महान गुरू पं. अरविंद मुळगांवकर
पं. अरविंद मुळगांवकर यांच्यासारख्या महान गुरूंकडे मला थोडेफार शिकायला मिळाले याबद्दल मी स्वत:ला अत्यंत भाग्यवान समजतो. आमची एकूणच पिढी या महान गुरुची ऋणी आहे. गुरुजींचे 'तबला' हे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि या पुस्तकाने तबलावादकांची तबला या वाद्याकडे पाहायची नजरच बदलून टाकली असे म्हणल्यास अतिशयोक्ती होणार नाही. वर्षानुवर्षे फक्त गुरुमुखी असलेली तबल्याची घरंदाज विद्या, जी साधारण तबलावादकांना ठाऊकही नव्हती किंवा त्यांच्यापर्यंत कधी पोहोचलीच नसती, ती महान घरंदाज विद्या सामान्य तबलावादकांपर्यंत पोहोचवण्याचे अद्भुत कार्य गुरुजींनी केले. तोही एका अर्थी त्यांचे गुरू व फरुखाबाद घराण्याचे खलीफा उ. अमीर हुसेन खाँ यांच्या संस्कारांचाच एक भाग होता असे म्हणल्यास त्यात काहीच वावगे होणार नाही. खाँ साहेबांनी स्वत: मुक्त हस्ताने शिष्यांना विद्यादान केले. नवनवीन रचना बांधायला प्रोत्साहित केले. त्यामुळे गुरुजींनी तबला हे पुस्तक प्रसिद्ध करून पारंपरिक विद्येची दारे सर्वांसाठी खुली केली यात नवल काहीच नाही. त्याकाळी मोठ्या गुरुकडे पोहोचणेच अगोदर दुष्प्राप्य. त्यानंतरही अशा गुरुंकडून विद्या मोठ्या कष्टानेच शिष्याला हासील होत असे, याची अनेक उदाहरणे गायक-वादकांमध्ये सर्वज्ञात आहेत. गुरुजी ज्या काळात तबला शिकत होते त्या काळात अशी विद्या विनासायास खुली केल्याबद्दल कदाचित त्यांच्यावर टीकाही झाली असेल. पण गुरुजींमध्ये एका उत्तम सेवाभावी शिष्याबरोबरच एक अॅकॅडमिशिअन दडलेला होता, यामुळेच तबला या ग्रंथाची निर्मिती होऊ शकली. हा एक परिपूर्ण ग्रंथ आहे. त्यामध्ये काय नाही. हे वाद्य बनते कसे येथपासून सर्व काही आहे. या वाद्याचा इतिहास, भूगोल, भाषा, व्याकरण, कला, शास्त्र अशा अनेक किंवा सर्वच विषयांचा उहापोह केला आहे. हा ग्रंथ माझ्या हातात पडल्यावर साहजिकच मी ही प्रभावित झालो. त्यातल्या बुजुर्ग उस्तादांच्या रचनांनी मोहित झालो. यथाशक्ती वाजवायचा प्रयत्न करु लागलो, पण त्या रचनांची खरी गंमत गुरुजींकडे शिकायला लागल्यावरच समजली. पुस्तकात वाचून केलेली पुरणपोळी आणि सुगरणीच्या हातच्या पोळी यात जो फरक आहे, तसंच गुरुजींकडे गेल्यावर, तीच रचना, अरेच्चा हा बोल असा वाजवायचा काय, किंवा कोणत्या अक्षराला कोणते बोट वापरले कि त्याच बोलाचे जणू रूपच पालटते, ही गंमत अनुभवायला मिळाली ! घरंदाज विद्या आणि गुरूमुखी विद्येचा नवा अर्थ, नवा संदर्भ, त्याची श्रीमंती याचा साक्षात्कारच झाला जणू. गुरुजींच्या आठवणींचा डोह या पुस्तकात त्यांचे गुरू उ. अमीर हुसेन खाँ यांच्याकडून विद्या घेतानाची धावपळ, ओढाताण, शिक्षणाची तळमळ इतकी सुंदर शब्दबध्द केली आहे पण त्याचबरोबर खाँ साहेबांच्या अनेक सुंदर सुंदर रचनाही उदार हस्ते तबलावादकांसाठी खुल्या केल्या आहेत. उ. अमीर हुसेन खाँ यांच्या तालमीत, प्रतिभावंत बुजुर्गांच्या अनेक वर्षांच्या रियाजातून, चिंतनातून तयार झालेल्या रचनांची श्रीमंती, गुरुजींनी अनुभवल्यामुळे त्यांना व्यसन जडले ते अशा रचना वेचण्याचे ! या रचनांचे महत्त्व गुरुजी जाणून आहेत हे समजल्यावर त्यांचे गुरू उ. अमीर हुसेन खाँ, उ. अहमदजान थिरकवाॅ व त्यानंतर उ. अता हुसेन खाँ व अनेक गुणीजनांनी या विद्येच्या थैल्या तुम्हारे पास हिफाजत म्हणजे सुरक्षित राहील म्हणून गुरुजींकडे भरभरून मोकळ्या केल्या. गुरुजींकडील या रचनांच्या श्रीमंतीची मोजदाद करायची झाल्यास 'अथांग', ज्याचा थांग लागत नाही अशाच शब्दांत करावी लागेल. त्यांच्याकडे गेल्यावर शिष्यांची अवस्था, घेता किती घेशील दो करांनी अशीच होत असे. त्यांच्या एकसष्टी निमित्त त्यांनी आम्हां प्रत्येक शिष्यांना काय दिले तर स्वरचित रचनांचे पुस्तक. त्यांच्या बोलण्यातून बुजुर्गांची महती सतत अधोरेखित होत असे. त्यांच्यापुढे आपण खुजे आहोत ही जाणीव गुरुजींनी सतत जागृत ठेवली. त्यामुळेच त्यांच्या पुस्तकाचे नाव 'गुस्ताखी माफ' म्हणजे बुजुर्गांसमोर रचना करण्याचे धाडस मी करतो आहे तरी क्षमा असावी! त्यांचे म्हणणे बुजुर्गांच्या रचनेपलिकडे पहायचेच नाही असे नाही तर, या रचना अगोदर पचवायला, आत्मसात करायला हव्यात आणि मग याच रचना तुम्हाला पुढचा रस्ता दाखवतील असे असायचे.
त्यांच्याकडे प्रथम गेलो तेंव्हा तबला या ग्रंथाचे लेखक म्हणजे मोठ्या कडक शिस्तीचे व अत्यंत गंभीर व्यक्तीमत्वाचे असतील असे वाटले होते, पण गुरुजी सर्वांसाठीच अत्यंत साधे, निगर्वी व अतिशय प्रेमळ होते. प्रत्येकाची शिकण्याची क्षमता कमी अधिक असते पण ते कधीही कुणावर रागावल्याचं आठवत नाही. गुरुजींना कोणीही कधीही कुठेही वाजवायला बोलावले तर कसलेही आढेवेढे नाहीत, कसे जायचे, कुठे उतरायचे वगैरे काही न विचारता लगेच होकार देत. इतकेच काय त्यांच्याकडे कोणी तबल्याचा विद्यार्थी, कोणत्याही कारणाने गेला तरी रिक्त हाताने गेला नसेल. गुरुजी काही ना काही त्याला देणार, किंवा काही माहिती विचारणार किंवा त्याच्याकडून काही घेण्यासारखे असल्यास त्याच्याकडून शिकून घेण्यातही त्यांना कुठेच कमीपणा वाटत नसे ! आजरपण अनेक वर्षे मागे लागूनही त्यांचा उत्साह तेवढाच होता. तरूण पिढीचे गायन-वादन कोऱ्या पाटीने ऐकणे, त्यांना प्रोत्साहित करणे हे त्यांना मनापासून आवडायचे. शेवटच्या काही वर्षांत त्यांचे फेसबुकशी नाते जुळले आणि अनेक नवीन कलाकारांच्या लिंक्स ऐकून आम्हा शिष्यांना त्या शेअर करून ऐकण्यासाठी उद्युक्त करायला त्यांना मनापासून आवडे.
चित्र काढणे हा पण गुरुजींचा विरंगुळा होता. काही वर्षांपूर्वी गुरुजींनी उ. अल्लारखा खाँ साहेबांचे चित्र काढून त्यांच्या बरसीला घेऊन गेले. झाकीरभाईंनी ते चित्र पाहिले आणि आसवे गाळत बराच वेळ ते गुरुजींचे पाय दाबत राहिले. गुरुजींकडूनच ही हकीकत जेंव्हा ऐकली, तेंव्हा एकमेकांवरील आदराने भारलेले वरील सुंदर नि:शब्द चित्र मनावर कायमचे कोरले गेले.
झाकीरभाईंपासून सर्वच नामवंत तबलावादकांना गुरुजींविषयी आदर होता. गुरुजींच्या विद्येचे पाणी खोल व गहीरे असल्याने त्याचे प्रदर्शन त्यांनी कधीच केले नाही. प्रसिद्धीपासून ते चार हात लांबच राहिले. त्याची त्यांना फारशी खंतही वाटली नाही. अलीकडेच मिळालेला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार वगळता त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांचा यथोचित गौरव झाला नाही असे आम्हा शिष्यांना नेहमीच वाटत असे.
सामान्य संगीत रसिकांना त्यांचे मोठेपण सांगणे खूप अवघडच आहे. त्यांच्या विषयी सांगताना बंगालमधील प्रसिद्ध लेखक शरतचंद्र व रविंद्रनाथ टागोर यांची गोष्ट नेहमी आठवते. एकदा शरतचंद्रांचा एक शिष्य त्याच्या गुरूंना खूष करण्यासाठी म्हणाला, तुमचं लिखाण आम्हाला समजतं ते रविंद्रनाथ काय लिहितात ते समजत नाही. यावर शरतचंद्र शिष्याला म्हणाले, मी तुमच्यासाठी लिहितो अन् रविंद्रनाथ माझ्यासाठी लिहितात ! तसे पं. अरविंद मुळगांवकर हे तबलावादकांचे तबलावादक होते. गुरुजी वाजवायला लागले की त्यांच्या हाताकडे पहात रहावेसे वाटे. गुरुजींच्या अमूल्य विद्येचा ठेवा जपण्याची अवघड जबाबदारी आम्हां शिष्यांवर आहे ती जपण्याचा आटोकाट प्रयत्न निश्चितच करु.
गुरुजींनी त्यांचे गुरू ऊ. अमीर हुसेन खाँ यांच्या विषयी बोलताना एके ठिकाणी, माझ्या सर्व सुखाचे श्रेय माझ्या गुरुजनांच्या आशिर्वादात आहे असे म्हटले आहे.
माझीही भावना वेगळी नाही.
गुरुजींनी त्यांचे गुरू ऊ. अमीर हुसेन खाँ यांच्या विषयी बोलताना एके ठिकाणी, माझ्या सर्व सुखाचे श्रेय माझ्या गुरुजनांच्या आशिर्वादात आहे असे म्हटले आहे.
माझीही भावना वेगळी नाही.
हेमकांत नावडीकर...


अप्रतिम लेख !! आठवणी चा डोह आहेत गुरुजी !! लेख प्रसारित केल्या बद्दल धन्यवाद काका !!
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteमुळगांवकर गुरुजींचा संपूर्ण जीवनपट आपल्या लेखात पूर्णपणे दिसतोय
ReplyDeleteमुळगांवकर गुरुजींचा संपूर्ण जीवनपट आपल्या लेखात पूर्णपणे दिसतोय
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद...
ReplyDeleteअप्रतिम लेख हेमकांतजी.
ReplyDeleteधन्यवाद मुखेडकर सर...
Deleteसमग्र सुंदर लेख ! गुरुवर्य अरविंदजी म्हणजे विद्या, कलेने संपूर्ण भारलेले अगम्य व्यक्तीमत्व ! त्यांना मनःपूर्वक अभिवादन व आदरांजली !🌹🙏🌹 तू भाग्यवान आहेस इतके चांगले तबला वादक प्रशिक्षक, गुरु तुला लाभले
ReplyDeleteअप्रतिम लेख. गुरुजींचं यथार्थ वर्णन
ReplyDelete