कलाकार आणि प्रवास
कलाकार आणि प्रवास कलाकार आणि प्रवास या चे अगदी घट्ट नाते आहे. कलाकार म्हणले कि प्रवास हा आलाच. कलाकाराच्या हातात तानपुरा आणि पायाला भिंगरी हे त्याच्या लल्लाटी जन्मत:च कोरलेले आहे म्हणा ना. मायबाप रसिक जिकडे आणि जेंव्हा बोलावतील तेंव्हा त्याला जायलाच हवे, तेही न कुरकुरता. मनासारखी बिदागी मिळालेली असो वा नसो, मनाजोगता व सुखकर प्रवास असो वा नसो, बोलावले कि जायचे आणि प्रवासातील कोणत्याही नकारात्मक गोष्टींची पार्श्वभूमी, आढी मनात न बाळगता समरसून आपली कला सादर करायची व त्याही पुढे रसिकांची मने जिंकायची ही तर मोठीच कसोटी. तानपुर्याची तार बाहेर रसिकांना कितीही गोड ऐकू आली तरी या सगळ्या गोष्टी विचारात घेता कलाकारांसाठी प्रवास हा जणू तारेवरचीच कसरत म्हणाना !! आता प्रवास पूर्वीइतका कठीण राहिलेला नाही. पूर्वी म्हणजे एस.टी., टांगा अशा डुचमळणार्या वाहानांमधून आपली वाद्ये सांभाळत प्रवासाच्या ठिकाणी पोहोचायचे. त्यातही दळणवळणाची साधने आजच्याइतकी सोपी व सुकर नव्हती. न ऐकू येणारे फ़ोन. तातडीने निरोप देण्यासाठी बुक केल्यावर कितीही वेळाने लागणारे ट्रं...