आम्हा न कळे ज्ञान ...
आम्हा न कळे ज्ञान ...
संगीत ऐकणाऱ्या श्रोत्यांचे, संगीत ऐकणाऱ्यांनीच संगीत कळणारे आणि न कळणारे असे दोन ठळक भेद करुन ठेवले आहेत. त्यातही संगीत कळणाऱ्यांमध्ये हौशी आणि जाणकार असेही भेद झालेले दिसतात. गंमत म्हणजे संगीत कारकीर्दीच्या अत्युच्च शिखरावर पोहोचलेले महान गायक, वादक त्या उंचीला पोहोचल्यावर आता कोठे मला ‘सा’ समजतोय, किंवा तबलावादक ‘धा’ समजतोय असे म्हणतात आणि त्या शिखराच्या पायथ्याशी असलेल्या अनेकांना मात्र सगळं गाणं समजतं, ही काय भानगड आहे बुवा, हे काही कळत नाही. या शिवाय अनेक मोठ्मोठ्या संगीत मैफ़लीमध्ये पुढे बसलेले जाणकार आणि मागे बसलेले हौशी ऐकणारे, असे खरेच आहे काय हे ही बऱ्याच वेळा समजेनासे होते.
म्हटलं तर, वर लिहिलेलं सगळंच खरं आहे किंवा यातलं काहीही खोटं नाही हे दोनही समज खरे आहेत ! म्हणजे संगीत कळणारेही श्रोते आहेत, न कळणारेही श्रोते आहेत, पुढे बसणाऱ्या श्रोत्यांना गाणं कळतं, मागे बसणारे श्रोतेही तितकेच समरसून ऐकतात. आणि साधनेच्या मार्गावरून, ज्ञाताचा प्रवास करता करता, ज्ञाताचे कुंपण ओलांडल्यावरही, गाणं समजायला कठीण असतं, असे म्हणणारे संगीतज्ञही खरंच बोलतात. प्रश्न आहे तो संगीत कळतं, म्हणजे काय कळतं आणि काय कळत नाही याचा.
असाच आणखी एक मुद्दा म्हणजे एखाद्या गाण्याच्या क्लासमध्ये किंवा संगीत विद्यालयामध्ये पाउल ठेवताच, नेहेमी पालक गुरुंना पहिला प्रश्न विचारतात तो म्हणजे आमच्या मुलाला गाणं कधी येईल ? विद्यार्थी जर वाद्याच्या वाटेला गेला, तर पहिल्याच दिवशी आम्ही वाद्य केंव्हा घेऊ असा प्रश्न विचारला जातो. मला तर वाटतं यापेक्षा वेडगळ प्रश्न, जगात इतर कुठल्याच शाखेच्या अभ्यासाच्या पहिल्या दिवशी विचारला जात नसेल. कळणे न कळण्याचा प्रवास इथूनच सुरु होतो.
इतर शाखांच्या अभ्यासाप्रमाणेच संगीतातही पहिली, दुसरी अशा विविध इयत्ता असतात. प्राथमिक, माध्यमिक, विद्यालय, महाविद्यालय, विद्यापीठ असे शिक्षणाचे टप्पे असतात. यातील एकेक इयत्ता पास झालात तरच पुढची पायरी चढता येते, असे सगळे इतर शिक्षण पद्धतीप्रमाणेच इथेही शास्त्र, कला, वाणिज्य, इतिहास, भूगोल असे सगळे आहे. फ़क्त संगीतातल्या इयत्ता, त्याचे मार्क व त्याची प्रगतीपुस्तके गुरु नामक संस्थेच्या स्वाधीन असल्यामुळे, विद्यार्थ्याची इयत्ता गुरूंना विचारूनच ठरवणे हे उत्तम. वास्तविक पालकांनी गुरुंना, माझ्या पाल्याला गाणं केव्हा येईल असं विचारण्याऐवजी, माझा पाल्य केंव्हा प्राथमिक किंवा माध्यमिक टप्पा ओलांडेल, असा प्रश्न विचारणे हे अधिक योग्य वाटते. तसेच वाद्य शिकणाऱ्यांच्या बाबतीतही आहे. आमचा पाल्य संगीत शिकला तरच वाद्य घेऊ असे म्हणतात. तेव्हा कधी कधी रागही येतो. आपल्या पाल्याला शाळेत घातल्यावर पहिल्या दिवशी पाल्य शिकला तरच आम्ही वह्या पुस्तके घेऊ असे पालक म्हणतात का ? आपला पाल्य शिकून कोण होणार आहे, डॉक्टर होणार आहे कंपाउंडर याचा विचार न करता, पाल्याला उत्तमात उत्तम शिकण्यासाठी आयुष्यभर राबतात. पाहिलीपासून पदवी प्राप्त होईपर्यंत कसलाच विचारही करत नाहीत. तेच पालक संगीत विद्यालयात अगर गुरूला मात्र संगीत शिक्षणाच्या पहिल्याच दिवशी केव्हा वाद्य घेऊ असा प्रश्न विचारतात तेव्हा त्या पालकांच्या संगीत विषयक दृष्टीकोन पाहून हसावे की रडावे हे समजत नाही.
जसे गाणे, संगीत शिकण्याचे टप्पे आहेत तसेच ऐकण्याचेही आहेत. जसे शालेय शिक्षणात शास्त्र, व्याकरणाच्या अभ्यासाशिवाय किंवा शाळेत न जाताही जुजबी ज्ञान आपण घेऊ शकतो, तसेच रागज्ञानाच्या माहितीशिवायही संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकतो. मागे बसलेल्या श्रोत्याला राग ओळखता आला नाही तरी त्याचा तथ्यांश तर समजतो. लहान बालकाला आई गोष्ट सांगते ती त्याला थोडीच समजते ? पण हे काहीतरी ऐकण्यासारखे आहे एवढे मात्र त्याला समजते. थोडे मोठे झाल्यावर हळूहळू आई आपल्याला रागे भरते आहे हे शब्दार्थ न कळताही त्यातला भाव त्याला समजायला लागतो. मग हळूहळू भाषा समजायला लागते. तसे सामान्य श्रोत्याला रागातला वर्ज्य स्वर लागताच, बाकी काही समजले तरी, पुलंच्या भाषेत गवई गल्ली चुकलं कि हो, एवढे कळते. मोठे झाल्यावर आईची गोष्ट पूर्ण उमगायला लागते, त्यातील भाषा, व्याकरण, कल्पनेने त्यातील चित्रही समोर उभे राहू लागते. तेच मूल आईबापाच्या भूमिकेत गेल्यावर, रागे भरूनही न झोपणारे मूल, अडगुलं-मडगुलं सारख्या निरर्थक शब्दाने क्षणार्धात झोपी जाते आणि मग त्याला कळायला लागते कि आपल्याला काहीच कळलेले नाही ! यातली गंमतीची गोष्ट अशी कि लहान बालकाची गोष्ट समजायला किंवा ते मूल आई-बापाच्या भूमिकेत जायला किमान पंचवीस - तीस वर्षे लागतात. त्याचप्रमाणे तीस वर्षं साधना केल्यावर कलाकारांनीही मला काही कळलं नाही किंवा आत्ता कोठे समजायला लागले आहे असे म्हणल्यास नवल ते काय ! संगीतशास्त्र अजिबात न शिकता गाण्याचा सर्वसाधारण भाव समजणारा एक वर्ग, तर चार दोन परीक्षा झाल्यावर दोन-चार रागांची नावे सांगून संगीत आम्हाला समजते हे सांगणाऱ्याचा गुगली ओळखता यायला हवा. संगीत विशारद, संगीत अलंकार अशा पदव्या धारण केल्यावर संगीताचे शास्त्र तरी नक्की माहिती होते. त्यानंतर संगीत समजणे आणि ते सादर करणे या अजूनच अवघड व भिन्न संकल्पना आहेत. सादर करणाऱ्याने शास्त्राबरोबरच त्यावर प्रत्यक्षात भरपूर सराव केल्यावरच संगीत साध्य होण्याच्या दिशेने प्रवास सुरू होतो. पदवी घेतल्यानंतरही किंवा एखाद्या गुरुकडे शिकल्यावर गाणे समजते असे म्हणावे तरी पंचाईतच, कारण प्रत्येक घराण्याचे शास्त्र वेगळे, त्यामुळे किराणा घराणे किंवा पतियाळा घराणे समजले तरी ग्वाल्हेर, आग्र्याहून सुटका होईलच असे नाही. थोडक्यात काय, गाणे ऐकणे काय किंवा गाण्याचे शिक्षण काय, महत्त्वाची एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे ..
'जेव्हापासून किती समजतं हे समजतं, त्या दिवसापासून खरं शिक्षण सुरू होतं !!!'
एवढं कळलं तरी सगळं समजल्यासारखं आहे ..
~ हेमकांत नावडीकर
navdikar@gmail.com
वा! छान मार्मिक लेख !🌹💐
ReplyDeleteप्रत्यक्ष घोटाळा आणि समजूतीचा घोटाळा हे दोन्ही नीट समजले पाहिजेत
धन्यवाद 🙏🏻
Deleteसुंदर आणि अत्यंत महत्त्वाचा लेख आहे.
ReplyDeleteगाणे समजणे आणि त्याच्या विविध पातळ्या......
धन्यवाद 🙏🏻
Deleteसुंदर आणि मार्मिक लिखाण
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏻
DeleteUtram!!
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏻
Deleteकहना क्या चाहते हो?
ReplyDeleteसुंदर लेख. पु लंनीच एका ठिकाणी म्हटले आहे - गाण्यात फक्त ट्युशन असून उपयोगी नाही, त्याच्या साठी इंट्युशन असावी लागते. आणि ही इंट्युशन काही जणांना का असते आणि काहींना का नसते ह्याचे उत्तर विज्ञान अथवा तर्क देऊ शकणार नाही.
ReplyDeleteAs per Socrates -
'To know, is to know that you know nothing. That is the meaning of true knowledge.'
धन्यवाद 🙏🏻
Deleteउत्तम लेख… माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे वाक्य म्हणजे, “ रागज्ञानाच्या माहितीशिवायही संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकतो”
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏻
Deleteउत्तम लेख. अगदी योग्य शब्दांत मांडले आहे!
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏻
Delete