मार्दवपूर्ण गाण्यांचे माळपदक : माणिक वर्मा
मार्दवपूर्ण गाण्यांचे माळपदक : माणिक वर्मा
स्व पद्मश्री माणिक वर्मा यांची गाणी मला फार आवडतात असं जर
मी म्हणलं तर त्यात विशेष आणि वेगळं असं काय आहे. कारण माणिकताईंची गाणी मलाच काय सर्वांनाच
तितकीच आवडतात. कोणत्याही प्रसंगी एखाद्या बेसावध क्षणी असो किंवा प्रवासात
गाडीमध्ये आवर्जून लावलेली असो. माणिकताईंच्या आवाजातले गाणे सुरू झाले, त्यांचा
आवाज ऐकला की आपोआप सर्व विसरून त्या गाण्यांमध्ये कधी मुग्ध होऊन जातो खरंच समजत
नाही. आज माणिकताईंचा जन्मदिन. त्यांच्यावर आजवर पुलं पासून अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ
दिग्गज मंडळींनी लिहिले आहे. पण जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्या गाण्यातून
मिळालेल्या आनंदातून थोडं उतराई व्हायचा प्रयत्न करून पहावा म्हणून हे शब्दांचे
माळपदक.
सुगम संगीत गाणाऱ्यांचा एक विशिष्ट प्रकारचा आवाज असावा
लागतो असा एक सार्वत्रिक समज किंवा गैरसमज आहे असं अनेक वेळा जाणवतं. हे कदाचित थोडं
विवादास्पद वाटेल पण माणिकताईंचा आवाज ऐकला की मात्र हे विधान खटकणार नाही. कारण माणिकताईंच्या
आवाजात असलेले वेगळेपण. सुगम संगीतासाठी जसा आवाज लागतो तसा त्यांचा आवाज नक्कीच
नव्हता. पण तरीही त्यांच्या आवाजाला एक चेहरा होता, स्वत:ची ओळख होती. किंचितसा
अनुनासिक, काहीसा बसका तरीही अतिशय वजनदार व धारदार.
गळ्यातली फिरत हा जणू दागिनाच. अनंता अंत नको पाहू, आळविते मी तुला,
कृष्णा पुरे ना, घननीळा, चरणी तुझिया मज देई, त्या सावळ्या तनूचे, भाग्य उजळले
तुझे, येऊ कशी घनश्याम, लक्ष्मी तू या, वृंदावनात माझ्या, सावळाच रंग तुझा,
जाळीमंदी पिकली करवंद ही आणि अशी कितीतरी गाणी, नाट्यगीतं, भक्तिगीतं, माणिकताईंच्या
मार्दवपूर्ण, मधाळ, मायाने भरलेल्या,
ममत्वाने ओतप्रोत आवाजात एकदा सुरू झाली, की ऐकणाऱ्याच्या मनात एक
वेगळीच भावना दाटून येते. त्यांची गाणी ऐकताना आईच्या, आजीच्या पातळाने शिवलेल्या पांघरूणाला
येणारा मायेचा दरवळ आठवतो आणि धुके जसे पसरावे तशा आठवणी दाटतात ! अनेक
गाण्यांमधील सहजसुंदर फिरत मनाला भुरळ घालते.
स्व
पद्मश्री माणिक वर्मा यांच्या वेबसाइट वरुन साभार
माणिकताई अनेक
गुरूंकडे म्हणजे श्री सुरेशबाबू माने, जगन्नाथबुवा पुरोहित, उ इनायत खा, पं
भोलानाथ भट्ट आणि श्रीमती हीराबाई बडोदेकर अशा दिग्गजांकडे शिकल्या. त्यापैकी एक
म्हणजे पद्मभूषण श्रीमती हीराबाई बडोदेकर.
हीराबाईंच्या गाण्यातला साधेपणा, सच्चेपणा आणि माजघरातल्या शांतपणे जळणाऱ्या समईच्या
ज्योतीची आठवण करून देणारा तोच शालीन भाव, माणिकताईंनी आपल्या गाण्यात सहज आत्मसात
केला होता. शास्त्रीय गायनाची उत्तम तालीम माणिकताईंना लाभली होती. त्यांच्या
शास्त्रीय गायनाच्या अनेक ध्वनिमुद्रिका आणि कार्यक्रमांची भरपूर लाईव्ह ध्वनिमुद्रणे
उपलब्ध आहेत. त्यांच्या सुगम आणि भक्तीगीतांच्या बरोबरीने आजही त्यांच्या शास्त्रीय
गायनाचे असंख्य चाहते आहेत आणि त्यांच्या, मनात रेंगाळणाऱ्या मैफली स्मरणात असल्याचे
सांगणारेही अनेक श्रोते मागील पिढीत होते. शास्त्रीय संगीताच्या रियाजामुळे आवाजाला
प्राप्त झालेले वजन, त्यांच्या सुगम गायकीलाही एक वेगळे परिमाण देऊन गेले. त्यामुळे
त्यांची गाणी श्रोत्यांच्या मनाला थेट भिडतात.
अनेक नव्या जुन्या संगीतकारांकडे माणिकताई गायल्या. गजाननराव
वाटवे, मधुकर गोळवलकर, राम फाटक, नीळकंठ अभ्यंकर, दशरथ पुजारी, विठ्ठल शिंदे, पु ल
देशपांडे, दत्ता डावजेकर, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, बाळ माटे, प्रभाकर जोग, अशोक
पतकी आणि अशा अनेक दिग्गज संगीतकारांकडे
त्या गायल्या. विशेष म्हणजे त्यांनी एकूण गायलेल्या गाण्यातील त्यांची बहुतेक सर्वच
गाणी गाजली. सुगम संगीत किंवा वेगवेगळी गाणी जेव्हा आपण ऐकतो तेव्हा कित्येक वेळा
संगीतकार कोण आहे हे सहज ओळखू येतो परंतु माणिकताईंच्या गायकीचे, आवाजाचे एक खास
वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे त्यांच्या गाण्यांवरून संगीतकार ओळखायला खूप अवघड
जाते. त्यांची गाणी ऐकताना जणू काही सर्व गाणी एकाच संगीतकारानी रचली आहेत कि काय
असे वाटते.
पण पुन्हा पुन्हा त्यांची गाणी ऐकताना तो मधाळ, मार्दवपूर्ण
स्वर ऐकताना आपलासा वाटणारा तो आवाज आणि म्हणावेसे वाटते, अमृताची गोडी तुझ्या
गायनात ...
~
हेमकांत नावडीकर
9823054241
navdikar@gmail.com
माणिकताईच्या गाण्याचा उत्तम मागोवा घेणारा सार्थ सुंदर लेख !
ReplyDeleteधन्यवाद🙏🏻
Deleteछान लेख!
ReplyDeleteधन्यवाद🙏🏻
Deleteअप्रतिम लेख... 💐🌹👌
ReplyDeleteधन्यवाद🙏🏻
Deleteनेमकेपण! या एकाच शब्दात तुझ्या शब्दमालेचं वर्णन करता येईल. माणिक ताईंच्या आवाजाचं मर्म बरोबर जाणलेस! गेली पाच हून जास्त दशके त्यांचा आवाज आपल्याला रिझवतोय - पहाटेच्या भक्तीगीतांपासून ते संध्याकाळची हुरहूर वाटेपर्यंत! खूप छान मित्रा!
ReplyDeleteधन्यवाद🙏🏻
Deleteअप्रतिम लेख. माणिकबाईंच्या वैशिष्ट्यांचं गाणं कुठेच परत ऐकू आलं नाही. त्या एकमेव द्वितीय होत्या. 🙏
ReplyDeleteधन्यवाद🙏🏻
Deleteखूप सुंदर लिहिलाय लेख!
ReplyDeleteधन्यवाद🙏🏻
Delete