या सम हा ..
या सम हा ..
त्या दिवशी संध्याकाळपासूनच बातम्या, विचारणा, कुजबूज आणि
फोनाफोनी सुरू झाली. आणि जी बातमी कधीही यायला नको होती, ती बातमी दुर्दैवाने
शेवटी आलीच. देह नश्वर वगैरे मनाला कितीही समजावले तरीही पद्मविभूषण उस्ताद झाकीर
हुसेन यांच्या निधनाच्या बातमीने मनाची अस्वस्थता कमी होईना. इतक्या वर्षांच्या
सांगीतिक प्रवासाचे अदृष्य साथीदार, कधी श्रोता म्हणून, मग तबल्याचा विद्यार्थी
म्हणून, कधी बंदिश चे संयोजकत्व म्हणून आणि आमच्या सांगीतिक जाणीवा, ज्ञान,
समज प्रगल्भ आणि समृद्ध करणारे, आयुष्याच्या
प्रवासात प्रत्येक वळणावर, किंवा सरळमार्गी आयुष्यातही सांगीतिक कक्षा रुंदावणारे
झाकीरभाई नावाचे लोभस व्यक्तिमत्व त्यांच्या अकाली निधनाने चटका लावून गेले. संगीत
हा शब्द समजणाऱ्या प्रत्येकाच्या मनाची तार छेडणारे, त्याला ताल लयीचे भान देणारे,
शास्त्र समजले नाही तरी संगीताचा आनंद देणारे हे देखणे व्यक्तिमत्व, सर्वांच्याच
गळ्यातले ताईत आणि लाडले होते. त्यांच्या निधनाने एकदम आमचा सगळा सांगीतिक प्रवासच
समोर उभा राहिला. आता वयाची साठी ओलांडल्यावर लक्षात येते कि नकळत्या वयापासूनच
झाकीरभाई आमच्या आयुष्याचेही साथीदार होते. ते महान तबलावादक तर होतेच पण असे अनेक
प्रसंग पाहिले आहेत, ऐकले आहेत त्या प्रत्येक प्रसंगातून झाकीरभाई हे तबलावादक याशिवाय
व्यक्ति म्हणून पण खूप मोठे होते आणि या दोहोंमुळे ते कलाकार म्हणून सर्वश्रेष्ठ
होते हे निर्विवाद.
फक्त उस्ताद पंडितांपर्यंत सीमित राहिलेला तबला, भारतीय
संस्कृतीत वाढलेल्या प्रत्येक घरात संगीत न जाणणाऱ्या मुलांपर्यंत पोहोचवणारे
उस्ताद झाकीर हुसेन हे एक द्रष्टे, क्रांतिकारक तबलावादक म्हणले पाहिजेत. इथल्या
घराघरातील पालक आपल्या मुलाने अभ्यासाशिवाय बेटा तू झाकीरजीं सारखा तबला वाजवणार
ना ? असे आजही म्हणताना आपण आजही पहात आहोत, ही केवळ झाकीरभाईंच्या तपश्चर्येची
ग्वाही आहे. सामान्यांपासून बुजुर्ग तबलावादकांची दाद घेणारे त्यांचे वादन होते.
तबला सोलो वादन करताना तबल्यातील सूक्ष्म लयकारीचे त्यांना जनकच म्हणावे लागेल.
सूक्ष्म लयकारीची त्यांनी आमच्या पिढीला नुसती ओळखच करून दिली नाही, तर एकूण तबला
सोलोचे परिमाण आणि स्तर त्यांच्यामुळे बदलून गेला. नव्या, हुशार, तल्लख बुद्धीच्या
पिढीला, तबल्यांमध्ये अनेक शक्यता दिसू लागल्या. तबला आस्वादनाचा नवा पदरच त्यांनी
नव्या पिढीसमोर उलगडून दाखवला. या नव्या भाषेची या पिढीला ओळख झाल्यावर,
झाकीरभाईंच्या प्रतिभेची जणू नव्याने ओळख तबला क्षेत्राला झाली. त्यांचा सोलो
ऐकताना बुद्धीला मिळणारे खाद्य, त्या सूक्ष्मतेच्या पसाऱ्याचा अवाढव्य आवाका,
झाकीरभाईंच्या नवनवोन्मेषशाली प्रतिभेने मैफलीत ऐकताना मिळणारा आनंद द्विगुणीत करत
असे. ते उपज अंगाचे अनभिषिक्त सम्राट होते. त्यांच्या प्रत्येक मैफलीतले उपज अंग
प्रत्येकाला मोहित करणारे तसेच प्रेरित करणारेही होते. त्यांचे वडील व महान
तबलावादक उस्ताद अल्लारखा खां यांची तालीम, पं रविशंकर, उस्ताद अली अकबर खां यांसारख्या
महान संगीत विभूतींच्या मांडीवर गेलेले झाकीरभाईंचे बालपण आणि लहान वयातच
मैफलींच्या निमित्ताने संपूर्ण जगभर केलेली भ्रमंती, यामुळे हिंदुस्थानीच नव्हे तर
दाक्षिणात्य, पाश्चात्य असो नाहीतर पौर्वात्य, सर्व तालशास्त्रच झाकीरभाईनी नकळत
आत्मसात केले होते. त्यांच्या वादनातील लयकारीची उपज ऐकणे, हे तबल्याच्या
विद्यार्थ्यांना, रसिकांना जणू एक आव्हानच असे. साथसंगत करताना तर या उपज अंगाचा
प्रत्यय अनुभवणे विस्मयकारक असे. पं रविशंकर, पं शिवकुमारजी, पं हरीप्रसादजी
यांच्यासारख्या कसलेल्या तालियांबरोबर जणू समोरच्या कलाकारांच्या मनातलेच ओळखणारे
झाकीरभाई अनुभवणे, म्हणजे आनंदाची परमावधीच असे. कलाकाराने तिहाई किंवा एखादी
कल्पनेची उपज वाजवायची व तबलजीने तिचे तबल्यातून उत्तर द्यायचे असा रिवाज असतो. कलाकाराने
एखादी तिहाई घेतली की कोणते बोल वाजवून त्याला उत्तर द्यायचे आहे, त्याचा हिशोब
काय आहे, किती मात्रांचा एक पल्ला आहे, इतक्या सगळ्या गोष्टींचा विचार करून
तबलजीला पुढच्या क्षणाला उत्तर द्यायचे असते. झाकीरभाईंच्या बाबतीत ते तबल्याच्या
संगतीला असले, की मुख्य कलाकाराने
एखादी तिहाई घ्यायचा अवकाश, त्या कलाकाराच्या तिहाईचा पहिला पल्ला
वाजत असतानाच, जणू त्याच्या मनातले ओळखल्याइतके सहज झाकीरभाई दुसऱ्या पल्ल्यापासून,
कोणते बोल वाजवायचे, त्याला कसे उत्तर द्यायचे आहे, त्याचा हिशोब काय आहे, किती
मात्रांचा एक पल्ला आहे इतक्या सगळ्या गोष्टींचा विचारही न करता तत्क्षणी त्या
कलाकाराच्या बरोबर उत्तर देताना पाहून, प्रत्येक वेळी आणि आजही स्तिमित व्हायला
होतं. त्यांच्या बुद्धी आणि हाताच्या कनेक्शन मध्ये जणू कशाचा अटकावच नव्हता. पं
बिरजू महाराजजींच्या नृत्याच्या कार्यक्रमातही झाकीरभाई आणि त्यांचे सवाल जबाब
थक्क करणारे असत. त्यांच्या असंख्य अविस्मरणीय मैफली आज डोळ्यासमोर येताहेत.
किंबहुना त्यांची प्रत्येकच मैफल अविस्मरणीय होती. पं रविशंकर, उस्ताद विलायत खां,
उस्ताद अली अकबर खां, पं निखिल बॅनर्जी, पं शिव जी, पं हरी जी, पं जसराजजी अशा
तालियां बरोबरचे त्यांचे वादन काही वेगळेच असे पण त्याचबरोबर बुजुर्ग कलाकारांबरोबर
त्यांचे अगदी उठणे बसणे पण वेगळे व आदराने युक्त असे. त्यांच्या असंख्य मैफली व त्यातले
त्यांचे अद्भुत वादन त्यांच्या पुढच्या मैफलीपर्यंत कानात गुंजत असे.
फोटो -अज्ञात
वादनाबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी बोलणे खूप
महत्त्वाचे व आवश्यक आहे असे वाटते. त्यांच्या व्यक्तिमत्वातला असामान्य गुण
म्हणजे स्वत:ला सामान्य समजणे ! वादनाची तालीम देता येते, घेता येते, पण वर्तनातल्या
चांगल्या वागणुकीची त्यांना कधी कशी आणि कोणी तालीम दिली माहिती नाही. पण खूप लहान
वयातच त्यांच्या वागण्यातली प्रगल्भता, परिपक्वता सर्वांनी अनेक वेळा अनुभवलेली
आहे. त्या वर्षी म्हणजे साधारण ७० सालची ही गोष्ट असावी. पुण्याच्या सवाई गंधर्व
महोत्सवात उस्ताद अहमदजान थिरकवा खांसाहेबांचे वादन होते. खांसाहेबांनी नव्वदी ओलांडली
होती, झाकीरभाई त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. झाकीरभाई त्यावेळी जेमतेम विशीतले.
नव्वदीतल्या खांसाहेबांचे वादन सहाजिकच त्यांच्या तारुण्याइतके तडफदार नक्कीच
नव्हते. ‘समजदार’ पुणेकर श्रोत्यांनी खांसाहेबांच्या वादनाला टाळ्या द्यायला
सुरवात केली. एकोणीस-वीस वर्षांच्या झाकीरभाईंची परिपक्वता अशी, की त्यांनी
खांसाहेबांच्या समोरील माइक ओढून घेतला व समजदार श्रोत्यांना, नव्वद वर्षांची व्यक्ति
अशी तबला वाजवते आहे आणि तुम्हाला ऐकायची तमीज नाही अशी ‘समज’ दिली. झाकीरभाईंमधला
माणुसकीचा आदर्श घालून देणारा दुर्मिळ
गुणधर्म, अशी समज देण्याची परिपक्वता, अशी विनम्रता अनेक वेळा अनेकांनी अनुभवली
आहे. बुजुर्ग व्यक्तिमत्वांसमोर आपला सर्व बहुमान, प्रतिष्ठा विसरून क्षणार्धात
झुकणारे झाकीरभाई. वलयांकितांपासून वलय नसलेल्या कलाकारांना आपल्या संगतीने वलय
प्राप्त करून देणारे झाकीरभाई. सूक्ष्मातील सूक्ष्म मात्रांच्या अवघड हिशोबाला हसत
हसत कलेचे परिमाण देणारे झाकीरभाई. जुन्या काळातील पांडित्यपूर्ण तबला सुगम करून
जगभरातील संगीत श्रोत्यांना तालाचा, लयीचा आनंद देणारे असामान्य तबलावादक. तरुणाईला
आपल्या अद्भुत वादनाने सदैव प्रेरित करणारे, वादन आणि वादकांना आधुनिकतेचा साज
चढवणारे, एकमेकाद्वितीय, अजातशत्रु झाकीरभाई. झाकीरभाई तुम्ही थोडी म्हणजे फक्त 27
वर्ष आधी एक्झिट घेतलीत. यापुढेही मैफली होत राहतील, पण मात्रेच्या सूक्ष्माला दाद
देण्यासाठी कळत आणि नकळत सहज उंचावणारे हात आणि तो आनंद आता पुन्हा मिळणार नाही
याची रुखरुख सदैव अस्वस्थ करत राहील ..
हेमकांत
नावडीकर

अप्रतिम लेख सूक्ष्म लयकारी आणि उपज याचे विवेचन समयोचित अनेक शुभेच्छा झाकीर हुसेन यांना विनम्र अभिवादन
ReplyDeleteधन्यवाद
Deleteसुंदर लेख ! आपण झाकीरभाईच्या अनुभवलेल्या मैफलीतील, वादनांतील प्रत्यक्ष क्षण अन् क्षण ही या लेखाची उत्तम साक्ष आहे 🌹💐
ReplyDeleteझाकीरभाईंना शतः शतः नमन !🌹🙏🌹
धन्यवाद
Deleteहेमकांत जी आपण उस्ताद झाकीर भाईंवर सखोल अभ्यासपूर्ण विचार करून त्यांच्या कमाल वादनातील स्वतंत्र वादन आणि हजरजबाबी साथ संगत याचे सर्व पैलू लोकांसमोर मांडले आहेत. खरोखरच असा तबलावादक एक थोर प्रेमळ माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून त्यांचे कार्य आणि संगीत क्षेत्रातील योगदान अफाट आहे. धन्यवाद
ReplyDeleteधन्यवाद
Deleteलेख वाचताना सतत झाकीर जी डोळ्या समोर होते , इतकं हृद्य लिहिलं त्यांचा आठवणीने डोळ्यातील अश्रूंना थांबवता आले नाही .
ReplyDelete- नंदन वांद्रे
धन्यवाद
Deleteदिपून अगदी मोजक्या शब्दात उस्ताद झाकीर भाईंनी जेष्ठता शब्दांकित केलीस.खर तर त्यांचे श्रेष्ठत्व मोजक्या शब्दांत वर्णन करणे अवघड.
ReplyDeleteशक्य आहे.कारण त्यांच्या ज्ञानाचा व शालीनता आवाका फार दर्जेदार होता.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
धन्यवाद
Deleteअगदीच मनातलं तुम्ही सोप्या भाषेत व्यक्त केले आहे.
ReplyDeleteपूर्वीचे ते 3 पूर्ण रात्र चालणारे सवाई गंधर्व संगीत महोत्सव आणि बी जे मेडिकल महोत्सव न चुकत बघायचो. पण त्या आधी वर्तमान पत्रात कलाकारांची नावे आधी बघून ठेवायचो की अगदी पर्सनल बुकिंग केल्या सारखं वाटायचं. खूपच अविस्मरणीय अनुभव, आता जपून ठेवणे, एवढेच आहे 🙏
धन्यवाद
Deleteअप्रतिमच👌
ReplyDeleteधन्यवाद
Deleteसुंदर लिहिलंय हेमकांत जी. त्यांच्या बद्दल सर्व सामान्यांच्या भावना जितक्या सहज आहेत, तितक्याच ज्येष्ठ आणि तारांकित कलाकारांच्या सुद्धा अति आदराच्याच आहेत. असा एकमेव कलाकार ज्याच्या जाण्याने घरचेच कुणी दूर दूर गेलेत असं वाटतं.. .
ReplyDeleteधन्यवाद
Deleteसुंदर लेख. सवांई गंधर्व महोत्सवाच्या त्या कार्यक्रमाला मी हजर होतो.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteहेमकांत,
ReplyDeleteअगदी समर्पक, योग्य लिहिलंय. झाकीर भाईंचे अनेक पैलू उलगडून दाखवले. खरंच, कलाकार आणि माणूस म्हणून त्यांचे मोठेपण विरळाच.
धन्यवाद
Deleteझाकिरभाईंच्या व्यक्तित्वाचे अतिशय समर्पक वर्णन... हेमकांत, आपली, आपल्या आधीची आणि नंतरचीही पिढी समृध्द करणाऱ्या झाकिरभाईंना त्रिवार वंदन..
ReplyDeleteधन्यवाद धनंजय
Delete