कुमार नावाची चिरतरुण मैफल

२०१२ साली कुमारजींच्या जन्म दिनाचे निमित्ताने मटामध्ये प्रसिद्ध झालेला लेख....


कुमार नावाची चिरतरुण मैफल ... 


       पूर्वीच्या काळी म्हणजे किमान तीस चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत, नामांकित, बुजुर्ग गायकाची खासगी किंवा छोटेखानी मैफल फारशी दुर्मिळ गोष्ट नव्हती. मोठे कलाकार हे आज इतके मोठे झाले आहेत, की त्यांची सर्वसामान्य श्रोत्यांशी असलेली नाळ तुटल्यासारखीच अवस्था झाली आहे. मोठया, किंवा स्टार कलाकारांची खाजगी किंवा छोटेखानी मैफल ही आता विस्मृतीतच गेलेली गोष्ट झाली आहे खरी. आणि आजच्या कलाक्षेत्राचा एकूण व्यवहार पाहता, तो ही या    कालचक्राचा माहिमाच म्हणायचा. पूर्वी कलाकाराने आज मी तुम्हाला अमुक एक राग ऐकवतो, असे म्हटल्यावर, अरे, खरेच आपण हे ऐकूया किंवा ऐकायला पाहिजे, असे श्रोत्यांना मनापासून वाटे. खूप वेळ लांब ताना घेतल्यावर टाळ्या वाजवणे, एकच प्रकार बराच वेळ करणे, असे सवंग प्रकार, हे सवंग आहेत, हे पटणाऱ्या श्रोत्यांची संख्या जास्त होती. तबलजी व मुख्य कलाकार यांची आज एकमेकांवर कुरघोडी करण्याची, भर मैफलीमध्ये चाललेली धडपड पाहून, ही कला आहे की त्याचे कलेवर असे वाटल्यावाचून राहत नाही.

                  
कुमारजींच्या सहीचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा पेन टेकवले कि गंधर्वच्या रफारापर्यंत हात न उचलता सही करत...

       त्याकाळी मैफल कशी होत असे आणि विशेषतः कुमारजींची मैफल म्हणजे शहरातील आजच्या भाषेत एक हॅपनिंग किंवा शहरातील एक विशेष घटना असे. हे सर्व शब्दात मांडणे खरे तर कठीणच आहे, पण पुण्यामध्ये पूर्वी लक्ष्मी क्रीडा मंदीर, हे कलाकार व श्रोते या दोहोंसाठी एकमेकांना ओढ लावणारे ठिकाण होते. तिथे झालेल्या बुजुर्ग कलाकारांच्या असंख्य मैफलीतून मिळालेल्या आनंदाची तुलना, कदाचित जरा गंमतीने सांगायचे झाल्यास, भर मैफलीमध्ये उशिरा येऊन, पुढची जागा पटकावल्यावर जो आनंद होतो, त्याच्याशीच करता येईल. भीमसेनजी, मन्सूरजी, वसंतराव, जसराजजी, हरिप्रसादजी, शिवजी अशा अनेक बुजुर्गांनी कलाकारांनी लक्ष्मी क्रीडा मंदिरात आपली कला सादर करण्यात धन्यता मानली आहे. कुमारजींच्या तर तिथे अनेक मैफली झाल्या आहेत. त्यांची प्रत्येक मैफल हा एक दिमाखदार सोहळा असे. म्हणजे कुमारजींचा येत्या अमुक अमुक तारखेला लक्ष्मी क्रीडा मंदिरात कार्यक्रम आहे, अशी चर्चा संगीत वर्तुळात आठ-पंधरा दिवस सुरू होई. वृत्तपत्रात त्याची जाहिरात नंतर येई. नाही आली तरी सभागृह हमखास भरणारच. रात्री नवाचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे, साडेआठ पासूनच मंडळी गोळा होऊ लागत. मैफलीमध्ये पुढे बसणारे श्रोते, असा शिक्का बसलेल्या श्रोत्यांचा कंपू किंवा कळप झाला नव्हता. अगोदर आलेले व मागाहून आलेल्या श्रोत्यांमध्ये गर्दी असूनही जागेवरून भांडाभांडी वगैरे असले प्रकार होत नसत. हळूहळू श्रोते जमू लागत. मैफलीत आम्हाला बसायला जागा मिळणे ही काही अवघड गोष्ट नाही, आमची कलाकारांची ओळख आहे, संयोजकांची ओळख आहे किंवा आम्ही बाहेरूनही ऐकू, असे म्हणणारी मंडळी, मैफल सुरू होण्यापूर्वी चहा बिडी, लोकल कलाकारांशी गप्पांची देवाण-घेवाण यात दंग असत. कार्यक्रमाच्या अर्धा-पाऊण तास अगोदर कलाकार साथीदार दाखल होत. त्यावेळी कलाकार ग्रीन रूम मध्ये जाता जाता, कोणी परिचित दिसले, तर त्याची विचारपूस करून, त्याच्याशी अनौपचारिक संवाद साधून सहज ग्रीनरूम मध्ये जात. कलाकार आणि त्यांचे चाहते यांच्यामध्ये, आजच्यासारखे सुरक्षा कवच निर्माण झाले नव्हते. लक्ष्मी क्रीडा मंदिरात तर एरवीच, वरच्या मजल्यावर असलेल्या ग्रीनरूम मध्ये कलाकार काय गातात, हे खाली सभागृहात स्पष्टपणे ऐकू येई. ग्रीनरूममधील गाणे ऐकू गेल्यामुळे, गुपित फुटल्याची भावना, कलाकार आणि श्रोते दोघांमध्येही नसे. कलाकारांचीही ताकद अशी होती, की विद्यार्थी जसे परीक्षेच्या अगोदर, फक्त 'आयएमपी' प्रश्नांचाच अभ्यास करत, तसे कलाकार, जो राग गाणार आहेत, त्याचीच प्रॅक्टिस करत नसत, तर ग्रीनरूममध्ये वेगळा व मैफलीत वेगळा राग, असे सुद्धा काही वेळा घडत असे. एव्हाना सभागृह भरले, असा समज झाल्यावरही, लोकांच्या डोक्यावर हात ठेवत, पुढची जागा पटकावण्याची कला साध्य झालेले असामान्य श्रोते, हळूहळू सभागृह अधिक भरगच्च करीत आणि आता हीच ती कलाकार येण्याची वेळ, असे पक्के ध्यानात येई.

       कुमारांच्या मैफलीला बऱ्याच वेळा पुलं असत, अरविंद मंगरूळकर, वामनराव देशपांडे, दत्तोपंत देशपांडे अशी खाशी व्यक्तिमत्व असणारच. मग कुमारजी आपल्या साथीदारांसह, बहुतेक वेळा तबल्यावर आचरेकर व पेटीवर गोविंदराव, मागे तानपुऱ्याला विलास इनामदार, विजय सरदेशमुख, सत्यशील देशपांडे, वाद्यांच्या सरंजामासहित दाखल होत. तानपुरे सुरू होण्याअगोदर, समोरच्या मान्यवरांशी नर्म हास्यविनोद होऊन तंबोरे सुरू होत. तंबोरे जवळ जवळ जुळलेलेच असत, पण आणताना काही मागेपुढे झाल्यामुळे पुन्हा दहाएक मिनिटे किंवा मनाजोगते तंबोरे जुळवण्यात जात. पण ती दहा मिनिटे, कोणाला फालतू वाटत नसत. घरी लावून यायला काय होते, आमचा वेळ फुकट जातो, असे, आजच्या भाषेत स्वतःला प्रोफेशनल म्हणवणारी श्रोते मंडळी जन्माला यायची होती ! तंबोरे जुळवतानाचे गाण्यापूर्वीचे हे क्षण, इतके महत्त्वाचे ठरत, की सर्वांच्या मनामध्ये, डोक्यामध्ये ते सुरांचे वातावरण तयार होई. तो स्वरांचा नाद, आज काही विलक्षण ऐकायला मिळणार आहे, हे कुतूहल जागे करी. संपूर्ण वातावरण सुरांनी भारले, की तंबोरे थांबून संयोजक, निवेदक, माफक निवेदन करून नाहीसे होत. त्यांना फारसे महत्त्व नसे. त्यांचे काम केवळ मैफल सुरू करण्यापूर्वीचा उपचार पार पडणे, एवढेच असे. त्यातही चुकून पुष्पगुच्छ ऐवजी पुच्छगुच्छ म्हणणे, तंबोरा वादकाच्या नावात गडबड करणे, अशी माफक फजिती होऊन किंवा किरकोळ हास्याच्या फवाऱ्याने, मैफलीचा बेरंग न होता, पुन्हा तंबोरे सुरू होत. कुमारजी डोळे मिटून, एका विशिष्ट पद्धतीने डावा हात डाव्या मांडीवर ठेवून, एका समाधीवस्थेत अनोख्या स्वरयात्रेची सुरवात करीत. स्वर लावून मिनिटभर संपायच्या आतच, मान्यवर श्रोत्यांकडे किंवा ओळखीच्या मान्यवरांकडे पाहून आज छायानट गातो आहे किंवा असे काहीसे आपल्या खास कानडी ढंगात किंवा टिपेच्या स्वरात म्हणून मिश्किल हसत. एखादा बेसावध श्रोता काय म्हणाले कुमारजी, असे शेजाऱ्याला विचारेपर्यंत, कुमारजी आपल्या नादावस्थेत सहजपणे आपला स्वराविष्कार पुन्हा सुरू करीत. बंदिशीच्या रचनेप्रमाणे कधी सरळ, तर कधी पहिल्या एक-दोन आवर्तनांतच वरच्या षड्जाला भिडून असे काही समेवर येत कि ऐकणाऱ्याचे भान हरपून जावे. कुमारजींचे स्वरांचे लगाव व त्यांची स्वर स्थाने हा स्वतंत्र विषयच म्हणावा लागेल. कारण स्वरांचे शालेय शिक्षण घेणाऱ्याला, ते सूर कदाचित बेसूर वाटतील; पण कुमारजी स्वरांचा लौकिकार्थाने चढ्या उतऱ्या दर्जाचा तोल असा काही सांभाळीत, की त्या सादरीकरणाने भलेभलेही थक्क होऊन जात. एव्हाना राग प्रस्थापित झालेला असे, संपूर्ण मैफल कुमारमय झालेली असे आणि तानांची हळूहळू छोटया मोठया गुच्छांची मांडणी सुरू होई. त्या तानांमधील  स्वच्छपणा, मोजून घ्यावा असा दाणेदारपणा व त्यातून येणारा उर्जेचा स्त्रोत, वाहवा करायचे ही विसरायला लावी. तानांच्या झंझावाता मधून बाहेर येतो न येतो तोच अनपेक्षितपणे एकदम द्रुत सुरू करीत. द्रुत बंदिशींच्या एक-दोन आवर्तनातच व आचरेकरांच्या डौलदार ठेक्यामध्ये काहीसे जड झालेले वातावरण पुन्हा हलके होई. स्वर तालाच्या या ध्यानमग्न धुनीमध्ये समाधिस्थ झालेले कुमारजी, मध्येच थोडेसे भानावर येत. द्रुत बंदिशींची एक दोन आवर्तने होता होता तबलजी किंवा श्रोत्यांमधील कोण्या एखाद्याला उद्देशून एखादे वाक्य कधी मिश्किलपणे हसत हसत उच्चारत आणि मैफलीचे स्वरूप त्यामुळे एकदम अनौपचारिक होऊन जाई. जशी अनपेक्षित द्रुत सुरू होई, तशीच अचानक पेटी तबल्यावर हात ठेवत बंदिश थांबवत, आता थोडं अमुक-अमुक ऐकवतो, असे म्हणत पुढची रचना सुरू होई. बडा ख्याल, छोटा ख्याल, दोन-तीन मध्य  लयीतील रचना मनसोक्त गाऊन मध्यंतर होई.


       लक्ष्मी  क्रीडा मंदिरातील मध्यंतरसुद्धा आरामात चाखता येत असे. आजच्यासारखी मध्यंतर म्हणजे आधाशासारखी वडापाव वर तुटून पडण्याची स्पर्धा नसे.  हल्ली सभागृहात अभावानेच मिळणारी तृप्ती बाहेरच्या वड्याने मिळवावी लागते हे रसिकांचे दुर्दैव ! त्याला ते तरी बिचारे काय करणार. त्यावेळी मैफलीला आलेल्या प्रत्येकाचे पोट गाण्याने अगोदरच भरलेले असे, त्यामुळे आपल्याला गाणे किती आणि कसे कळले हे एकमेकांना सांगण्यासाठी चहा हे केवळ निमित्त असे. पहिला राग काय जबरदस्त गायला किंवा दुसरी द्रुत बंदिष काय सुरेख होती, याच प्रकारची चर्चा होई. ते मध्यांतर म्हणजे सामान्य श्रोत्यांचे अज्ञान आणि असामान्य कलाकारांची विद्वत्ता यांच्या विषयीच्या देवाणघेवाणीचे ते संमेलनच असे जणू. कुमारजींच्या गाण्याने सर्वजण अगोदरच भारावलेले असत, त्यामुळे स्वतःचे अस्तित्वच जाणवत नसे. आज-काल मध्यंतरानंतर बहुतांश सभागृहे ओस पडतात, त्यामुळे मध्यंतरच घेत नाहीत ! कुमारजींच्या मैफलीत मध्यंतरानंतर आणखी काहीतरी खास ऐकायला मिळणार, याची मनोमन खात्री असे. उद्याच्या ऑफिसचे एवढे काय, मारू दांडी किंवा पहाटेपर्यंत जागुनही कामावर जाणाऱ्या रसिकांची संख्याही काही कमी नव्हती. संपूर्ण मैफलीतील नव्याने गायलेले किंवा फारा दिवसांनी आर्तपणे मांडलेले निर्गुणी भजन बरेच दिवस कानात रुंजी घालत असे. गुरुजी मै एक निरंजन ध्यांऊजी, हीरना, सुनता है गुरु ग्यानी किंवा भोला मन जाने, अशासारख्या जीवनाचे मर्म सांगणाऱ्या संत काव्याला, तितक्याच ताकदीने भैरवीतील स्वरांनी आळवत, कुमारजी मैफलीचा स्तर अशा उंचीवर नेऊन ठेवत, की ऐकणाऱ्यांची अवस्था शब्दातीत असे. या बारा जानेवारीला कुमारजींना जाऊन वीस वर्षं पूर्ण झाली. गायकीतील, स्वरांमधील खाचाखोचा दर्शविणाऱ्या भावविभोर मुद्रा, स्वरातील आर्जवे, तानांमधील अफाट ऊर्जा व त्यातही यत्किंचित न ढळणारा सूर...  हे अजूनही सारे स्पष्ट आठवते. एखाद्या बेसावध क्षणी कुठे तरी त्यांची शुभ्रधवल चित्रफित पाहायला मिळते. मैफलीच्या त्या पुनःप्रत्ययाने आठवणींच्या कुपीत साठवून ठेवलेल्या मैफली आपोआप बाहेर येतात. अशा एकाहून एक सरस संस्मरणीय मैफलींच्या आठवणी मधूनच आता केवळ उरलेले कुमारजींसारखे प्रतिभावान, समर्थ गायक आपण पुन्हा पुन्हा अनुभवू शकत नाही याची खंत वाटते...


हेमकांत नावडीकर
navdikar@gmail.com

Comments

  1. Apratim mahifaicha punapratya kyabat

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻

      Delete
  2. वाह, अत्यंत समर्पक शब्दात मांडले आहे!

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻

      Delete
  3. मित्रा .....

    खूप सुंदर , ओघवतं
    अस्सल पुणेकर असूनही comparison चा मोह झाला नाही इतकं बावनकशी आहे
    लिहित रहा , वाचून समृध्द होतो

    धनंजय खुर्जेकर

    ReplyDelete
    Replies
    1. उत्तम अभिप्रायाबद्दल मनापासून आभार 🙏🏻

      Delete
  4. अरे काय सुंदर आणि ओघवत्या भाषेत लिहिलय,व्वा मस्तच.

    ReplyDelete
  5. प्रत्यक्ष मैफल अनुभवायला मिळाली असे वाटले.. खूपच छान आहे तुमचे लिखाण..

    ReplyDelete
  6. हेमकांत, तुम्ही एकाचवेळी दोन दोन गायकांच्या गायकीचे वर्णन अतिशय सुंदरपणे लिहिले आहे. आम्हाला तुमचा अबिमान वाटतो.

    ReplyDelete
  7. वाह, अतिसुंदर. कुमारांची सुकुमार गायकी तशी कुठच हरवत नाही..या वाचनानं ती मनातून उसळी खाऊन बाहेर आली अनेक आठवणींना सोबत घेऊन. बेळगावात आले की ते आमच्या शेजारी बाळुअण्णा देऊळकर यांच्याशी गप्पा मारायला यायचे. ते त्यांचे टीपेतले बोलणे आणि अण्णांचे पहाडी आवाजातले बोलणे म्हणजे आमच्या आनंदाचा एक मोठा भाग होता. आपल्या लेखनाला दाद देतो.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद नंदन सर 🙏🏻

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान ...

मार्दवपूर्ण गाण्यांचे माळपदक : माणिक वर्मा