अभिजात संगीताची प्रभा - डॉक्टर प्रभा अत्रे


डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या सहस्रचंद्र दर्शनानिमित्त ९ सप्टेंबर २०१२ साली  दै. सकाळ मध्ये पूर्व प्रकाशित झालेला लेख.... 


अभिजात संगीताची प्रभा

          मैफलीचे सभाग्रह श्रोत्यांनी तुडुंब भरलेले असते. श्रोते मुख्य कलाकाराची आतुरतेने वाट पाहत असतात. निवेदकाने.... आणि स्वरमंचावर विराजमान होत आहेत डॉक्टर प्रभा अत्रे.... असे म्हणताच संपूर्ण  सभागृहात एक हुंकाराची लहर उमटते. जरीकाठाची शुभ्र किंवा मोतिया रंगाच्या साडीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण पेहरावातील त्यांचे  प्रसन्न व्यक्तिमत्व, मंचावर पाहताक्षणीच त्यांच्यातल्या  असामान्यत्वाची जाणीव करून देते. त्यांनी केलेल्या साधनेचे तेज, त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवते. वाद्यांचा स्वरमेळ नीट जुळता जुळता, एव्हाना सर्व सभामंडप प्रभाताईंच्या प्रभावळीमध्ये नकळत आकर्षिलेला असतो. प्रभाताई काय गाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचते. यमन, मारूबिहाग, जोगकौंस सारख्या भरभक्कम रागाने मैफलीला रंग भरण्यास सुरुवात होते. पहिल्याच समेला माना डोलायला लागतात, तर जाणकार श्रोते, हाताने सम दाखवायला लागतात. हे चित्र जरी खूप सुंदर दिसत असलं, तरी प्रभाताईंनी केलेल्या खडतर तपश्चर्येचे हे फळ आहे, हे विसरून चालणार नाही. सुरेशबाबु माने, गानहीरा हिराबाई बडोदेकर यांसारख्या दिग्गजांकडून मिळालेले उत्तम मार्गदर्शन, त्यांनी दिलेली गाण्यातील नजर,  याचबरोबर स्वतः केलेला रियाज, चिंतन, गायलेल्या, गाजवलेल्या असंख्य मैफिली, जगभर केलेला प्रवास, या सर्वातून डॉक्टर श्रीमती प्रभा अत्रे हे समृद्ध सांगीतिक व्यक्तिमत्त्व घडले व त्यातूनच त्यांनी स्वतःची एक खास रसिकमान्य you शैली निर्माण केली.

          गुरुची विद्या आत्मसात करायची, भोवतालच्या गायकांचे त्यांच्या गायकीचे निरीक्षण करायचे, त्या सर्वांचा स्वतःला पटेल, असा तर्कसंगत अर्थ काढून, नवीन विचार मांडायचे म्हणजे केवढे धाडस. चित्रकाराला त्याच्या कलेच्या प्रकटीकरणासाठी कॅनव्हास असतो, मूर्तिकाराला मूर्ती घडवण्यासाठी दगड रुपी वस्तू असते, पण गायकाला त्याचे गायनाद्वारे व्यक्त होताना, असते ती रागाची चौकट , असे म्हणावे, तर ती चौकट म्हणजे केवळ हवेत विरणार्‍या ध्वनिलहरी ! या सर्वातून रागांचे स्वरूप, राग रसांचा मनोरा रचायला तशीच ताकद हवी. या सर्व अमूर्तापेक्षाही, अनाहाताचा म्हणणे अधिक योग्य. हा आहत-अनाहताचा मामला प्रभाताईंनी आपल्या शैलीमध्ये अतिशय मनोज्ञपणे सांभाळला आहे.
         
                                                                  प्रकाशचित्र - श्री नंदन वांद्रे यांच्या सौजन्याने

          प्रभाताई १३ सप्टेंबर रोजी ८१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत, त्यांच्या गायनामधून सहस्र चंद्राच्या प्रकाशा इतकीच उज्ज्वल प्रभा प्रभावीपणे प्रकटली आहे. त्यांचा शिष्यवर्ग, होतकरू गायिका, इतकेच काय रसिकांच्याही अनेक पिढ्या प्रभाताईंच्या मारू बिहाग आणि कलावती रागांच्या ध्वनिमुद्रिकांवर वाढल्या आहेत. त्यांच्या या ध्वनिमुद्रिका आजच्या भाषेत सांगायचे झाले तर भारतीय संगीतातील टॉप टेन मध्ये गणल्या जाणाऱ्या आहेत.

          कलाकाराला मोठेपण चिकटले की अनेक कलाकार आमच्या इतक्या पिढ्या या क्षेत्रात आहेत किंवा होत्या सांगण्याची अनाठायी धडपड करताना दिसतात. प्रभाताईंना असे काही करावे लागले नाही, कारण तसे काही नव्हतेच. पुण्यामध्ये विजय करंदीकरांच्या सुरुवातीच्या शिक्षणानंतर, हिराबाई बडोदेकर यांचे बंधू सुरेशबाबू माने यांच्याकडचे त्यांचे शिक्षण हेच मोलाचे ठरले. अनेक वर्षे त्यांनी फक्त यमनच शिकवला. यमनची तालीम कधी संपलीच नाही, असे खुद्द प्रभाताईच सांगतात. सुरेश बाबुंनी  सरधोपट मार्गाने  रागसंगीत न शिकवता, शास्त्रीय संगीतातील खजिन्याचे विस्तृत दालन  मोकळे करून, आयुष्यभर पुरेल एवढी शिदोरी दिली. मुख्य म्हणजे गाण्याकडे  कसे बघायचे याची नजर दिली. सुरेश बाबूंनी त्यांना काय आणि कसे शिकवले, हे प्रभाताईंनी एके ठिकाणी खूप छान लिहीले आहे. त्या लिहितात, 'बाबुरावांनी मला चालायला शिकवले, दृष्टी दिली, पण अमक्याच मार्गानी जा, असे सांगितले नाही. जीवनाकडे एका रसिल्या हळुवार वृत्तीने पहायचे, एवढे त्यांनी सांगितले, पण अमुकच पहा असा आग्रह धरला नाही. सुरांचे रंग दिले, लयीचे कुंचले दिले, पण अमुकच चित्र काढ असं सांगितलं नाही.' स्वतःच शिकवलेल्या विद्येकडे, तू माझ्या नजरेने पाहू नकोस असे सांगणारा व गाण्याकडे स्वतंत्र विचाराने पाहण्याची संथा देणारा द्रष्टा गुरु असल्यावर प्रभाताईंच्या सांगीतिक जडणघडणीमागचे मर्म वेगळे उलगडून सांगण्याची गरजच नाही.

          सुरेशबाबु प्रभाताईंना सांगत, 'अशा खुबीने गा, की श्रोत्यांना त्यांच्याबरोबर काही नेता येऊ नये. आठवण रहावी तर फक्त धुंदीची !!! ' असं शास्त्र तर सुरेशबाबूंनी प्रभाताईंना शिकवलंच पण त्या तंत्रात न अडकता त्यापलीकडे त्यातील रस, रंग, यांचा कलात्मक विचारही व्हायला हवा, याचं भानही दिलं. सुरेशबाबूंच्या  निधनानंतर हिराबाईंनी प्रभाताईंना जवळ केले. त्यावेळी हिराबाई कलाकार म्हणून उत्तुंग शिखरावर होत्या. त्यांचे देशभर गायनाच्या कार्यक्रमांचे दौरे सुरू असत. प्रभाताई हिराबाईंच्या मागे कधी तंबोऱ्याला बसत, तर हिराबाई त्यांना समोर बसवूनही शिकवत असत. प्रत्यक्ष सादरीकरण कसं करायचे, ही काही शिकवता येत नाही, पण त्यांच्या मागे तानपुऱ्याला बसता बसता  सादरीकरणाची प्रक्रिया जवळून पाहता आली आणि  त्यांचं गाणं अधिकाधिक समृद्ध होत गेलं.

          एकीकडे गाणं करता करता प्रभाताईंनी सहज म्हणून आकाशवाणीमध्ये अर्ज दिला व लगेच रूजूही झाल्या. आकाशवाणी सारखं माध्यम प्रभाताईंना हाताळावंसं  वाटलं, कारण त्यांच्यामध्ये एक अॅकॅडमीशियन म्हणजे विद्याभ्यासाची आवड असलेला पैलू दडलेला आहे. आकाशवाणीच्या माध्यमातून त्यांना अनेक कलाकारांना जवळून पाहता आले. उस्ताद बडे गुलामअली खान उस्ताद अमीरखा साहेब, यांच्या सारखी महान व्यक्तिमत्त्वं  जवळून पाहता आली अमीर खाँसाहेबांच्या शैलीचा तर प्रभाताईवर खूप मोठा प्रभाव आहे. आकाशवाणीवर कार्यक्रम, संगीतिका, इत्यादींच्या निमित्ताने नवीन रचना करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानिमित्ताने नवनवीन  प्रयोग करायला मिळाले. नवीन राग, बंदिशींच्या रचना करण्यासाठी आकाशवाणी, ही प्रभाताईंच्या दृष्टीने एक  प्रयोगशाळाच ठरली. स्वतंत्र विचार करता करता स्वतः आत्मसात केलेली विद्या, अभ्यास, चिंतन, संस्कार, या सर्वांमुळे पारंपारिक बंदिषींमधून स्वतःला व्यक्त होताना त्यांना काहीतरी अपूर्ण वाटू लागलं, आणि मधुराकौंस, शिवकली, अपूर्व-कल्याण, दरबारीकंस अशा रागांची आणि अनेक बंदिशींची निर्मिती झाली.

                                                                 प्रकाशचित्र - श्री नंदन वांद्रे यांच्या सौजन्याने


          प्रभाताई या उत्तम लेखिकाही आहेत. एक संवेदनशील कलाकार, विचारवंत, विद्याभ्यासू रचनाकार आणि गुरु, असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. प्रत्येक भूमिकेत प्रभाताईंनी स्वतंत्र ठसा उमटवला आहे. लेखनाकडे त्या वळल्या आणि 'स्वरमयी', 'स्वराली', 'स्वररंगी', हे ग्रंथ आणि 'अंतःस्वर' हा कवितासंग्रह त्यांच्याकडून लिहून झाला. स्वरमयीला राज्य पुरस्कार मिळाला. या पुस्तकाच्या अनेक आवृत्या  निघाल्या.

          आपल्या संपूर्ण मैफलीच्या प्रक्रियेविषयी अनेक महत्त्वाच्या विषयांना स्पर्श करत, स्वतःच्या संगीत विषयक धारणांबद्दल, या ग्रंथांच्या माध्यमातून श्रोत्यांशी मुक्त संगीत-संवाद करण्यामागे, प्रभाताईंची प्रामाणिक तळमळ दिसून येते. संगीत विषयक हे त्यांचे ग्रंथ त्याची साक्ष देतात. संगीत क्षेत्रातून निवृत्त होण्याअगोदर, म्हणजे एकीकडे कार्यक्रम सुरू असतानाच, प्रभाताईंनी हे सर्व लेखन केले.

          स्वतःच्या लेखनाविषयी त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे, लिहिणे हा, माझ्या गाण्याचाच एक अविष्कार आहे. इथे प्रभाताईंचा एक मुद्दा, आवर्जून अधोरेखित करावासा वाटतो, त्या म्हणतात रियाज कसा करावा, हा गुरुमंत्र बडे गुलाम अली खाँ यांच्याकडून घेता आला असता, तर कला साधनेतील कितीतरी अपघात टळले असते. खरोखरच 'कला साधनेतील अपघात' याकडे आज पर्यंत कोणाचच कसं लक्ष गेलं नाही याचं आश्चर्य वाटतं. या अपघातांमुळे अनेक कलाकार, विद्यार्थी, याचं आयुष्यभराचं न भरून येणारे नुकसान झाले आहे. गायकांचे आवाज खराब होणे, न फिरणारा गळा, चुकीची तालीम, तबलजींचे हात वेडेवाकडे बसणे, अशा कितीतरी प्रकारच्या अपघातांमुळे अनेक विद्यार्थ्यांना, कलाकारांना संगीत साधनेच्या मार्गावरून अर्ध्यावरून परतावे लागले आहे. या मुद्द्याला स्पर्शिल्या बद्दल प्रभाताईंना शतशः धन्यवाद द्यायला हवेत.

          प्रभाताईंचं विद्यादानाचं कार्य अजूनही जोमाने सुरू आहे. पुण्यात संभाजी बागेजवळच्या स्वरमयी गुरुकुल इथे अनेक मान्यवर, तसेच अनेक तरुण प्रतिभावान  कलाकारांसाठी त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. गेल्या काही वर्षात तिथे अनेक कलावंतांनी आपली कलाही सादर केली आहे.

          ज्येष्ठ तबलावादक कै पंडित अरविंद  मुळगावकरांचे गुरु  उस्ताद अता हुसेन खाँ, म्हणजे एक बुजुर्ग आणि व्यासंगी  तबला वादक. रामपूर सारख्या छोट्या खेड्यात राहिलेले. तबल्याशिवाय दुसरे जग त्यांना माहीत नाही. लौकिकार्थाने अशिक्षित. पण एका मुलाखतीमध्ये उस्ताद अता हुसेन खान यांना एक प्रश्न विचारण्यात आला, 'सध्या तुमच्याकडे कोण शिकायला येतं ?' यावर या अशिक्षित पण मर्मज्ञ विद्वानाने दिलेले मोठे उत्तर मार्मिक होते. ते उत्तरले होते, 'जो होष मे हैं वो आते है !!!' उस्ताद अता हुसेन खां यांच्याच धर्तीवर म्हणावेसे वाटते कि, अधिका-अधिक बेहोश मंडळींनी होशमध्ये यावं आणि एवढी साधना, व्यासंग केलेल्या प्रभाताईंकडून तालीम घेऊन, गाणं सादर करावं ....
प्रभाताईंनी त्यासाठी शतायुषी व्हावे... 
                       
हेमकांत नावडीकर
navdikar@gmail.com

Comments

  1. इतका सुंदर आणि ओघवत्या शैलीत लिहिलयस.आपल्या ग्रुप वर का टाकला नाही?

    ReplyDelete
    Replies
    1. आपले नाव कळू शकेल काय ???

      Delete
    2. अत्यंत सुंदर लेख.

      Delete
    3. मनापासून आभार 🙏🏻

      Delete
  2. किती छान लिहिता तुम्ही हेमकांत !!!

    ReplyDelete
  3. फार सुंदर लिहिले आहे लेखकाने.. सहज.. सुंदर.. सोपी पण तरीही ओघवती भाषा शैली... संपूच नये हा लेख असे वाटत होते.. अतिशय सखोल अभ्यास करून लिहिले आहे लेखकाने.. 👌👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप छान शब्दात कौतुक केल्याबद्दल मनापासून धन्यवाद ..

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान ...

मार्दवपूर्ण गाण्यांचे माळपदक : माणिक वर्मा

कुमार नावाची चिरतरुण मैफल