करोनासूर : काही सूर, काही बेसूर...३

 करोनासूर : काही सूर, काही बेसूर...३


हळूहळू करोनाला मंडळी घाबरेनाशी झाली. करोनानेच मरण यायचे तर उपाशी पोटी मारण्यापेक्षा काय होईल ते होऊ दे अशी मानसिकता सर्वांचीच होऊ लागली. करोनाचा बहर हळूहळू ओसरू लागला, असे वाटून घ्यायला हरकत नाही, अशी चिन्हे दिसू लागली. त्यावरील प्रतिबंधक लस दृष्टीपथात आली आहे असे वाटू लागले. डिजिटल मिडीया, डिजिटल मैफलींच्या आभासी जगाची रसिक प्रेक्षकांना सवय होते आहे असे कार्यक्रमाच्या संयोजकांना वाटू लागले आणि आभासी मैफली तिकीट लावून करण्यासाठी  प्रयत्न होऊ लागले,जे कलाकारांसाठी खूप स्वागतार्ह होते. पण त्यालाही रसिकांनी हवा तसा प्रतिसाद दिला नाही असेच म्हणावे लागेल. आजही आभासी किंवा व्हर्चुअल कार्यक्रमांची रेलचेल दिसते. त्यातही विनामूल्य आणि प्रवेशमूल्यासहित असे दोनही पर्याय प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहेत. पण तिकीटवाल्याच काय पण विनामूल्य कार्यक्रमांनाही म्हणावा तसा प्रेक्षकवर्ग आहे असे वाटत नाही. कलाकारांच्या दृष्टीकोनातून किंवा त्यांच्या भविष्यासाठीही हे जरी हे ठीक नसले, तरी वास्तव नाकारताही येत नाही. रोज सकाळपासून अनेक गृप्सवर सतत अनेक कार्यक्रमांच्या असंख्य जाहिराती येत असतात. भारताच्या विविध कानाकोपऱ्यातून, कोणी कर्नाटकातून तर कोणी कोलकात्याहून तर कोणी कुठून असे अनेक कार्यक्रम रोज घडत आहेत. पहाणार तरी किती. मग अशा कार्यक्रमामध्ये कितीही लोकप्रिय कलाकरांचा सहभाग असला तरी प्रेक्षकांची संख्या, तीन आकडी गाठण्यासाठी सुद्धा खूप आटापिटा करावा लागतो. मग सर्वसाधारण कलावंतांना ऐकणारे प्रेक्षक जेमतेम ५० च्या ही पुढे नसतात. या सर्वामध्ये एकच चांगले आहे कि, कलाकार कोणीही असो, त्याला अर्थार्जन होवो अथवा न होवो, किमान थोडीफार प्रसिद्धी तरी मिळते आहे हेही नसे थोडके...  

या आभासी मैफलींमध्ये उपस्थिती कमी असण्याची काय कारणे असतील बर, हे तपासायला हवे. एकतर या करोनाची दहशत अजून संपली नाहीये. आणि खरं सांगायचं तर दहशतीच्या वातावरणात कोणीही कोणत्याच कलाकृतीचा आस्वाद मनापासून, निर्धोकपणे घेऊ शकत नाही. सर्वसामान्यांची मानसिकता वास्तवाच्या चटक्यातून सावरली नाहीये, त्यामुळे जे खरोखरच संगीतवेडे आहेत, तेवढेच फक्त अशा आभासी कार्यक्रमांना उपस्थित रहात असावेत. पूर्वी सर्व काही सुरळीत असताना मोफतच्या कार्यक्रमांसाठी, चला जरा संध्याकाळी चक्कर मारून येऊ आणि येता येता थोडी श्रवणभक्तीही करून येऊ, असे म्हणत कार्यक्रमांना उपस्थित राहणारा जो वर्ग होता, तो वर्ग संध्याकाळ झाली आहे, जरा आता कॉम्प्यूटर लावून कोणाचे तरी गाणे किंवा संगीत ऐकूया, असे म्हणेल असे वाटत नाही. त्यातही कॉम्प्यूटर किंवा मोबाईल वर ऐकणारा टेक्नोसॅव्ही श्रोतृवर्ग अजूनही खूप मोठ्या प्रमाणात तयार झाला नाहीये आणि संगीताचा श्रोतृवर्ग, अजूनही या तंत्रज्ञानाला सरावला आहे असे वाटत नाही. मोबाइलच्या अति वापरापासून सुटका होण्यासाठी कुठे बाहेर कार्यक्रमाला जावे, तर कार्यक्रमही मोबाईलमध्येच पहायचा म्हणाल्यावर श्रोते साहजिकच कंटाळा करणारच. प्रत्यक्ष मैफलीत तेथील भोवतालचे वातावरण, मोकळी हवा, ओळखीचे भेटणारे चार मित्र, असे सगळेच त्या संगीताबरोबर मोफत होते. जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत सर्व काही सुरळीत होण्याच्या दिशेने चालले असे वाटत असतानाच, पुन्हा या करोनाचा उद्रेक पहायला मिळतो आहे. पुन्हा दुसरी लाट ... या राक्षसाला वेसण घालणे अवघड होत चालले आहे.... कलाकार व त्यावर आधारित असलेल्या व्यवसायांनी काही पर्याय शोधणे गरजेचे आहे.... पर्याय काय असतील, कसे शोधायचे हे सगळे आपणा सर्वांना ठरवायला हवे. प्रश्नपत्रिकाही आपण काढायची आणि उत्तरेही आपणच शोधायची असाच हा प्रकार असणार आहे. संकट खूप मोठे आहे. प्रश्नपत्रिका फक्त मागील अभ्यास्क्रमावरची असून चालणार नाहीये तर भविष्यात तिसरी लाट आली तर यालाही तोंड देण्याची तयारी करायला हवी. कलाकारांचीच काय सर्वांची प्रश्न व प्रश्नपत्रिका बिकट आहे खरी...


हेमकांत नावडीकर

navdikar@gmail.com

Comments

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान ...

मार्दवपूर्ण गाण्यांचे माळपदक : माणिक वर्मा

कुमार नावाची चिरतरुण मैफल