रचना
एवढाच अर्थ अभिप्रेत नसून काही गायकीत तर त्या बंदिशीची ’चाल’ ही पण रागरचनेचे मूळ
स्वरूप म्हणून आधारासाठी वापरली जाते. जशी बंदिशीची चाल असेल तेच रागाचे आधारभूत स्वरूप
किंवा तेच खरे चलन आहे असे मानले जाते. पण त्यानंतर रागाचा पाया, बैठक पक्की झाल्यावर
रागाचा विस्तार केला जातो त्याला ’उपज’ असे म्हणले जाते. मूळ राग हा बंदिशीच्या चलना-वलना
प्रमाणे प्रस्थापित झाल्यावर राग विस्ताराची पुढची इमारत ही अगदी कलाकाराला पूर्ण स्वातंत्र्य
असल्याप्रमाणे किंवा त्याच्या मर्जीप्रमाणे मांडली जाते का, तर इथेही गुरुकडून मिळालेली
तालीम, संस्कार, घराण्याची शिस्त या सर्व मर्यादा किंवा वाट अनुसरत पुढे जावे लागते.
हे पुढे जाणे म्हणजे बव्हंशी गुरुंकडून घोकंपट्टी केलेली विद्याच असते. नवीन काही सुचायचे
तर गुरुंचे बोट पकडतच मोठे व्हायचे असते. एकदा गुरुचे पकडलेले बोट सोडून स्वतंत्र चालायची
योग्यता शिष्यात आल्यावर कुठे जायचे, कसे जायचे, पोचण्याचे ठिकाण हे त्या गुरुंनी केलेल्या
संस्कारातच लपलेले असते. शिष्य मोठा झाल्यावर त्या मांडणीत प्रवास कसा करायचा, किती
वेगाने जायचे कुठे थांबायचे याचे स्वातंत्र्य सर्व शिष्याचेच असते. खर तर या सगळ्या
शब्दांच्या पलिकडल्या गोष्टी आहेत, शब्दबद्ध करताना खरंच भंबेरी उडते. वेळेच्या अदृश्य
पटलावरील नादाचा हा खेळ थोडक्यात सांगणे खूपच अवघड आहे. या विषयावर मला असे सुचले.
कोणाला आणखी काही सुचू शकते. यावार साधक-बाधक चर्चा होऊन पुढे जाईल ते संगीतच.
पूर्वप्रसिद्धी : - सकाळ २१ एप्रिल २०१४
Comments
Post a Comment