ग्रीनरूम

ग्रीनरूम


संगीताच्या कार्यक्रमाची ग्रीनरूम ही एक अद्भुत आणि कुतुहलाची गोष्ट आहे. मुख्य कलाकार कार्यक्रमस्थळी येउन प्रथम ग्रीनरूममध्ये येउन स्थानापन्न होतात तेंव्हा सामान्य रसिकांचे कुतुहल आपोआप जागृत होते. मंचावरती सर्वांना दिसणारे कलाकार प्रत्यक्षात कसे दिसतात, कसे बोलतात, काय बोलतात, कसे वागतात या सगळ्याचेच सामान्य रसिकांना मोठे आकर्षण असते.
कलाकार ग्रीनरूममध्ये येताना एक वेगळीच व मजेशीर लगबग सुरु होते. बहुतेक वेळा मुख्य कलाकाराबरोबर त्यांची एक-दोन शिष्यमंडळी व एखादी खाशी किंवा जवळची व्यक्ती बरोबर असते. अशा मंडळीमध्ये कोणी डॉक्टर, वकील किंवा कोणी कलाकाराच्या जवळच्यांचे अगदी जवळचे असते, असे पाहुणे असतातच, तर कधी गावातील रसिक पुढारी, कलेक्टरांसारखे सरकारी अधिकारी, ही सगळी प्रतिष्ठित मंडळी ग्रीनरूममध्ये असतात. मुख्य कलाकारांशी किरकोळ गप्पाटपा करतात आणि आपल्या बसण्याची व्यवस्था झाली कि फ़ार वेळ तेथे न रेंगाळता स्थानापन्न होतात. बराच वेळ बाहेर रेंगाळणारे, ग्रीनरूमध्ये आत जाण्यासाठी ताटकळणारे चाहते, एव्हाना अस्वस्थ झालेले असतात. कलाकाराची एक झलक दिसण्यासाठी कोणी तहानलेला असतो, कोणी त्यांचे स्वत:च्या हाताने काढलेले चित्र दाखवण्यासाठी, तर कोणाला फ़क्त सही मिळाली तरी पुरे असते. अलीकडच्या काळात काही चाहते, त्यांच्याबरोबर सेल्फ़ी काढुन, कार्यक्रम सुरु होण्याच्या आत फ़ेसबुकवर अपलोड करायला मिळते कि नाही, अशाही विवंचनेत असतात. या सगळ्यात सर्वात महत्वाची व्यक्ती कोण असेल तर ती म्हणजे ग्रीनरूमच्या बाहेर अभा असलेला कार्यकर्ता ! मुख्य कलाकार जर सेलेब्रिटी असेल तर त्यादिवशी त्याच्या इतके महत्वाचे कोणीच नसते. खरोखरच भाव खायला ग्रीनरूमच्या द्वारपालासारखी जागा नाही. कोणाला आत सोडायचे आणि कोणाला नाही, हे त्या दिवशी केवळ त्याच्याच हातात असते. त्यामुळे कोणाला आत शिरण्याची अचानक लॉटरी लागते, तर कोणाला काही जुन्या वैयक्तिक धुसफ़ुशीमुळे आत शिरायला न मिळाल्यामुळे, जाउदे रे उद्या बघतो त्याच्याकडे, वगैरे करमणूक कधी कधी त्या ग्रीनरूमच्याबाहेर पहायला मिळते. त्या दिवशी आणि फ़क्त त्याच दिवशी, छातीवर लटकणार्‍या कार्यकर्त्याच्या बिल्ल्याचे महत्व असते. कार्यक्रमाच्या रंगमंदिरात स्टेजपासून, ग्रीनरूम ते तिकिटखिडकी असा कुठेही, कोणीही अडवू शकत नाही, अशी महती लाभलेला हा बिल्ला, जणू पासवर्ड असलेला अ‍ॅक्सेसच असतो.

कलाकारांचे साथीदार कार्यक्रमस्थळी येताच ते थेट ग्रीनरूममध्ये जातात. त्यातली गंमत म्हणजे ग्रीनरूममध्ये कोण किती अगोदर पोहोचतो यावरून कलाकार व साथीदार यांचा नवखेपणा किंवा सराईतपणा सांगता येतो. कलाकर किंवा साथीदार जेवढा अगोदर पोहोचतो, तेवढा तो नवखा आहे, हे सहज ओळखावे. नवख्या साथीदारचा अजून कसे मुख्य कलाकार आले नाहीत, व इतक्या अगोदर आम्हाला कशाला बोलावून ठेवले, असे संमिश्र भाव न लपवता येणारा व स्वत:वरची चिडचिड ठळकपणे सांगणारा चेहरा, सराईत कार्यकर्त्याला सहज ओळखता येतो. मुख्य कलाकार येतात आणि खरी लगबग सुरु होते. कलाकार व साथीदार एकीकडे आपापली वाद्ये काढून जुळवण्याच्या तयारीला लागतात. बरेच वेळा साथीदार कार्यक्रम कोठे आहे यावर वाद्याची पिशवी निवडतात ! साथीदार नवखा असू दे नाही तर बुजुर्ग, कार्यक्रम छोटा असू दे नाही तर मोठा, फ़्रॅजाईल किंवा हवाई-प्रवासाचा शिक्का मारलेली बॅग ऐटीत कार्यक्रमस्थळी मिरवतानाची मजा वेगळीच असते. गाण्याचा कार्यक्रम असला तर हार्मोनियमवर तानपुरे जुळवून राग आळवायला सुरु होते. मध्येच ओळखीच्यांबरोबर, नातेवाईक किंवा संस्थेचे अध्यक्ष किंवा पदाधिकार्‍यांबरोबर चहापान होते. तोपर्यंत कार्यकर्ता सभागृह भरल्याची बातमी आणतो, वाद्ये मंचावर पोहोचतात आणि थोड्याच वेळात कार्यक्रम सुरु होतो. झाकीरभाई, शिवकुमारजी, हरीजी किंवा अशांसारखे सेलेब्रिटी कलाकार असले तर त्यावेळी ग्रीनरूममधला माहौल काही न्याराच असतो. अशावेळी ओळख नसताना तिथे प्रवेश मिळवण्यासाठीचे एक खास कसब असते व त्यात पारंगत असलेल्या खास रसिक मंडळींचीही ग्रीनरूमबाहेर गर्दी असते. असे कलाकार ग्रीनरूममध्ये असताना, त्यांनी आपले गायन अगर वाद्य आळवायला किंवा छेडायला सुरवात केली आणि सामान्य रसिकांना, चाहत्यांना ग्रीनरूममध्ये ते पाहण्याचे, ऐकण्याचे भाग्य लाभले तर, त्यांच्या चेहेर्‍यावरील कौतुकाचे, आनंदाचे भाव मुख्य कलाकाराला निश्चित सुखावणारेच असतात. फ़क्त अशा रसिकांची होणारी प्रचंड गर्दी आणि अतिउत्साहामुळे एसी ग्रीनरूमही कधी कधी गरम होउ शकते. काहीही असले तरी मंचावरच्या आपल्या आवडत्या कलाकाराला ग्रीनरूममध्ये पहायला, बोलायला आणि अनुभवायला मिळणे हे केंव्हाही आनंददायीच असते.

हेमकांत नावडीकर

हा लेख दैनिक सकाळमध्ये पूर्वी प्रकाशित झाला आहे..... 

Comments

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान ...

मार्दवपूर्ण गाण्यांचे माळपदक : माणिक वर्मा

कुमार नावाची चिरतरुण मैफल