कलाकार आणि प्रवास
कलाकार आणि प्रवास
कलाकार आणि प्रवास याचे अगदी घट्ट नाते आहे. कलाकार म्हणले कि प्रवास हा आलाच. कलाकाराच्या हातात तानपुरा आणि पायाला भिंगरी हे त्याच्या लल्लाटी जन्मत:च कोरलेले आहे म्हणा ना. मायबाप रसिक जिकडे आणि जेंव्हा बोलावतील तेंव्हा त्याला जायलाच हवे, तेही न कुरकुरता. मनासारखी बिदागी मिळालेली असो वा नसो, मनाजोगता व सुखकर प्रवास असो वा नसो, बोलावले कि जायचे आणि प्रवासातील कोणत्याही नकारात्मक गोष्टींची पार्श्वभूमी, आढी मनात न बाळगता समरसून आपली कला सादर करायची व त्याही पुढे रसिकांची मने जिंकायची ही तर मोठीच कसोटी. तानपुर्याची तार बाहेर रसिकांना कितीही गोड ऐकू आली तरी या सगळ्या गोष्टी विचारात घेता कलाकारांसाठी प्रवास हा जणू तारेवरचीच कसरत म्हणाना !!
आता प्रवास पूर्वीइतका कठीण राहिलेला नाही. पूर्वी म्हणजे एस.टी., टांगा अशा डुचमळणार्या वाहानांमधून आपली वाद्ये सांभाळत प्रवासाच्या ठिकाणी पोहोचायचे. त्यातही दळणवळणाची साधने आजच्याइतकी सोपी व सुकर नव्हती. न ऐकू येणारे फ़ोन. तातडीने निरोप देण्यासाठी बुक केल्यावर कितीही वेळाने लागणारे ट्रंककॉल्स, वेळी-अवेळी पोहोचणार्या पोस्टाच्या तारा, अशा दिव्यातून स्टेशनवर आपल्याला आणायला येणारी मंडळी शोधायची. मुक्कामाच्या सोयीही, रात्रीपुरती पाठ टेकण्याची जागा, या सदरातच मोडणार्या असत. आघाडीच्या कलाकारांना जरा प्रवास त्यामानाने सोपे, म्हणजे गर्दीतील प्रवासाचा धक्का कमी असणारे असले, तरी त्यात फ़ार मोठा फ़रक नसे. याहीपेक्षा अगोदरच्या काळातील कलाकारांची, पुलंनी संगीत चिवडामणी या लेखात कैफ़ियत हुबेहूब विशद केली आहे. सर्वच कलाकारांची परिस्थिती काही अगदी इतकी क्लेशदायक नव्हती, काही काही कलाकार मंडळी आपल्या कलेतील उंचीने, आपापला मानसन्मान व्यवस्थित सांभाळून होती. भीमसेनजींसारख्या लोकप्रिय व यशस्वी कलाकाराचा तर प्रवास हा जिव्हाळ्याचा विषय. त्यांनी स्वत:, स्वत:ची गाडी चालवत सर्व देश पालथा घातला. त्याकाळी रस्त्यांची बिकट अवस्था, आजच्यासारखी पॉवर स्टिअरिंग, पॉवर ब्रेक्सच्या ऐवजी पॉवर लावल्याशिवाय न थांबणारे व पॉवरशिवाय न वळणारी वहाने ! प्रवासातीला सुरक्षितता व एकंदरच सुविधांचा अभाव असूनही त्यांनी अफ़ाट प्रवास करुन आपल्या गायनाने जग जिंकले. त्यांच्या अफ़ाट प्रवासातील किस्से व अनुभव, सुरस व चमत्कारिक या सदरात मोडणारे होते.
आता काळ खूपच बदलला आहे. प्रवास व दळणावळणाची साधने आता खूपच सोयीची व सुविधाजनक झाली आहेत. प्रवास जलद झाला आहे. गायक-वादक मंडळी विमानेनेच एवढा प्रवास करतात कि अशा कलाकारांचा उल्लेख गंमतीने हवाई-गंधर्व केल्याचे ऐकिवात आहे. तरीही दुय्यम किंवा होतकरु कलाकारांची परिस्थिती फ़ारशी सुखावह अजूनही नाही. तबला, पेटीच्या अवजड बॅगा हाताळताना दुखणारे खांदे मग सवयीने दुखेनासे होतात. प्रवासात पूर्वी तर बसस्टॅन्डवर उतरल्यावर सतार, संतूर किंवा वैशिश्ट्यपूर्ण आकाराच्या वाद्यांच्या बॅगा पाहून जकातनाक्यावरही हजेरी लावावी लागे. लाल एस.टी.ला पर्याय नसे. त्यातून सतार तानपुरा यांसारखी वाद्ये सुखरुप इष्ट स्थळी न्यायची म्हणजे दिव्यच.
परदेश प्रवासाची तर अजून वेगळीच तर्हा असते. वादकांना विमानप्रवासासाठी खास प्रकारच्या बॅगा बनवून घ्यावा लागतात. तरीही वाद्य सुखरूप पोहोचेल किंवा नाही याची मनात सतत धास्ती. कलाकारासाठी स्वत:चे वाद्य म्हणजे जीव कि प्राण. आपले वाद्य मनाजोगते नसले तर कलाकाराची अवस्था फ़ारच अवघड होते. आजही अनेक वेळा मोठ्या कलाकारांचे सरोद फ़ुटले, हरवले अशा बातम्या पहातो, त्यावेळी कदाचित झालेले नुकसान विमानकंपनी देतही असेल, पण प्रिय वाद्य गमावल्याचे दु:ख एक कलाकारच समजू शकतो. गायक-वादक त्यांचा प्रवासातील अनेक चांगले-वाईट अनुभव हा खूप मोठा विषय आहे. एकदा एका आघाडीच्या वादक कलाकाराला सहज गंमतीने प्रश्न विचारला होता कि तुम्ही प्रवासाला कसे जाता? यावर त्याने दिलेले उत्तर विचार करायला लावणारे व सहजपणे अनेक गोष्टींवर प्रकाश टाकणारे होते. त्याने सांगितले कि फ़्युजनचा कार्यक्रम असला तर विमानाने जातो, सुगम असला तर रेल्वेने आणि शास्त्रीय संगीताचा असला तर एस.टी.ने !
हेमकांत नावडीकर



फारच छान लिहिले आहेस. 👍👍
ReplyDeleteधन्यवाद..
Deleteथोडक्या शब्दामध्ये विषयाचे मर्म पोचवलेत. लिहीत रहा! शुभेच्छा!
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखरय
Deleteधन्यवाद आनंदजी...
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete