स्वरांतून शिल्प साकारणारे : पं. अजय चक्रवर्ती
स्वरांतून शिल्प साकारणारे
: पं. अजय चक्रवर्ती
नुकताच काही कामासाठी मुंबईला गेलो होतो. कामं संपल्यावर
संध्याकाळी वेळ रिकामा होता म्हणून कुठे काही कार्यक्रम आहे का पहात होतो, तर एन सी पी ए मध्ये अजय चक्रवर्ती यांचा
कार्यक्रम आहे असे कळले. एन सी पी ए च्या एक्सपिरीमेन्टल थिएटरमध्ये संध्याकाळी
दाखल झालो. कार्यक्रम होता श्रुतीनंदनच्या निमित्ताने. श्रुतीनंदन म्हणजे पं अजय
चक्रवर्ती यांचे गुरुकुल. जिथे आजे शेकडो शिष्य तयार होत आहेत नव्हे, तर तिथे तयार शेकडो शिष्य आहेत !
अजय दादा आणि त्यांची सुविद्य कन्या कौशिकी यांची रसिकांना
ओळख करून देण्याची मुळीच आवश्यकता नसली तरी त्यांच्या गाण्याच्या सादरीकरणाशिवाय
जे त्यांचे प्रचंड काम आहे, त्याचा
बंगाल बाहेर फारसा परिचय नाही. शास्त्रीय गायनाच्या असंख्य अविस्मरणीय मैफली तर
त्यांनी रसिकांना ऐकवल्याच आहेत पण त्याशिवाय बंगाली सुगम संगीताच्या क्षेत्रातही
त्यांची कामगिरी भरीव आणि मोलाची आहे. बंगाली आधुनिक संगीत असो, रवींद्र संगीत असो, नजरूल गीती असो, सिनेमा संगीत असो, किंवा ज्याला बंगाली कीर्तन
म्हणतात, असे संगीताचे जवळजवळ सर्वच प्रकार त्यांनी नुसते
हाताळलेच नाही तर त्यांच्या सुगम गायनाला बंगालमध्ये लोकप्रियतेचीही पावती त्यांना
मिळाली. एकाहून एक सुंदर गाणी इतक्या सहजपणे त्यांनी गायली आहेत. शास्त्रीय
गायनाबरोबरच सुगम गायनावरही ज्यांची तेवढीच हुकूमत आहे अशा मोजक्या गवयांमध्ये
त्यांची गणना होते.
त्याचबरोबर संगीत देणे म्हणजे संगीत दिग्दर्शक म्हणूनही त्यांची कामगिरी खूप मोठी
आणि जनमान्य आहे.
साभार : फेसबुक पेज
पण हा लिहिण्याचा खटाटोप गाण्याच्याच संदर्भातील एका
वेगळ्या कारणाने किंवा पं अजय दादांच्या एका वेगळ्या पैलूच्या निमित्ताने. आणि तो
पैलू म्हणजे त्यांनी घडवलेले एकाहून एक असे तयार शिष्य. ख्यालगायन असो नाही तर
सुगम गायनाचे क्षेत्र असो त्यांचे असंख्य शिष्य बंगालच्या आणि जगभरातल्या रसिकांचे
कान तृप्त करत आहेत. परवा एन सी पी ए चा कार्यक्रम ऐकला आणि लिहिल्याशिवाय
राहवेना. पूर्वीच्या काळी एखाद्या विद्यार्थ्याला गायन वादन शिकायची इच्छा झाली की
विद्यार्थी लहान असेल तर पालकांनी गुरु शोधायचा किंवा विद्यार्थी समजत्या वयातील
असेल, तर अनेक वेळा त्या कलाकाराच्या सादरीकरणाने
भारावून जाऊन त्या शिष्याने त्या गुरूंचे पाय धरायचे,
त्यांचे शिष्यत्व पत्करायचे असा प्रघात किंवा रिवाज होता. मग शिष्याच्या वकूबाप्रमाणे
विद्यार्जन होई. जीवनाची खरी लढाई त्यानंतरच सुरू होत असे. त्या घेतलेल्या
विद्येचा उपयोग कसा करायचा हा निर्णय सर्वस्वी त्या शिष्याचा असे. संगीत हा
पोटापाण्याचा उद्योग म्हणून स्वीकारायचा की नाही याचा निर्णय सर्वस्वी त्या
शिष्याने घ्यायचा असा प्रघात असे. त्यानंतर त्याचे चांगले झाले तर चांगलेच, पण दुर्दैवाने त्याचा कलाकार
म्हणून प्रवास योग्य दिशेने झाला नाही, तर त्या शिष्याची, पुलंनी रंगवलेल्या संगीत चिवडामणी सारखी
अवस्था होत असे. यात गुरु वर्गाला नावं ठेवण्याचा किंवा दूषणे देण्याचा उद्देश
नाही,
तर त्यावेळचे वातावरण, संगीताची परिस्थिती, ही पूर्णपणे वेगळी होती. त्यामुळे
त्यावेळी गुरुजनांनी केलेल्या गोष्टी बरोबरच होत्या. पण काळ बदलत गेला, तशा सांगीतिक व्यवहार, संकल्पना, मानसिकता बदलत गेल्या. आज नवीन
बदलांचे वारे,
नवे प्रवाह आपण अनुभवतो आहोत. अनेक
नवीन साधनांमधून, माध्यमांमधून
संगीताचा प्रवाह नवीन वळणे घेत आहे. संगीताचा कलाकार म्हणून व्यवसाय स्वीकारल्यावर
त्यात अयशस्वी होण्याचे प्रमाण आता अत्यल्प आहे हे ही जाणवते. अगोदरच्या पिढीत
अयशस्वी कलाकाराची विपन्नावस्था व असे कलाकार नावानिशिवार सांगता येतील आणि अशी
अनेक उदाहरणे डोळ्यासमोर आहेत. यात पुन्हा पुन्हा सांगावेसे वाटते की गुरूंच्या
विषयी कोणत्याही प्रकारे अनादराची भावना नाही. तो काळ, ती परिस्थिती पूर्ण वेगळी
होती.
साभार : श्रुतीनंदन
नुकत्याच झालेल्या एन सी पी ए च्या
कार्यक्रमात पंडित अजय चक्रवर्ती यांच्या शिष्यांचे एकाहून एक सरस व कसदार
सादरीकरण ऐकले आणि त्यांचे मनापासून कौतुक म्हणण्यापेक्षा त्यांच्या अत्यंत महान
कार्याची दखल घेण्याचा प्रयत्न, किंवा गौरव करण्याची संधी किंवा मराठी रसिकांना त्यांच्या
कार्याची ओळख करून द्यावी असे प्रामाणिकपणे वाटले. अगदी आठ वर्षाच्या अरहान डे याची
सादरीकरणातील संगीताची समज किंवा मोठ्या शिष्यांची जाण त्यांची सुनिश्चित व समजदार
मांडणी,
तयारी सगळ्या गोष्टी त्या दिवशी
उपस्थित रसिकांच्या खरोखरच कौतुकाचा विषय होते. या सर्व शिष्यांची सांगितिक समज
उत्तम होती. तालाला अतिशय अवघड असलेल्या रचना छानपैकी समजून व हातावर ताल देत, हे छोटे कलाकार मोठ्या
आत्मविश्वासाने रचना सादर करत असलेले पाहून पंडित अजय चक्रवर्ती यांच्याविषयी आदर
दुणावला. असे शिष्य तयार करणे, त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्याचे बळ देणे, ही अतिशय अवघड गोष्ट आहे.
सादरीकरणात व्यावसायिकता न येऊ देता, कलाकाराला पोटापाण्याला लागणारे व्यावसायिक आडाखे त्यातले
सांगीतिक तत्त्व कायम राखून मांडण्याचा आत्मविश्वास देणे, ही एका महान कलाकार आणि
गुरुची ओळख आहे. या गोष्टी शिकवता येणे हे तर खूपच कठीण काम. या एकाच गोष्टीसाठी
पंडित अजय चक्रवर्ती यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्या दिवशी
त्यांच्या कार्याचा गौरव करताना एन सी पी ए च्या राव बाईंनीही पूर्वी कुठेतरी
पंडित अजय चक्रवर्ती यांनी सांगितलेल्या त्यांच्याच शब्दांचा पुनरुच्चार केला. ते
म्हणाले होते की ‘अपने बच्चे को तो कोई भी सिखाएगा लेकिन दुसरोंके बच्चे को सिखाना
आना चाहीए’ आणि त्या दिवशी त्यांनी त्यांचे शब्द जणू खरे केल्याची प्रचितीच
उपस्थितांना दिली. खरंतर हा एक खूप मोठा व्यापक किंवा एक सामाजिक जबाबदारीची जाणीव
असलेला द्रुष्टीकोन अंगी असणे, तो राबवण्याची, निभावण्याची क्षमता असणे ही एका कलाकारासाठी खूप मोठी बाब
आहे. एके काळी स्वत:च्या मुलांनाही विद्या सहजी देण्याचा प्रघात नव्हता. अशा
वातावरणात वाढल्यावर असा द्रुष्टीकोन ठेवून विद्यादान करणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण
व उल्लेखनीय कामगिरी आहे व संगीत क्षेत्रात एक नवीन प्रवाहाची ओळख किंवा विचार
देणारी आहे. स्वत:पलिकडे विचार करून स्वत:च्या शिष्यांना विद्या देणे आणि
श्रोत्यांना आनंद देणाऱ्या सुंदर सांगीतिक मैफलीची बीजे रोवणे व यात स्वत:चा आनंद
मानणे यापेक्षा मोठे योगदान नाही.
सुमारे पंचवीस-सव्वीस वर्षांपूर्वी
पं अजय चक्रवर्ती यांनी कोलकात्यामध्ये श्रुतीनंदनची सुरवात केली. श्रुतीनंदन मधून
आजपर्यंत पं शांतनू भट्टाचार्य, पं अनोल चटर्जी, देबोर्शी भट्टाचार्य, ब्रजेश्वर
मुखर्जी, अमोल निसळ, सुप्रसिद्ध हार्मोनियमवादिका रूपश्री भट्टाचार्य किंवा
अलिकडच्या पिढीतले मेहेर परळीकर, सङ्गबोर्ती दास, मेधा बासु, अनुभव खमारू आणि असे अनेक
नामांकित कलाकार तयार केले आहेत आणि करत आहेत. श्रुतीनंदनच्या कोलकात्यामधील चार
मजली देखण्या इमारतीमध्ये विद्यादानासाठी खोल्या आहेत. विद्यार्थ्यांचे किंवा मोठ्या
कलाकारांचे गायन सादर करण्यासाठी एक सुसज्ज सभाग्रुह आहे. ध्वनिमुद्रणासाठी एक
सुसज्ज स्टूडियो आहे. आज कोलकात्याच्या याच श्रुतीनंदनच्या वास्तूत कर्नाटक
संगीताचे प्रशिक्षण देणारेही दालन आहे. या सर्व किंवा प्रत्येक गोष्टीमुळे तिथे शिकणाऱ्या
प्रत्येक विद्यार्थ्यांचे सांगितिक व्यक्तिमत्व अधिकाधिक सम्रूद्ध न झाल्यास नवल.
आपल्याकडे शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्याचे सांगितिक व्यक्तिमत्व सम्रूद्ध
होण्याची शक्य ती सर्व साधने एकाच छत्राखाली उपलब्ध करून देण्यामागे पं अजय
चक्रवर्ती यांच्यासारखे तितकेच सम्रूद्ध व्यक्तिमत्व आहे. सूर आणि ताल अशा मूलभूत संकल्पनांबरोबर शब्द आणि स्वर
यांच्यातल्या गमती जमती, त्यांचे परस्परांतील स्वरविभ्रम शिकवण्याचे कार्य
श्रुतीनंदन मध्ये केले जाते. या मुलांमधील कुतूहल जागे ठेवणे, नवीन विचार
रुजण्यासाठी किमान आठ-दहा वर्षं द्यायला, जायला हवीत, लहान मुलं हल्ली मोबाइल
खेळतात त्याऐवजी त्यांना स्वर आणि तालाशी खेळू द्यायला हवं असे अजय दादा आवर्जून
सांगतात. या मुलांना स्वर-तालाशी खेळण्यातली मजा समजावून देणे त्यासाठीचा
आत्मविश्वास देणे, स्वतंत्र विचार करण्याची द्रुष्टी देणे, नुसते संगीतच नाही तर
समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे खुल्या विचारांनी पहायचे, परंपरेची जाणीव ठेवून
डोळ्यांवरील झापडे बाजूला सारून पाहण्याचा विचार मुलांमध्ये रुजवणे अशा काही अभिनव
संकल्पना घेऊन श्रुतीनंदन नवी पिढी संगीत साक्षर करत आहे. एका नियमबद्ध, पद्धतशीर
संगीत शिक्षण प्रणालीद्वारा या पिढीकडून संगीत कसे पुढे नेता येईल असा विचार रुजवत
देशाचे किंवा संस्कृतीचे भवितव्य असलेली नवीन पिढी श्रुतीनंदन घडवत आहे याचे विशेष
कौतुक करायला हवे.
हेमकांत
नावडीकर
9823054241
navdikar@gmail.com



तुझ्यामुळे मलाही NCPA मधल्या त्या कर्क्रमाचा आनंद लुटता आला. त्या बद्दल तुझी आभार मानावेच लागतील. अतिशय समर्पक शब्दात तुझा अनुभव मांडला आहेस. Same feelings here👍🏻
ReplyDeleteखूप धन्यवाद 🙏🏻
Deleteखूप सुंदर शब्दांकन
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏻
Delete👌👌 सुंदर लेख आहे.
ReplyDeleteत्यांचे workshop mi सुद्धा youtube वर बघते.
खूप काही ऐकण्या सारखे आणि शिकण्या सारखे आहे. 🙏
मनापासून धन्यवाद 🙏🏻
Deleteफारच सुंदर लेख आणि नवीन उद्बोधक माहिती
ReplyDeleteखूप धन्यवाद 🙏🏻
Deleteखूप छान लेख
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏻
Deleteखूप सुंदर आहे लेख. त्यातील बारकावे आणि सुक्ष्म निरीक्षणातून त्याला पूर्णत्व आले आहे.
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद 🙏🏻
Deleteसुंदर लेख.श्री अजयदादांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.
ReplyDeleteगुरुंना शिष्य मिळणे आणि शिष्यांना
गुरु मिळणे हे भाग्यात असावॆ लागते.
शिकणं सोप आहे शिकवणं अवघड आहे.
गुरु शिष्यांना शिकवता शिकवता त्यांना नवीन कल्पना सुचतात व गुरुंना ज्ञान प्राप्त होऊन अनेक ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते.🙏💐💐💐💐💐🙏
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🏻
Deleteमनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻
ReplyDeleteवा ऽ सुंदर लेख... सकाळ प्रसन्न झाली.
ReplyDeleteधन्यवाद मित्रा 🙏🏻
DeleteWell scripted article Hemakantjee.. Guruji has almost devised a method to be able to create an artist out of a novice.. Right from his way of selection of students to his methodical approach towards practice as well as his professional manner to present their art- everything stands out.. its a monumental contribution to take the subject forward and to encourage musicians to be in this field!! Thanks for bringing Shrutinandan on this platform.. A must visit place during your next Kolkata trip
ReplyDeleteAmol ji thanks... Being his disciple you have experienced Pandit Ji's greatness from close.. 🙏🏻🙏🏻
Deleteखूप छान
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏻
Delete