पुणेकर रसिक श्रोते

पुणेकर रसिक श्रोते .....

          पुणेकर श्रोता तुम्हाला ओळखायचा असेल, तर तुम्हाला स्वत:ला उत्तम स्वरज्ञान हवे. म्हणजे काय तर बोलाणाऱ्याचा सूर ओळखता यायला हवा. याचा अर्थ समस्त पुणेकर मंडळी संगीतात बोलतात असे नाही, तर त्यांच्या संभाषणाचा सूर ओळखता यायला हवा, त्यांना काय म्हणायचे आहे, हे तुम्हाला कळायला हवे, नाही तर तुम्हाला कसे सहज खिशात टाकले, हे गावभर होणार किंवा तुम्हाला फ़ारसे काही समजत नाही, अशी किंवा तुमची कशी विकेट घेतली, याची ही पुणेकर मंडळी मजा घेणार. कल्पना करा एखाद्या कार्यक्रमाचे तिकिट तुम्ही काढायला गेला आहात आणि तुमच्या शेजारी एक पुणेकर गृहस्थ उभे आहेत. त्यावेळच्या त्यांच्याशी झालेल्या संवादावरून मी काय म्हणतो याचा थोडा अंदाज येईल. सहसा पुणेकर स्वत:हून दुसऱ्याशी बोलायला जात नाहीत. पण सार्वजनिक ठिकाणी जिथे फ़ारसा धोका नसल्यास, कधी कधी स्वत:हून बोलतातही. धोका याचा अर्थ तिकिटांसाठी खूप गर्दी असणे, तिकिटे मिळायची शक्यता खूपच कमी असणे वगैरे, तसे असले तर त्यानुसार त्यांच्या हालचाली होतात. पुढील संवादाचा विशेष अभ्यास केल्यास, पुणेकर श्रोता ओळखायला मदत होईल. समजा त्या तिकिटविक्रीच्या ठिकाणी तुम्ही आहात, तर सुरुवात कशी होते ते पहा. ’ते’ गृहस्थ तुम्हाला विचारतात. अमुक-अमुक कलाकाराच्या कार्यक्रमाची तिकिटे काढायला आलात का? असे विचारुन तुमची प्रतिक्रिया यायच्या आधीच,  उगीचच काही तरी एखादा तिरपा कटाक्ष, एखादे छ्द्मी हास्य किंवा एखादा हिणकस शेरा मारून, तुमच्या मनात संभ्रम निर्माण करणार. सहाजिकच तुम्ही काहो, असे का, असे विचारणारच ना. इथे तुमच्यातला परकीयपणा, ’अपुणेकरपणा’ किंवा चक्क साध्या भाषेत गावठीपणा दिसायला लागतो व संभाषणाची दिशा पुणेकर विरुद्ध अपुणेकर अशी सुरु व्हायला लागते. त्या पुणेकराच्या प्रश्नाने तुम्ही गोंधळलात कि त्यांचा दुसरा वार होतो.त्यांचे गाणे ना, अहो हल्ली त्यांच्या गाण्यात काही मजा राहिली नाही !!  यामधून दोन गोष्टी स्पष्ट होतात, त्या म्हणजे तुम्हाला फ़ारसे गाण्यातले कळत नाही किंवा पुणेकरांना गाण्यातले जास्त कळते हे एक आणि दुसरे म्हणजे पुणेकरांना गाण्यातले जास्त कळते. शिवाय या संवादाने तुम्हाला संभ्रमात टाकून पुणेकराने बोलण्याची बाजी जिंकलेली असते. प्रसंग किरकोळ असला तरी त्यातून अनेक गोष्टी स्पष्ट होतात.



          पुणेकरांना गाण्यातलं बरंच कळतं, गाण्यातलेच कशाला इतरही सर्वच गोष्टीतले इतरांपेक्षा जास्त कळते हे त्रिकालाबाधित सत्य आहे ! पुणेकरांची ही सवयच आहे. दुसऱ्याला नावे ठेवणे, असं नकारात्मक बोलणे व एकूणच आपल्याला जास्त समजते हे इतरांना सांगण्याची पुणेकरांमध्ये चढाओढच लागलेली असते जणू. आणि खरं सांगायचं, तर यात सरशी होते ती फ़क्त पुणेकरांचीच. अगदी दोन पुणेकर समोरासमोर आले, तर जो अधिक पप्पु म्हणजे पक्का पुणेकर तोच जिंकणार हे निश्चित. म्हणजे कोणी म्हले, कि परवा अमुक एका गवयाने मारवा काय गायलाय, असे म्हले, कि अहो महाराजा तुम्ही वसंतरावांचा १९८१ सालचा मारवा ऐकायला पाहिजे होता. वसंतराव असे गायले होते, कि मारवा गावा तर फ़क्त त्यांनीच, असे म्हणून तुम्ही गाणे ऐकण्यात अजून जणू बाल्यावस्थेत आहात आणि आम्ही पुणेकरांनी किमान शंभर गायकांचे मारवे ऐकले आहेत,असे म्हणून समोरच्याला खिशात टाकलेच म्हणून समजा. स्वत: संगीत अलंकार असल्याचा भास निर्माण करण्यात पुणेकरांचा हात कोणीच धरु शकणार नाही. आता या संभाषणात समजा दोन पुणेकर असले, तर हेच संभाषण खूपच वेगळे वळण घेते. वसंतरावांच्या मारव्याची तारीफ़ एका पुणेकरांनी करताच, अच्छा तो गरवारे कॉलेजमधला कार्यक्रम ना? मी होतो ना त्या कार्यक्रमाला. इथे पहिला पप्पु सावध पवित्रा घेतो. आपल्यापेक्षा समोरच्याला जास्त समजते, याचा त्या चाणाक्ष पप्पुला अंदाज आलेला असतो. मग अस्सल दुसऱ्या पप्पुने, पहिल्याचे पाणी जोखलेले असते. मी सांगू का, मला त्या दिवशीचा मारवा एवढा नाही आवडला. म्हणजे त्या दिवशी वसंतरावांचं गाणं एवढ जमलं नाही. म्हणजे त्यांनी रे, ध संगती जी घेतली ना.... एव्हाना पहिल्या पप्पुने मनोमन माघार घेतलेली असते,पणे जाहीरपणे बोलताना मात्र, तुम्ही गरवारेमधला म्हणताय का नाही नाही, मी लक्ष्मी क्रीडा मंदीरमधल्या कार्यक्रमाविषयी म्हणत होतो, असे सांगून मी पण कमी नाहिये, वगैरे चालू होतं. दोन पुणेकरांमधले संभाषण म्हणजे दोन पहिलवानांची खडाखडी होते न तसं काहीसं असतं.

      ही पुणेकरांची आपापसातील नोकझोंक, खडाखडी, युद्ध किंवा लढाई किंवा याला जे काय म्हणाल, ते खरं तर मंडपाबाहेरच असतं !!! म्हणजे कार्यक्रमाच्या ठिकाणी अशी खडाजंगी होत नाही. कार्यक्रमाच्या ठिकाणी समस्त पुणेकर भक्तीभावानेच जातात. कदाचित या विधानाने चांगलेच आश्चर्यचकित झाला असाल. एकीकडे तुम्ही म्हणताय, कि पुणेकर रसिक, कलाकारांना नावं ठेवतात. आणि भक्तिभावाने कार्यक्रमाला जातात, असंही म्हणताय, नक्की काय म्हणायचंय ते अगोदर ठरवा आणि मग बोला. पण पुणेकरांचे हे नावे ठेवणे वगैरे हे तुल्यबळ लोकांसमोर व एकमेकांमध्ये असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पुणेकर ज्या कलाकारावर भक्ति आहे, त्याचाच कार्यक्रम ऐकायला जातात !  
      एवढे पुणेकर रसिक किंवा जाणकार आहेत, तर त्यांना संगीतातले नक्कीच समजत असणार असं कोणाला वाटत असल्यास त्यात गैर काही नाही. हे विधान तसं खोटे नसलं तरी, पण यातलं गुपित असं आहे, कि संगीत कळते कि नाही हे जरी सांगता आले नाही, तरी किती कळते ते मात्र तुम्हाला कळू देणार नाहीत हे निश्चित. कारण पुणेकर रसिक संभाषणातील बाजी जिंकण्यामध्ये अत्यंत तयार आहेत. तसेच माघार केंव्हा घ्यायची, हेही त्यांना उत्तम समजते. मैफलीत गायक राग कोणता मांडतोय, हे विचारा एखाद्या पुणेकराला. माहितीतील राग असेल तर ते चटकन रागाचे नाव सांगतील, पण माहिती नसेल तर हार मानणार नाही. रागापेक्षा त्यातील भाव कसा श्रेष्ठ हे सांगून, आपल्या _ज्ञानाची चुणूक दाखवून समोरच्याला गप्प करणार. किंवा गायकाच्या एखाद्या हरकतीला कोणीच दाद देणार नाही, अशा ठिकाणी एकदम मोठ्याने दाद देऊन समोरच्या ‘सामान्य’ श्रोत्याला, याला आपल्यापेक्षा जास्त समजते आहे, असे भासवण्यात यशस्वी होणारा तो खरा पुणेकर रसिक ! असे पुणेकर रसिकांचे मैफलीतील असंख्य किस्से आहेत. पण पूर्वी एकदा एका अस्सल इरसाल पुणेकराने, मैफल चालू असताना, आपली पार्क केलेली गाडी काढता येत नाही, म्हणून वैतागलेल्या अवस्थेत, गायन चालू असताना माईक हिसकावून, अमुक नंबरची गाडी काढावी अशी सूचना भर मैफलीत केल्याचेही ऐकिवात आहे !!!
           सवाई गंधर्व हे जसे पुणेकर संगीत रसिकांसाठी मेजवानीचे ठिकाण असले, तरी त्यातही रेणुका स्वरूप येथील कार्यक्रमाची खुमारी न्यारीच होती. एक तर त्यावेळी रात्रभर कार्यक्रम होत असत. त्यामुळे ती थंडी, त्या थंडीमधील गायनवादनाबरोबर खानपानाची लज्जतही और होती. पहाटे पहाटे पेंगुळलेल्या रसिकांना, गुलाबपाण्याच्या फवाऱ्याने जागे करणारे गुलाबराव हे खास पुण्याचेच वैशिष्ट्य ! पण सवाई  शिवायही लक्ष्मी क्रीडा मंदीर, नूमवीशाळेचे पटांगण, उपाशी विठोबा, जंगली महाराज आणि अशा अनेक मंदीरांमधून रसिकांनी संगीताच्या अनेक संस्मरणीय मैफलींचा आस्वाद घेतलेला आहे. पण यातील पुणेकर रसिकांचे खरे कसब पणाला लागते, जेंव्हा कार्यक्रम हा निमंत्रितांसाठी असतो तेंव्हा ! निमंत्रितांसाठी असलेल्या कार्यक्रमात निमंत्रण नसताना प्रवेश मिळवतात तेच खरे पुणेकर ! त्यातही त्या कार्यक्रमाच्या हकीकती, किस्से न आलेल्या लोकांना सांगून जळवण्यात माहीर असतात ते खरे पुणेकर ! कार्यक्रमाला तिकीट असताना, त्याच कार्यक्रमात तिकिटाशिवाय प्रवेश कसा मिळवायचा, त्याच्या खास तरकीबा माहिती असतात, तेच अस्सल पुणेकर श्रोते ! त्यापलीकडेही श्रेष्ठतम दर्जाचे पुणेकर, अशी पदवीप्राप्त करणारे पुणेकरही आहेत. हा दर्जा लाभलेली मंडळी निमंत्रण नसताना, नुसताच प्रवेश मिळवत नाहीत, तर शाल पांघरून थेट पुढच्या राखीव रांगांमध्ये सर्वात पुढे, मोठमोठ्या आमंत्रित पाहुण्यांच्या शेजारची जागा पटकावतात, त्या रसिकांचा दर्जा काही वेगळाच आहे. खरे रसिकाग्रणी त्यांना म्हणावयास हवे. पुणेकर श्रोता व्हायचे असेल तर यातल्या अनेक गोष्टी जमायला हव्यात, नाहीतर त्या कार्यक्रमाची झलक तुम्हाला टीव्हीवर पाहण्यातच समाधान मानावे लागेल.
     इतके वर्षं पुण्यात राहिलो, असंख्य मैफिली ऐकल्या अनुभवल्या पण तरीही पुणेकरांच्या रसिकतेचा किंवा थांग मात्र अजूनही लागलेला नाही. असं म्हणायचं कारण असं, कि आजपर्यंत असंख्य कलाकारांना पुणेकरांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. पण पुणेकर रसिक कोणाला डोक्यावर घेतील आणि कोणाला नाही, याची समीकरणं मात्र अजूनही सापडली नाहीयेत. अनेक मोठमोठ्या कलाकारांना पुणेकरांनी डोक्यावर घेतलं हे खरं असलं, तरी अनेक दिग्गज कलाकारांना डोक्यावरून सहज खालीही घेतले आहे. कोणाला डोक्यावर घेतले आहे, हे तर सर्वांनाच माहिती आहे, पण ज्यांना खाली घेतले आहे, अशा यादीतील नावे पाहिली तर खरंच शरमेने मान खाली जावी, अशीच परिस्थिती आहे. अशा दिग्गज कलाकारांची नावे घेणे, म्हणजे त्यांचा पुन्हा अनुल्लेख किंवा उपमर्द करणे निदान मला तरी शक्य नाही. वर्षानुवर्षे मैफलीत जाणाऱ्यां रसिकांना या गोष्टी ज्ञात आहेत. कटू असल्या तरी सत्य आहेत. पुणेकरांच्या रसिकतेचा हा एक न उलगडलेला पैलू मात्र सदैव अस्वस्थ करतो.

हेमकांत नावडीकर

Comments

  1. Wa uttam abhyas kela ahes punekar Rasika cha😃 tya sathi tula nakkich Doctorate dili pahije

    ReplyDelete
  2. व्वा!व्वा! बढिया. 👍👍

    ReplyDelete
  3. मला सूध्दा बरेच अनुभव आले आहेत. मस्त

    ReplyDelete
  4. प्रिय हेमकांत लेख आवडला पण आता प्रश्न असा आहे की आपण नेमके कोणत्या प्रकारचे पुणेकर ?

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद... आपण पुणेकर असल्यास हे ओळखणे कठीण नाही...

      Delete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. आम्हा अपुणेकराना पुणेकरांची दुसरी बाजू ऊलगडून दाखविल्याबद्ल धन्यवाद!
    लेख छानच!

    ReplyDelete
  7. मित्रा.....
    फारंच सुंदर,ओघवतं ,कशासारखं वाटलं हे सांगण्याचा मोह अस्सल पुणेकर असूनही झाला नाही कारण लिखाण beyond comparison आहे !!!!

    लिहित रहा , वाचून समृध्द होतो

    ReplyDelete
    Replies
    1. उत्तम अभिप्रायाबद्दल मनापासून आभार 🙏🏻

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान ...

मार्दवपूर्ण गाण्यांचे माळपदक : माणिक वर्मा

कुमार नावाची चिरतरुण मैफल