सूरात चिंब भिजलेले : अजय - अतुल

सुमारे ११ वर्षांपूर्वी सकाळ समूहातर्फे स्वर-रंग हे प्रामुख्याने संगीताला वाहिलेले त्रैमासिक सुरु झाले होते. त्याच्या पहिल्या अंकासाठी अजय-अतुल यांची मुलाखत घेतली होती.... त्यानंतरच्या काळातही त्यांनी अत्यंत दर्जेदार व सुमधुर गाण्यांची परंपरा चालू ठेवली आहे, इतकेच नव्हे तर त्यांच्या यशाची, किर्तीची व गुणवतेचीही कमान चढतीच राहिली आहे ...


सूरात चिंब भिजलेले : अजय- अतुल

     अमिताभ बच्चन, राम गोपाल वर्मा, सचिन, राज ठाकरे, महेश मांजरेकर आणि दक्षिणेतील सर्व सुपरस्टार्स, यांच्यामध्ये एक गोष्ट समान आहे. या सर्वांकडे विश्वविनायक नावाचा संगीत रचनांचा अल्बम आहे. त्यातील एकदंताय वक्रतुण्डाय हा श्लोक अलीकडेच  त्याला लावलेल्या सुंदर चालीने व त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण  स्वरसाजाने, सामान्यांपासून संगीत जाणाणाऱ्यांपर्यंत सर्वांनीच प्रशंसलेला आहे. खुद्द अमिताभ बच्चन यांनाही  या अल्बमने असेच मोहित केले आहे इतकेच काय तर, त्यांच्या प्रत्येक गाडीत हा अल्बम वाजत असतो. यामध्ये  अभिमान वाटावी एक गोष्ट आहे, जी अनेकांना माहीत नाही, ती म्हणजे या विश्वविनायकचे रचनाकार अजय-अतुल हे पक्के पुणेरी आहेत. असंख्य पारितोषिके, मानसन्मान व  दिग्गजांच्या कौतुकास पात्र ठरलेले अजय-अतुल, यांचा फक्त विश्वविनायकच नव्हे, तर त्यांनी संगीत दिलेला प्रत्येक सिनेमा व त्यातील प्रत्येक गाणे तितकेच लोकप्रिय झाले आहे. त्यांच्या कोंबडीने तर शहरातील प्रत्येक गल्ली पासून, अगदी लहान गावातही लोकमान्यता मिळवली आहे. संगीत दिग्दर्शनाच्या वाढत्या कामामुळे आणि सर्वांच्या सोयीसाठी नुकतेच त्यांनी मुंबईमध्ये स्थलांतर केले आहे. अत्यंत व्यस्त वेळेमध्ये या अंकासाठी त्यांच्याच मुंबईतील नवीन स्टुडिओमध्ये त्यांनी मनमोकळी बातचीत केली.



     जेमतेम तिशी ओलांडलेली अजय-अतुल ही सख्खी भावंडे. गोगावले हे त्यांचे आडनाव. अतुल हा मोठा व अजय लहान. अतुल-अजय हे उच्चारताना काहीतरी वेगळे वाटते, तर सोपे वाटते म्हणून अजय-अतुल हे नाव धारण केले. पुण्यामध्ये नारायण पेठेत लोखंडे तालमीजवळ राहणारे. अतुलचे प्राथमिक शिक्षण नवीन मराठीत या शाळेत झाले. वडिलांची बदली झाली आणि हे कुटुंब शिरूरला पोहोचले. लवकरच शाळेतल्या शिक्षकांच्या लक्षात आले, की ही मुले काही साधी नाहीत. शाळेतल्या स्पर्धा, स्नेहसंमेलने अशा कार्यक्रमात त्यांच्या गुणवत्तेची चमक दिसू लागली. वडीलांची पुन्हा बदली होऊन, ही मंडळी राजगुरुनगरला पोहोचली. विशेष म्हणजे, शिरूरच्या गुरुजींनी, राजगुरुनगरच्या शाळेतील  शिक्षकांना, पत्र पाठवून या गुणी मुलांकडे लक्ष द्या, असे कळवले. शाळेत असतानाच, आणखी एक योगायोगाची गोष्ट म्हणजे, अतुलला सलग तीन वर्षे 'सकाळ नाट्यवाचन' स्पर्धेत बक्षीस मिळत होते. त्यानंतर पुन्हा बदलीमुळे पुण्यात स्थलांतर झाले. सततच्या बदल्यांमुळे बाहेरचे मित्र विशेष झाले नाहीत, पण ही भावंडे मात्र  एकमेकांची छान मित्र झाली. शाळेत कोणत्या ना कोणत्या उपक्रमांमध्ये भाग घेतल्यामुळे, सतत नवीन काहीतरी करण्याची उर्मी मनात निर्माण झाली व तीच त्यांच्या आयुष्यभराची पूंजी ठरली. पुण्यात आल्यावर 'महाराष्ट्राची लोकधारा' या पथकात त्यांना प्रवेश मिळाला व त्यामुळे तेथेच त्यांच्यावर गाण्याचे संस्कार झाले. अजयला आपण उत्तम गाऊ शकतो, हे या पथकामुळेच समजले. यात नोंद घेण्यासारखी एक गोष्ट आहे, ती म्हणजे या दोघांचेही गाण्याचे रीतसर शिक्षण  कोठेही झाले नाही.  त्यांनी कोणतीही परीक्षा दिली नाही. इतकेच काय, संगीत दिग्दर्शन करायला लागल्यानंतर बऱ्याच वर्षांनीं हार्मोनियम त्यांच्या हातात आली. एक तर घरची परिस्थिती बेताचीच, व दुसरे महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही वाद्य शिवाय त्यांना उत्तम संगीत सुचत होते! रूढ अर्थाने कोणतेच संगीत शिक्षण झाले नाही. झाले ते केवळ संस्कार. यामुळेच की काय कदाचित, त्यांची स्वतःची वेगळी शैली त्यांना बनवावी लागली नाही, तर ती आपोआपच बनली. पुण्यात कॉलेज शिक्षणाबरोबर, अजय-अतुल यांची संगीत देण्याची धडपड सतत चालू असे. परिस्थितीमुळे सिंथेसाइजर किंवा पेटी, जवळ नसताना, केवळ संस्कार व काम करण्याची प्रचंड उर्मी, यामुळे, समोर येईल ते काम मन लावून करायचे, व जी संधी येईल त्याचे सोने करायचे, एवढेच किमान लक्ष  ठेवले. त्यामुळे कामातून काम मिळत गेले. 'अरे, ही तरुण मुले चांगले काम करत आहेत बरं का,' असे कर्णोपकर्णी  होत होत कामे मिळत होती. त्याचे कौतुकही होत होते. त्यातून पैसे किती मिळत होते, किंवा मिळत होते की नाही, याकडे त्यांचे लक्षच नव्हते. कित्येक वेळा काम करूनही तुम्ही अजून लहान आहात, तुम्हाला खूप शिकायचे आहे, असे सांगत कित्येक वेळा पैसे बुडालेले ही आहेत. पण या दोघांच्याही बाबतीत, कौतुकाची गोष्ट म्हणजे, आज दोघांच्याही मनात पैसे बुडवणाऱ्यांविषयी अजिबात कटुता नाही. आम्ही लहान होतो, अनुभव नव्हता, व या पातळीला असेच होते. इतक्या सहजपणे हा कटू भूतकाळ ते पचवतात. पुण्यात सायकलवरून डबलसीट ही जोडगोळी, संगीत दिग्दर्शनाचे काम करत, येरवड्यापासून धनकवडी पर्यंत, असंख्य वेळा फावड्या मारत आनंदाने काम करताना, कदाचित अनेकांनी पाहिलीही असेल. परिस्थितीमुळे सायकल इतरत्र कुठेही पंक्चर झाली, तर सायकलवाला ओळखीचा नसल्यामुळे, अनेक वेळा चालत देखील हिंडावे लागले आहे. पण त्याही वेळी एकमेकात चर्चा चालायची ती आपण अजय-अतुल हे नाव ठेवायचे की अतुल-अजय याचीच ! आपण मोठे होणार, याची जाणीव कदाचित तेव्हाच त्यांना झाली असावी. वहीच्या पानावर शाळेत असतानाच अजय-अतुल अशी त्यांची सह्यांची प्रॅक्टिस चाले ! असेच एक दिवस एका सिरियल चे काम आले. त्यातून  अनुभवाशिवाय फारसे काही निष्पन्न झाले नाही. अशीच  छोटी-मोठी कामे करत दोघेही मुंबईमध्ये पोहोचले. संगीत दिग्दर्शन, संगीत संयोजन, अशी समोर येतील ती कामे करत राहिले. एक दिवस टाइम्स म्युझिकसाठी त्यांनी एक  आरती रचली होती. कोणाच्याही शिफारशीशिवाय, फक्त एक आरती ऐकून, टाइम्स म्युझिकने त्यांना एक संपूर्ण अल्बम देऊ केला. तोच त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला. हाच तो विश्वविनायक अल्बम २००२ मध्ये अवतरला.

     अजय-अतुल दोघेही दक्षिणेतील महान संगीतकार इलयाराजांचे एकलव्यासारखे भक्त. त्याच बरोबर या दोघांनाही पाश्चिमात्य सिंफनीची खूप ओढ. त्यामुळे गणपती बाप्पाचे श्लोक त्यांनी नव्या स्वरूपात मांडले.  या श्लोकांची चाल हिंदुस्तानी संगीतावर आधारित, तर त्याचा स्वरसाज पाश्चिमात्य ढंगाचा. हे असे असले तरी या दोन्हीचा ताळमेळ व प्रमाण सांभाळायला, असामान्य प्रतिभेची जोड व इतक्या वर्षांची मेहनतही त्यामागे होती.  कोणाचाही थेट प्रभाव नसल्यामुळे, त्यामध्ये ताजेपणा होता. यामुळेच असेल अमिताभजीं पासून सर्वांनीच हा अल्बम डोक्यावर घेतला. यशाचे दरवाजे तर उघडे झाले असे वाटले, तरीही त्यानंतर जवळ जवळ दोन वर्षे  कोणतीही हालचाल नव्हती. कोणतीही ऑफर नव्हती. कौतुक सर्वत्र होत होते, पण पोटापाण्याचे काय ? प्रचंड वैफल्य आले. गणपती बाप्पाचीच अशी इच्छा असावी, इतक्या सहजतेने या वैफल्यग्रस्त काळाकडे ते पाहतात. या काळात दोघेही एकमेकांना धीर देत होते. आई-वडिलांनी बस्तान बसत नसेल, तर सरळ पुण्याला निघून या, पण भाकरी मिळवण्यासाठी संगीत देऊ नका, असाच सल्ला दिला. तुम्हाला सांभाळायला आम्ही भक्कम आहोत, पण संगीत करायचे तर स्वतःच्या समाधानासाठी करा, असेच त्यांनी सांगितले. आणि एके दिवशी बाप्पा प्रसन्न झाला. कोणीतरी 'विश्वविनायक' राम गोपाल वर्मा यांना ऐकवला. राम गोपाल वर्मा पक्के नास्तिक‌ पण त्या रचना त्यांनी ऐकल्या मात्र आणि ते म्हणाले, देवावर माझा विश्वास नाही, पण त्याचे अस्तित्व नक्की कुठेतरी आहे. आणि त्यानंतर मात्र अजय-अतुल यांनी मागे वळून मागे वळून पाहिले नाही. 'मीरा कहे' हा मीरेच्या रचनांचा व 'विश्वात्मा' हे अल्बम दक्षिणेत खूप गाजले. पहिला चित्रपट मिळाला तो हिंदी 'गायब' नावाचा.  त्यानंतर  'सावरखेड एक गाव', 'अगंबाई अरेच्चा', 'जत्रा', 'बंध प्रेमाचे', 'जबरदस्त' असे चित्रपट येतच आहेत. 'सही रे सही' चे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले. त्यांच्या सर्वच चित्रपटातील सर्व गाणी एका पेक्षा एक सरस वठली आहेत. 'वाऱ्यावरती गंध पसरला', 'गोंधळ', 'मन उधाण वाऱ्याचे', 'कोंबडी'ने तर लोकप्रियतेचा उच्चांकच गाठला. त्यांच्या सर्वच गाण्यांमध्ये ताजेपणा आहे. आपोआप ठेका धरायला लावणारी, तर काही गाणी, खुर्चीतून उठून नाचायला प्रवृत्त करणारी आहेत. पाश्चिमात्य वाद्यांचा प्रभाव असला तरी त्याचे भारतीयत्व व त्याचे मराठी मातीशी नाते  सुटलेले नाही. जे गाणे करू, ते संगणक युगातील माझ्या मुलालाही आवडले पाहिजे, त्याच बरोबर देवघरात पोथी वाचणार्‍या माझ्या आजीलाही आवडले पाहिजे, हा त्यांचा दृष्टिकोन बरेच काही सांगून जातो. त्यांचा 'बेधुंद' हा स्वप्निल बांदोडकरने गायलेला अल्बम व त्यातील 'गालावर खळी' हे गाणेही खूप लोकप्रिय झाले. पण  या गाण्याची गंमत अशी, की या गाण्याला त्यांनी चाल लावलेलीच नाही‌ ! त्यांनी मूळ 'संग संग हो तुम' हा हिंदी अल्बम केला होता. श्याम अनुरागींच्या उत्कृष्ट शब्दांवर स्वप्निलनेच ही सारी गाणी गायली होती. पण वर्षभरानंतर याच कंपनीने त्या गाण्यांवर मराठी शब्द लिहून घेऊन, बेधुंद नावाने केला. तो ऐकल्यावर अनेक जणांनी अजय-अतुल यांना 'गालावर खळी' हे गाणे खूप आवडते असे सांगताच, अशा कोणत्याही शब्दांवर आम्ही चाल बांधलेली नाही, हे त्यांनी सांगितले, की आश्चर्य वाटते. 'बेधुंद'चे रहस्य  त्यांनाही तो अल्बम प्रसिद्ध झाल्यावरच समजले !

     अजय-अतुलजी चित्रपट संगीत व अल्बम, यामध्ये अल्बम साठी संगीत करताना अधिक खुलतात. अल्बम करताना संगीतकाराला संपूर्ण स्वातंत्र्य असते. अल्बम हा संगीतकाराचा आरसा समजावा, असेच ते म्हणतात. कारण चित्रपटासाठी प्रसंग, दिग्दर्शकाची, निर्मात्याची आवड, अशी व्यवसायावर आधारलेली गणिते त्यावर अवलंबून असतात. असे असले, तरी दोन्ही कामे तितकीच आव्हानात्मक आहेत, असेच त्यांचे म्हणणे आहे. संगीत दिग्दर्शक हा मुळातच जन्मावा लागतो. कोणत्याही संगीताच्या परीक्षा देऊन संगीत दिग्दर्शक बनता येत नाही. संगीत ही  शब्दांच्या पलीकडची भाषा आहे. स्वतःला जे काही सांगायचे, ते संगीताच्या माध्यमातून परिणामकारकपणे सांगण्यासाठी, प्रतिभेचे  दान पदरात हवेच. परीक्षा देऊन एक वेळ गायक कदाचित होता येतही असेल, पण संगीतकार होण्यासाठी स्वतःचीच परीक्षा द्यावी लागते. आम्ही दोघेही एकमेकांचे प्रथम टीकाकार आहोत. स्वतःचे संपूर्ण समाधान झाल्याशिवाय आम्ही कोणालाही गाणे ऐकवत नाही.   गुणवत्तेचे नियंत्रण आपणच स्वतःवर घालून घ्यायला हवे. एखादी गृहिणी जशी, एखाद्या पदार्थाच्या चवीची शंका आल्यास,  त्याची चव अगोदर पाहून, स्वतःचे समाधान झाल्यावर मगच समोर पाहुण्यांसमोर आणते, तसेच बिनचुक काम होईपर्यंत थांबायचे नाही, हेच या संगीतकार बंधूंचे पहिले ध्येय. अलीकडेच रवीतेजा व जोथिका यांच्या 'शॉक' नावाच्या तेलगू चित्रपटाची गाणी केली. ती ही सर्व गाणी सुपरहिट झाली. इतकेच नव्हे तर यातील गाण्यांच्या, पंचवीस दिवसात साडेतीन लाख प्रती विकल्या गेल्या. बॉलीवूड मधून दक्षिणेत जाऊन अटकेपार झेंडे लावणारे हे पहिलेच संगीतकार‌. नुकताच त्यांनी स्वतःचा स्टुडिओ ही उभारला आहे. हेतू हा कि, या निर्मितीच्या, सृजनाच्या राज्यात, मनसोक्त काम करता यावे. सध्या त्यांच्याकडे अनेक हिंदी मराठी चित्रपटांची कामे चालू आहेत. हेमामालिनीच्या 'गंगा' या बॅलेसाठी संगीत दिग्दर्शन चालू आहे. विश्वविनायक २ ची ही निर्मिती डोक्यात आहे.

     आज अजय-अतुल यांचे मुंबईत घर आहे, गाडी आहे. सर्व काही उत्तम आहे. अजय-अतुल यांना त्यांच्या पत्नी  व मुलाबाळांचे ही भरघोस सहकार्य आहे. पण अजून त्यांना आठवते, ती डॉक्टर दिलीप देवधरांनी घेऊन दिलेली सायकल, सिंथेसायजर घेण्यासाठी, घरासाठी केलेली मदत. नितीन वैद्य यांच्यासारखे पाठीशी उभे राहिलेले मित्र. अजय-अतुल यांचे पाय भक्कम पणे जमिनीवर उभे आहेत. म्हणूनच त्यांचे यश हे  कुसुमाग्रजांच्या शब्दांमध्ये 'मातीमध्ये  उगवून सुद्धा मेघांपर्यंत पोहोचलेलं आहे' !!!

हेमकांत नावडीकर
navdikar@gmail.com

Comments

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान ...

मार्दवपूर्ण गाण्यांचे माळपदक : माणिक वर्मा

कुमार नावाची चिरतरुण मैफल