करोनासूर : काही सूर, काही बेसूर...२
करोनासूर : काही सूर, काही बेसूर...२
हळूहळू करोनाचा प्रादुर्भाव वाढत होता. अशा प्रकारचे संकट साऱ्या जगालाच नवे होते, काय उपचार करायचे, हे वैद्यकीय क्षेत्रालाही समजत नव्हते. प्रतिबंधित क्षेत्रे वाढत होती, सर्व जण जीव आणि नाक मुठीत धरून वावरत होती. आज हा बाधित झाला, अमक्याचा तमका करोनाने दगावला, अशा भीतीदायक वातावरणात कोणालाच काय करायचे हे समजेनासे झाले होते. हे संकट लवकर संपण्याची चिन्हे दिसत नव्हती. सर्वत्र गोंधळाचे वातावरण असताना, छप्परावरील व्हायोलीन वादकाप्रमाणे (Fiddler on the Roof) डिजिटल मिडीयावर छोटे मोठे कलाकार आपापली कला मांडत मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत होते.
या डिजिटल माध्यमातून एक मात्र झाले कि डिजिटल कलाकारांची नवी पिढी मात्र उदयाला येऊ लागली. कोई भी चीज अशासारख्या मंडईतल्या वस्तू सारखी, कोई भी चीज ( कोणतीही चीज !!! ) मग ती ख्यालाची असो किंवा ठुमरी दादरा किंवा भजन असो, दहा-वीस मिनिटात मांडणाऱ्या कलाकारांचा उदय झाला. नुसत्या कलाकारांचाच नव्हे, तर अनेक संगीतज्ञ ही उदयाला येऊ लागले. जणू वर्षानुवर्षे कधीच चर्चिल्या न गेलेल्या विषयांवर सकाळ संध्याकाळ चर्चा घडू लागल्या. एकदा फेसबुक उघडले कि किमान ५-१० कलाकारांची मैफल व अनेक संगीतज्ञान्ची संगीतातल्या अनेक विषयांवरील प्रदीर्घ चर्चा हमखास दिसणारच. हे अचानक सोशल मिडीयावर दिसू लागलेले संगीतज्ञ, इतके दिवस कुठे लपले होते कोण जाणे. कोई भी ‘चीज’ दहा-वीस मिनिटेवाल्या, या कलाकारांना मिनी कलाकार म्हणायला हरकत नाही. बरं, इन्स्टाग्राम सारख्या माध्यमावर सहजासहजी एक-दोन मिनिटांचा व्हिडिओ टाकता येतो. तेवढा या मिनी कलाकारांना पुरतो देखील ! कोई भी चीज घ्यायची आणि त्यात चार-पाच ताना मारल्या कि लाईक्स सुरु !!! अशाच एका मिडीयावर, एक तर अशा ताकदीच्या कलाकार आहेत कि त्या वेणी घालता घालता पण ताना घेऊ शकतात !!! मिनी कलाकार, मिनी मैफल आणि मिनी आनंद (यातल्या मिनी शब्दातील मम काढून शब्द मिनी केला आहे !!!) म्हणजे मॅक्झीमम प्रसिद्धी !!! असे सोपे त्रैराशिक या पुढे नव्या जमान्यातील नव्या कलाकारांनी एव्हाना चांगलेच माहिती झाले असेल.पण प्रसिद्धीची खरी गरज ही नव्या पिढीपेक्षा, जुन्या जाणत्या व केवळ संगीत हाच ध्यास असलेल्या कलाकारांनाच अधिक आहे असे वाटते, त्यामुळे खरंतर हे त्रैराशिक त्यांनीच लक्षात ठेवायची अधिक गरज आहे !!!
लाईक्स मिळवणे आणि वाहवा मिळवणे या दोन संपूर्ण भिन्न गोष्टी आहेत हे समजेल तो सुदिन. सोशल मिडीयावर एखादा फोटो, एखादा व्हिडिओ टाकला कि पुढच्या क्षणापासून 'लाईक माइंडेड' पिढीकडून लाईक्स मिळायला सुरवात होते. मात्र एका कलाकाराला, एका प्रेक्षकाकडून एक वाहव्वा मिळवायला जन्मभर झिजावे लागते ...
हेमकांत नावडीकर
navdikar@gmail.com
Comments
Post a Comment