साधनेत रमणारा तबलावादक : पं. आनिंदो चटर्जी
पंडित आनिंदो चटर्जी यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने २००३ साली सकाळ वृत्तपत्रासाठी घेतलेली मुलाखत..
आज ३० मे रोजी त्यांचा वाढदिवसानिमित्त पंडितजींचे हार्दिक अभिष्टचिंतन...
साधनेत रमणारा तबलावादक : पं. आनिंदो चटर्जी
प्रसिद्ध
तबलावादक उस्ताद गुलाम रसूल खान यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त विख्यात वादक
पंडित आनिंदो चटर्जी यांच्या तबला वादनाचा
कार्यक्रम नुकताच पुण्यातील भरत नाट्य मंदीरात आयोजित करण्यात आला होता. पुण्यात
बर्याच कालावधीनंतर व संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाल्यानंतर प्रथमच त्यांचा
कार्यक्रम झाल्याने, रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. सुमारे दोन तास चाललेले अत्यंत
दर्जेदार व प्रभावी वादन ऐकून ‘श्रुती धन्य जाहल्या’ अशीच सर्व श्रोत्यांची भावना होती.
श्रेष्ठ
गुरूंकडून प्राप्त केलेली दर्जेदार व घराणेदार विद्या, व ती विद्या खऱ्या
अर्थाने हस्तगत करण्यासाठी घेतलेली मेहनत, यामुळे वादनात
आलेली कमालीची सहजता, बोलांचा सुंदर निकास, या साऱ्याचा परिणाम संमोहित करणारा होता. जीव तोडून केलेली मेहनत, ज्याला संगीताच्या भाषेत जानमारी म्हणतात, अशा अनेक
वर्षांच्या खडतर साधनेमुळे, तेजाने तळपणारे त्यांचे
तबल्यावरील बोल ऐकताना, जणू अग्निफुलांचा वर्षाव होतो आहे,
असा भास होत होता. त्यादिवशी उपस्थित असलेल्या रसिकांना, पंडित आनिंदो चॅटर्जी यांच्या वादनामुळे मिळालेला आनंद व्यक्त करण्यास
खरोखरच शब्द अपुरे वाटत होते.
या
कार्यक्रमाच्या निमित्ताने, अनिंदोदादांशी झालेल्या संवादातून, प्रकर्षाने जाणवत होते, ते त्यांचे
तबल्याशी पूर्णपणे एकरूप झालेले, साधे, नम्र व निगर्वी व्यक्तिमत्व. संगीत त्यांच्या घरातच होते. आई-वडीलांनी ‘पाचू गोपाल’ या देवतेला बोललेल्या नवसाने झालेले पोर,
म्हणून पाचू गोपाल हेच त्यांचे नाव घरच्यांनी ठेवले. पुढे
विश्वविख्यात सतारवादक पंडित निखिल बॅनर्जी यांनी त्यांचे ‘आनिंदो’
असे नामकरण केले. पण अनिंदोदादांना घडवले, ते त्यांचे
काका विश्वनाथ चटर्जी यांनी. खेळणे, बागडणे, मित्रांशी गप्पा-टप्पा करणे, या साऱ्यापासून दूर
ठेवून, तासन तास तबल्याचा रियाज करून घेतला. साधनेचे महत्त्व
त्यांच्यावर बिंबवले. पाचव्या सहाव्या वर्षी बालकलाकारांच्या स्पर्धेत ज्यावेळी
आनिंदोंनी वाजवलं, त्यावेळी तिथे पंडित ज्ञानप्रकाश घोष
उपस्थित होते. त्यावेळचे अनिंदोंदादांचे वादन ऐकून, ज्ञानबाबूंनी
केवळ सहाव्या वर्षी त्यांना आपल्या शिष्य परिवारात दाखल करून घेतले. तेव्हापासून
अनिंदोंनी ज्ञानबाबूंकडून अखेरपर्यंत
तालीम घेतली.
पंडित ज्ञानप्रकाश घोष म्हणजे
बंगालमधील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. फरुखाबाद घराण्याची विद्या त्यांनी सर्व
शिष्यांना मुक्त हस्ताने वाटली. पं. कान्हाई दत्त, पं. शंकर घोष, पं. अजय
चक्रवर्ती, अभिजित बॅनर्जी आणि असे अनेक शिष्योत्तम त्यांनी तयार केले. लखनऊ घराण्याचे उस्ताद आफाक हुसेन
यांच्याकडूनही अनिंदोदादांना काही वर्षे तालीम मिळाली. आजही त्यांच्या वादनात
पहिल्यापासून शेवटपर्यंत, वादनाचा आणि फक्त वादनाचाच आनंद मिळतो. कारण कोणत्याही गिमिक्स नाहीत,
चमत्कृती नाहीत, अंगविक्षेप नाहीत. वादनात
सहजता इतकी कमालीची, की अर्ध्या भागाचा फोटो काढला, तर वर्तमानपत्र वाचत आहेत असं वाटावं !
मुंबईला
१९६८ साली ‘कल के कलाकार’ मध्ये त्यांनी सोलो तबलावादन सादर केलं, त्यावेळी अनिंदोदादा
फक्त १४ वर्षांचे होते. तेंव्हाच त्यांना तालमणी हा किताब मिळाला. त्या
कार्यक्रमाला महान तबलावादक पंडीत सामता प्रसाद उपस्थित होते. त्यांनी त्या वेळी
केलेले कौतुक आनिंदोंना अधिक महत्त्वाचे वाटते. त्यानंतर अनिंदोदादांनी मागे वळून
पाहिलंच नाही. त्यानंतर अनिंदोदादा, पंडित
निखिल बॅनर्जींच्या सहवासात आले आणि त्यांची साथ-संगत करत जगभर दौरे सुरू
झाले. पंडित रविशंकर, उस्ताद अली अकबर अकबर खान अशा दिग्गजांबरोबरही त्यांना अनेक वेळा
वाजवण्याचे भाग्य लाभले. त्याचबरोबर जगभर त्यांचे सोलो वादनाचे कार्यक्रमही सुरू
झाले. अनेक पुरस्कार, बक्षिसे, मानसन्मान
मिळाले. पण या सर्वांपेक्षा अधिकारी पुरुषाकडून मिळालेली कौतुकाची थाप, त्यांच्या लेखी जास्त महत्त्वाची आहे. उस्ताद अल्लारखा यांच्यासमोर
वाजवल्यावर, दुसऱ्या दिवशी खांसाहेबांनी प्रेमाने स्वतःच्या
हातांनी बनवलेली बिर्याणी अनिंदोदादांना खिलवली, याचं त्यांना अधिक अप्रूप वाटतं.
रियाज करा, खूप रियाज करा, चांगलं
वाजवा, यापलीकडे त्यांच्याकडे सांगण्यासारखं खरंच अधिक काही नाही.
विद्यार्थ्यांनी साधना कशी केली पाहिजे, असं विचारल्यावर ते म्हणाले, कि किमान पंधरा वर्ष, साधना केल्याशिवाय इकडे तिकडे
कुठेही विद्यार्थ्यांनी पाहू नये, फक्त साधनेवरच लक्ष
केंद्रित करावे. आपल्या हाताचा नाद, आवाज, कसा उमटतो, हे ऐकत रियाज करावा. ‘तबलेके हर स्ट्रोक
में भावना होती है’ हे मर्म समजून घेऊन वादन करायला हवे. तबल्याच्या
प्रत्येक बोलावर प्रेम करत मेहनत करायला हवी. प्रत्येकाचे स्वतंत्र व्यक्तिमत्व
तबल्यामधून दिसायला हवे व ते दिसण्यासाठी जवळ जवळ तीस वर्षांची मेहनत हवी, आणि खरोखरच या विधानाची सार्थता त्यांच्यासारख्या श्रेष्ठ कलाकाराच्या
वादनातून क्षणोक्षणी जाणवत रहाते.
संगीत
नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाल्यावर तुमची प्रतिक्रिया काय होती, हे विचारल्यावर ते
म्हणाले, या पुरस्काराने सहाजिकच आनंद झाला आणि अधिक आनंद
झाला, तो अशासाठी की, हा पुरस्कार फक्त
संगीतात काम करणाऱ्यांनाच दिला जातो. त्यामुळे पद्म पुरस्कारापेक्षाही, हा पुरस्कार मला मानाचा वाटतो. त्यांच्या वादनातून, बोलण्यातून,
प्रकर्षाने जाणवलं, ते त्यांचं अभ्यासू
व्यक्तिमत्व. या तबला महर्षीच्या वादनातील प्रखरता त्यादिवशी सर्वांनीच अनुभवली,
ती दीर्घकाळ लक्षात राहावी अशीच होती.
हेमकांत नावडीकर
navdikar@gmail.com

त्यांच्या वादन, विद्या व रियाज याचे उत्तम वर्णन हेमकांतने केले आहे.
ReplyDeleteपंडीत आनंदजी बदामीकर धन्यवाद...
DeleteVery nicely written. This is an inspiration for all of us.
ReplyDeleteThanks 🙏🙏🙏
Delete