संगीतातील घराणी
संगीतातील घराणी
संगीतात घराणी असावी कि असू नये याविषयावर नेहमीच उलटसुलट चर्चा चालू असते. बरेच वेळा मोठमोठे कलाकारही घराण्यांची बंधने हवीत कशाला असे म्हणताना दिसतात तेंव्हा सामान्यांना अधिकच गोंधळल्यासारखे होते. खरंच घराणी हवीत का नकोत?
घराणं याचा शब्दश: अर्थ म्हणजे घर जरी असला तर घर असे सरळ का संबोधत नाहीत? कारण घर म्हणजे आपण राहतो ते चार भिंतींचे घर आणि घराणे म्हणजे नुसत्या चार भिंतीच नाहीत तर पूर्वजांच्या, वाडवडिलांच्या रुढी, परंपरा, चालिरीती, रितीरिवाज यांचे अनेक वर्षांचे संस्कार घेउन बनलेले घर म्हणजे घराणे. संगीतातील घराण्याच्या बाबतीतही असेच म्हणता येइल. संगीतातील घराणेसुद्धा आपल्या गुरुजनांच्या संस्कारांनी बनलेले असते. तो शिक्षण घेण्याचा एक राजमार्गच आहे म्हणा ना. आजही लग्नाच्या बाजारात चांगला मुलगा शोधायचा असेल तर त्याचं घराणं कोणतं किंवा कसे आहे हाच निकष मानला जातो. म्हणूनच चांगल्या घराण्यात संगीताचे शिक्षण घेतलेल्या कलाकाराचे गायन, वादन समजले नाही तरीही आनंद देणारेच असते. तो एक रुळलेला, खात्रीशीर, अनुभवसिद्ध यशाचा मार्ग असतो. या मार्गात धोक्याची ठिकाणे कमी किंवा ज्ञात असतात. या मार्गाने गेल्यावर तुम्ही कुठे तरी नक्की चांगल्याच ठिकाणी पोहोचाल हे निश्चित असते. कुठे पोहोचाल ते तुमच्यावर अवलंबून आहे पण चुकिच्या ठिकाणी तरी नक्की पोहोचत नाही. उत्तम घराण्याचे शिक्षण असल्यावर पोहोचाल ते सुयोग्य ठिकाणीच. कोणते घराणे चांगले किंवा वाईट हा प्रश्न वेगळा आहे. तो तुमच्या आवडीचा, पसंतीचा भाग आहे. प्रत्येक घराण्याची काही ना काही वैशिष्ट्ये असतात. कुठे स्वरांना जास्त गोंजारले जाते तर कुठे तालावर अधिक प्रेम करतात, काही घराण्यात दोन्हीला तेवढेच महत्व आहे. पण कुणाला गोड आवडते तर कोणाला तिखट तसाच हा प्रकार आहे. पण प्रत्येक घराण्याने उत्तम गायक वादक निर्माण केले आहेत. अगदी नावेच घ्यायची तर उस्ताद फ़ैयाझ खॉ, उस्ताद अब्दुल करीम खॉ, उस्ताद अल्लादियाखॉ, उस्ताद विलायत हुसेन खॉ, उस्ताद बडे गुलाम अली किंवा अलिकडच्या पिढीत पंडीत भीमसेनजींपासून पंडीत उल्हास कशाळकरांपर्यंत अनेक दिग्गज कलाकरांनी आपापल्या घराण्याचे नाव रोशन करण्यात धन्यता मानली आहे.
मग हे सगळे छान छान असताना हेच किंवा या दर्जाचे कलाकर आपापल्या घराण्याचे नाव कान पकडून मोठ्या अभिमानाने घेतात खरे, पण मोठे झाल्यावर घराण्याच्या चौकटी हव्यात कशाला असे कशासाठी म्हणत असतील ? कलाकार मोठा झाला, एका ठराविक उंचीवर पोहोचल्यावर त्याला जसे दूरदूरचे दिसायला लागते. पर्वती चढायला लागल्यापासून माथा हेच उद्दिष्ट असते. पण ’माथ्यावर पोहोचल्यावर’ समोर दिसणारे विहंगम दृष्य कलाकाराला अस्वस्थ करते. दूरची क्षितिजे खूणावू लागतात. माथ्यावर पोहोचता पोहोचता शिखरावर पोहोचण्याचा रस्ता माहिती झालेला असतो. शारिरिक, मानसिक तयारी झालेली असते किंवा ती कशी करायची याची उत्तरे सापडलेली असतात. जणू सर्व इंधनाची टाकी पूर्ण भरलेली असते आणि मग त्याला आपल्याच चौकटींची जाणीव होते. त्याच्या आतून स्वत:चाच आवाज त्याला ऐकू येउ लागतो, त्याच्या आंतरिक उर्मी त्याला बाहेर खेचू पाहतात, तेव्हा त्याला स्वत:च्याच घराण्याची मर्यादा दिसायला लागते. सांगायचे खूप काही असते पण शब्द अपुरे पडू लागतात. मग ही घराणी हवीतच कशाला वाटायला लागते कारण आतली उर्जा, सर्जनशीलता त्याला स्वस्थ बसू देत नाही. समोर ’स्वत:ची’ वाट सापडलेली असते. हे करुन पाहू, हे ही करायला काय हरकत आहे, असे विचार करण्याचे धाडस आणि बळ त्या कलाकाराला त्याच्या जडणघडणीतूनच मिळालेले असते. हे सगळे केंव्हा, तर राजरस्त्याने, हमरस्त्याने किंवा रीतसर घरंदाज शिक्षण घेतले तरच. नाहीतर पर्वतशिखरे पादाक्रांत करताना चुकीच्या मार्गाने जाउन काही अघटीत घडल्याची अनेक उदाहरणे आपण वर्तमानपत्रात नेहेमीच वाचतो. संगीतात प्राण गमावले नाहीत तरी कलाकार कुठल्या तरी भलत्याच ठिकाणी जाऊन पोहोचतो.
म्हणूनच चौकट तोडण्यासाठीदेखील चौकटीचेच महत्व आहे. चौकट आहे म्हणून तर ती तोडण्यात गंमत आहे. मूर्त गोष्टींमधूनच अमूर्त गोष्टींचा शोध घ्यावा लागतो. म्हणूनच घराण्याचे महत्व आहे. घराणी हवीत कशाला हे कोण म्हणतो हेही तितकेच महत्वाचे आहे. कलेचे शिक्षण घेता घेता स्वत:च्या ज्ञानाच्या गाडीची क्षमता, शक्ती, ताकद वाढत जाते, तसतसा त्याला मोठा रस्ता छोटा वाटायला लागतो. म्हणूनच एका विशिष्ट पातळीपर्यंत घराणेदार शिक्षण घ्यायला हवे. परिपक्व झाल्याशिवाय अंड्यातून पिल्लूसुद्धा बाहेर पडू शकत नाही, परिपक्व झाल्याशिवाय पानही आपल्या झाडाचा हात सोडत नाही, उंच भरारी घ्यायला त्याची योग्य वाढ तर व्हायला हवी. एका ठराविक ठिकाणी पोहोचेपर्यंत घराणी हवीतच, निसर्गाचाही नियमच आहे.
हेमकांत नावडीकर
हा लेख यापूर्वी दैनिक सकाळमध्ये प्रकाशित झाला आहे...
हा लेख यापूर्वी दैनिक सकाळमध्ये प्रकाशित झाला आहे...





Comments
Post a Comment