करोनासूर : काही सूर काही बेसूर ... १

करोनासूर : काही सूर, काही बेसूर ... १ 


एक आटपाट नगर होतं. तेथील सर्व प्रजा सुखाने नांदत होती. एके दिवशी, एक राक्षस आला, त्याचं नाव होतं करोना...

सुरवात तर या गोष्टीची मला अशीच सहज साधी सोपी करायची होती. पण सहज साधी सोपी वाटणारी ही गोष्ट, हळूहळू वाढतंच  गेली, नव्हे तर अजुनही वाढत आहे. पहाता पहाता, गोष्टीतल्या राक्षसाचा आकार, वाढता वाढता एवढा वाढत गेला कि नगरच, नाही तर राज्य, देश इतकंच नव्हे तर सारं विश्वच त्यानं व्यापून काय, चक्क गिळंकृतच केलं. 

संगीत विश्वापुरती ही कथा सांगायची झाली, तर या करोनाच्या राक्षसामुळे इतर क्षेत्रात जशी उलथापालथ झाली, तशी संगीताच्या क्षेत्रातही झाली. मुळात संगीत हा विषयच तसं म्हटलं तर अत्यावश्यक सेवेमधला नाही. सर्वांचे सर्व भागून काही उरले तर संगीत अशी अवस्था !!! 

अशी संगीताची अवस्था असताना करोना चा भस्मासूर अवतरला. मैफली बंद झाल्या. सुरवातीला रोजच्या रुटीन मधून, चला सुट्टी मिळाली,असं म्हणत आपापले राहून गेलेले छंद, स्वैपाक-पाणी, केर-वारे असे कधी न केलेल्या गोष्टीमध्ये मंडळी  रमली खरी, पण सुट्टीचा अवधी जसा वाढत गेला आणि कठीण भविष्याशीच सामना करायला लागणार, अशी वास्तवाची जाणीव व्हायला लागली, तसा कला जगताला, रोजच्या खर्चाशी हात मिळवणी कशी करायची, असा प्रश्न अस्वस्थ करू लागला. 

हॉलमधल्या प्रत्यक्ष मैफली बंद झाल्या आणि डिजिटल मिडीयाच्या आभासी माध्यमाने मैफलींचाच नव्हे तर सर्व व्यवहारांचाच  ताबा घेतला. या करोनाच्या सुरवातीच्या काळात, सोशल मिडीयावर नेहेमी दिसणारी मंडळी, अरे हे तर माझेच ग्राउंड असे म्हणत खूषच झाली. आणि अधिक उत्साहाने कार्यक्रम करू लागली. सुरवातीला या डिजिटल माध्यमातून अर्थार्जन होण्याची काही शक्यता नव्हती, याशिवाय मुख्य म्हणजे या अतिउत्साही मंडळींच्या गर्दीमध्ये जाण्यापासून सुजाण व बुजुर्ग कलाकारांनी स्वत:ला लांबच ठेवले, हेही योग्यच होते. उत्तम तालीम, उत्तम रियाज कष्ट करून मिळवलेली विद्या, माहित नसलेल्या आणि समोर काहीच दिसत नसताना, कुठला प्रतिसाद नसताना, केवळ समोर दिसणाऱ्या कॅमेऱ्याला ऐकवायचे, हे मनोमन पटेना, म्हणूनही ही जाणती मंडळी शांत होती आणि अजूनही आहेत.

होतकरू, होऊ घातलेले कलाकार, यांनी सोशल मिडीयाचा आसरा नव्हे ताबाच घेतला. सकाळी, दुपारी संध्याकाळी केंव्हाही मंडळी आपापले जिवंत(live) कार्यक्रम घेऊन हजर झाली. १०-२०  मिनिटाच्या कलाकारांनी यूट्यूब, फेसबुक, इन्स्टा जिथे मिळेल तेथून आणि तशी आपापल्या कला दाखवायला सुरुवात केली खरी. पण त्या बिचाऱ्या कलाकाराची कला ऐकण्याऐवजी, भलत्याच कारणाने प्रेक्षकांचे मनोरंजन होऊ लागले ! एखाद्या बाल गणेश मंडळाच्या सारखे एखाद्या संस्थेचे नाव घ्यायचे, जरा जादा आत्मविश्वासाने इंग्रजीत आभार प्रदर्शन करून सुरवात करायची, कि मग ऐकणाऱ्या श्रोत्यांना कलाकार बरा असावा असे वाटू लागते. एकूण १५-२० मिनिटातली पाचएक मिनिटे ऐकू येतंय कि नाही, हे विचारण्यातच जायची. सादर करण्याची मिनिटे आणि ऐकणाऱ्यांचा आकडा अगदी सारखाच असे ही गोष्ट वेगळी !!! कार्यक्रम सुरुवातीला घरातूनच ‘शूट’ करत असल्यामुळे मागील पडद्यासाठी, एखादी छानशी दांडीवर वाळत घालतो, तशी वाकडीतिकडी चादर किंवा साडी !! कलाकाराच्या नाकपुड्या दिसतील असा कॅमेऱ्याचा अजब अँगल. बऱ्याच वेळा अशा चर्चा, मुलाखतींमध्ये आवाज कमी जास्त होतो, तर मध्येच केंव्हातरी तो आवाज शोलेतल्या वीरुसारखा, नळकांड्यातून बोलल्याप्रमाणे येतो. कोणी बनियानवर, कोणी टीशर्ट, बर्म्युडा अशा घरच्याच कपड्यात.. कधी कधी तर लाईव्ह चालू झाले आहे हे त्या कलाकाराला न कळल्यामुळे होणारी मजा.. अशा ‘थाटात’ live कार्यक्रमांची सोशल मिडीयावर सुरु झालेली रेलचेल अजूनही थांबायला तयार नाही. 

एखादा उत्तम कलाकार व्हायचे असेल तर  त्यासाठी विद्या मिळवायची, त्यावर भरपूर रियाज करायचा, चिंतन करायचे, मग तो कलाकार म्हणून सिद्ध होणार व मग प्रसिद्ध !!! कार्यक्रम मिळवण्यासाठी किती आणि कशी मेहनत घ्यावी लागते, या सगळ्या पायऱ्या विसरून, कॅमेरा चालू केला कि झाला कलाकार !!! कलाकार होणं हे खरंच किती सोपं आहे !!! उत्तम कलाकार होण्यासाठी उगीचच कलाकार वर्षानुवर्षे रियाज करतात, हे वाटणाऱ्यांची संख्या अजूनही कमी न होता वाढते आहे, हे दुर्दैवी तर आहेच, पण कलेच्या दर्जाच्या दृष्टीने विचार करायला लावणारे आहे आणि हे ज्या दिवशी किंवा ज्या दिवसापासून समजायला लागेल, त्या दिवसाची खरे रसिक आतुरतेने वाट पहात आहेत.  


हेमकांत नावडीकर

navdikar@gmail.com

9823054241

Comments

  1. खूप छान लिहीले आणि सत्य आहे

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद...

      Delete
    2. एक सतावणारा प्रश्न : खर्याखुर्या कलावंतांच्या अर्थार्जन व ऊपजिविकेबद्दल का कोणी बोलत नाही?

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान ...

मार्दवपूर्ण गाण्यांचे माळपदक : माणिक वर्मा

कुमार नावाची चिरतरुण मैफल