गुरुत्वाकर्षक तालयोगी : पं सुरेश तळवलकर
गुरुत्वाकर्षक तालयोगी : पं सुरेश तळवलकर
१९७५-७६ साली पुण्याच्या नूमवि प्रशालेत विख्यात गिटारवादक
पं ब्रिजभूषण काबरा यांच्या साथीला तालयोगी
पं सुरेश तळवलकर यांना प्रथम ऐकल्याचे स्मरते. त्यांना ऐकतो आहे त्याला आज
जवळजवळ पन्नास वर्ष होतील. त्यावेळी तबल्याच्या विद्यार्थीदशेत असूनही, त्यांचे
मंचावर असलेले चैतन्यपूर्ण अस्तित्व व त्यांचे वादन काही वेगळे होते हे, आजही
चांगलेच लक्षात आहे. नुकताच त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त झालेला सत्कार सोहळा
पाहिला आणि गेल्या सुमारे पन्नास वर्षात एका संगीतप्रेमी, तबल्याचा विद्यार्थी
किंवा श्रोत्याच्या भावनेतून केलेल्या श्रवणभक्तीबद्दल आलेले कृतज्ञ विचार कुठेतरी
व्यक्त करावेसे वाटले.
त्यानंतर सुरेशजींना अनेकवेळा अनेक वेगवेगळ्या वेळी
वेगवेगळ्या कारणाने भेटलेलो आहे. कधी श्रोता म्हणून, कधी तबल्याचा विद्यार्थी, तर
कधी तबल्याच्या वाद्याच्या बनावटी संदर्भात, तर कधी आणखी काही कारणाने. पण
प्रत्येक वेळी त्यांच्यातली गुरु ही भावना किंवा आपण विद्यार्थी असल्याची भावना
ठळकपणे समोर येत राहिली आहे. किंबहुना संगीतावर प्रेम असलेली कोणतीही व्यक्ती
त्यांच्याजवळ गेली, की एखादी धातूची वस्तू लोहचुम्बकाजवळून जरी गेल्यावर त्या
वस्तूला जसे पटकन ओढून घेते, तसेच पं सुरेशजींचे व्यक्तिमत्त्व चुंबकीय आहे. कारण
त्यांचा केवळ तबला हा विषय नव्हे, तर संपूर्ण संगीत या विषयातच असलेला प्रचंड
व्यासंग, विचार, त्यावरचे सखोल चिंतन हे असे सगळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून
सहजपणे व अखंड पाझरत असते. ही केवळ आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. गुरु म्हणून
असलेली त्यांची उंची व त्यांचे चुंबकीय व्यक्तिमत्त्व यामुळे गुरुत्त्वाकर्षण हा
शब्द तालयोगी पं सुरेश तळवलकर यांच्यासाठी
अगदी चपखल आहे असे वाटते. त्यांच्या जवळ गेल्यावर त्यांच्यातल्या कोण कोणत्या विषयावरच्या
व्यासंगाने आश्चर्यचकित होऊ किंवा कशाकशाला दाद देऊ असे होऊन जाते.
PC-Guruje's FB page
कीर्तनाची परंपरा असलेलं त्यांचं घराणं होतं, त्यामुळे
संगीताचं बीज त्याना घरातून मिळालं. त्यानंतर पं पंढरीनाथ नागेशकर व पं विनायकराव
घांग्रेकर अशा महान गुरूंकडून त्यांनी तबल्याची तालीम घेतली. त्यानंतर कर्नाटक
संगीतातील मृदुन्गमचे विद्वान पं रामनाड ईश्वरन यांच्याकडून कर्नाटक संगीतातील मृदुंगमचे
शिक्षण घेतले. पं गजाननबुवा जोशी व पं निवृत्तीबुवा सरनाईक यासारख्या विद्वान
गवयांची नुसती संगतच नव्हे, तर सान्निध्य, सहवास असा हा त्यांचा सांगीतिक प्रवास. हा
एवढा मोठा सांगीतिक प्रवास, या दरम्यान असंख्य गायक-वादकांना केलेली डोळस साथसंगत.
हा संपूर्ण प्रवास त्यांच्यातल्या महानतेची जडणघडण सांगणारा आहेच. पण लौकिकात
त्यांना मिळालेल्या सर्व पदव्या किंवा बिरूद या सर्वांहून ते खूप उंच किंवा महान
आहेत कारण या सर्वामागे त्यांचा असलेला प्रचंड व्यासंग, व सांगीतिक चिंतन ! कारण
सुरेशजी मंचावर बसल्यावर आणि त्यांच्यासमोर ध्वनिक्षेपक एकदा आला कि मग
त्यांच्यासमोर तबला हे वाद्य असू दे किंवा वाणीतून मांडत असलेले विचार असू दे,
त्यांच्या ध्वनिक्षेपकातून येत असलेले तबल्यातून अगर मुखातून येत असलेले बोल हे
प्रत्येक वेळी जीवाचे कान करून ऐकण्यासारखे असतात. कोणाचा सत्कार असल्यास
त्यांच्याविषयीचे गौरवोद्गार असू दे, कोणा दिवंगत कलाकाराविषयीचे मनोगत असू दे,
किंवा तबल्याच्या एखाद्या विशिष्ट विषयावरील चर्चासत्र असू दे पं सुरेशजींच्या
भाषणातून व्यक्त होणारे विचार, हे नुसते विचार न राहता, सुविचार होऊनच बाहेर
पडतात. वेळोवेळी त्यांचे विचार ऐकताना, त्यांचे विचार हे त्या विषयाच्या पूर्णपणे
तळाशी किंवा त्या विषयाच्या सर्वोच्च शिखरावरून जाणल्यावर जसे दिसत आहेत, हे
क्षणोक्षणी जाणवत राहते. सखोल व्यासंग आणि प्रगल्भ विचारांमुळे त्या शब्दांचे तेज,
त्या शब्दांचे वजन जाणवत असताना ते गुह्य न राहता सुगम होऊन येते. त्यामुळे संगीताचा
अभ्यास नसलेल्या सामान्य श्रोत्यालाही त्यांच्या विचारांची श्रीमंती काही तरी देत
राहते.
पं सुरेशजींचे एकल तबलावादन ऐकतानाही तबलावादाकांना तोच
प्रत्यय येतो. त्यांची तबला या विषयाची खोली, उंची व्यासंग हे सगळे त्यातून प्रतीत
होत असते. एक खूप मोठा सांगीतिक विचार, तसे पाहिले तर खरं म्हणजे क्रांतिकारकच
म्हणायला हवा, असा विचार त्यांनी तबल्यातून मांडला. काही पारंपारिक पद्धतीने वादन
करणाऱ्या, विचार करणाऱ्या अनेकांना हा विचार रुचला नाही आणि हेही स्वाभाविकच आहे.
कारण केव्हाही, कुठेही, कोणताही नवीन विचार रुजायला, समजायला, पचायला काही अवधी
लागतो. त्यांनी गुरुवर्य पं पंढरीनाथ नागेशकर व पं विनायकराव घांग्रेकर
यांच्याकडून घेतलेले परंपरागत शिक्षण, त्यानंतर कर्नाटक संगीतातील सूक्ष्म
लयकारीचा केलेला अभ्यास व मुळातच नवीन काही सांगण्याचा, करण्याचा अखंड उर्जा
स्त्रोत, या सर्वांमुळे त्यांचे वादन हे इतरांपेक्षा वेगळे होणारच होते. पण त्यांचे
मोठेपण, हे केवळ नवीनतेचा ध्यास आहे, म्हणून काही सांगत आहेत, या पेक्षा परंपरेला
पचवून त्या विद्येला तर्कशुद्ध, तर्कसंगत विचारांची जोड दिल्यामुळे त्यांचे वादन अजोड
व तालयोगी हे नाव सार्थ करणारे ठरले. आजही त्यांचा पेशकार ऐकताना केवळ कणाहीन ‘अक्षरांची’
गणिती मांडणी न राहता, तर्कशुद्ध शब्दसमूहाची होणारी बढत ऐकायला मिळते. बढत करताना
एकेका शब्दसमूहातून उकलत जाणारे, गुंफत येणारे, शब्दसमूह ऐकताना अरे ही उपज किती
छान आहे हा सौंदर्यानुभव तर मिळतोच, पण त्या उपजेतली तर्कसंगती अनुभवताना जो आनंद मिळतो
तो अवर्णनीय व ऐकणाऱ्याच्या बुद्धीला सुखावणारा असतो. आज जगभर तबल्याचा एवढा
प्रसार प्रचार होऊनही पं सुरेशजींच्या पेशकारातील, कायद्यांमधील बढत किंवा
त्यांच्या वादनातले वेगळेपण सामान्य विद्यार्थ्यांपासून श्रेष्ठ वादकांसाठी नेहमीच
आनंददायी असते.
PC-Guruje's FB page
पूर्वी एके काळी मुंबईमध्ये सगळीकडे तबला वाजत होता, तो
सर्व खलिफा उस्ताद अमीर हुसेन खांसाहेबांच्या शिष्यांचा असे म्हणत आणि ते खरेच
होते. त्याच चालीवर आज जवळजवळ जगभर पं सुरेशजींचे शिष्य तबला वाजवत आहेत असे
म्हणल्यास काही वावगे होणार नाही. त्यांच्या सर्व शिष्यांना त्यांनी रियाजाची
दिलेली संथा आणि त्या शिष्यांना त्यांनी लावलेली रियाजाची गोडी, हे सर्व वाटते
तितके सोपे काम मुळीच नाही. अजून आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही रियाजाची संथा शिष्यांच्या
पुढच्या पिढीकडे तितक्याच समर्थपणे एखाद्या दिन्डीप्रमाणे जाताना पाहून कोणालाही
समाधानच वाटेल. सुमारे तीन-चार वर्षांपूर्वी पं सुरेशजींच्या शिष्यांच्या, काही
शिष्यांचे तबलावादन ऐकण्याचा योग आला. त्यावेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती
म्हणजे आजही शिष्यांच्या अगदी लहान लहान शिष्यानाही पं सुरेशजी तितक्याच
आत्मीयतेने, तळमळीने शिकवताना पाहिले आणि खरंच थक्क झालो. शिष्यांचे शिष्य म्हणजे
नातवंडे, पतवंडे यांचाही हात धरून त्याना पैलतीरावरील ‘सुरक्षित स्थळी’, सुखरूप
पोहोचवण्याचे त्यांचे पराकाष्ठेचे प्रयत्न व गुरु म्हणून घेतलेली जबाबदारी
निभावताना पाहून त्यांच्यातल्या गुरूला मनोमन वंदन केले.
PC-Guruje's FB page
नुकताच तबला बनवणाऱ्या कारागिरांवर एक कार्यक्रम झाला, पण
त्याही अगोदर पं सुरेशजी नाविन्याच्या ध्यासामुळे, नवीन काही करण्याच्या कौतुहलपूर्ण
उर्मीने व प्रयोगशील वृत्तीमुळे तबला या वाद्याच्या बनावटीमध्ये अनेक वर्षे काही
तरी नवीन प्रयोग करताना पहातो आहे. तबल्यातील वादीऐवजी नायलॉनचा वापर, तबल्यावरील
शाईच्या प्रमाणात केलेल्या बदलांमुळे नादात झालेला अधिक आसदारपणा किंवा अनेक
प्रयोग करण्यासाठी ते नेहेमीच प्रयत्नशील व प्रयोगशील राहिले आहेत.
हे मला दिसलेले पं सुरेश तळवलकर आहेत. आंधळे आणि हत्तीच्या
गोष्टीसारखे. महान गुरूंकडून विद्या घेऊन परंपरा राखणारे पं सुरेशजी, त्या
परंपरेला स्वत:च्या प्रज्ञेने नवीन परिमाण देणारे द्रष्टे वादक, सतत नवीन काही
शिकत रहाण्याचे बालसुलभ कुतूहल जपणारे पं सुरेशजी, शिष्यांच्यांही शिष्यांना
पैलतीरावर सुरक्षित स्थळी पोहोचवणारे आदर्श गुरु, वादन आणि वाणी यातून नेहेमी सुविचारच
देणारे अनोखे कलाकार व ज्या ज्या प्रकारे संगीत समृद्ध होईल त्या सर्वांसाठी कायमच
पुढे राहणारे व पुढे जाणाऱ्यांच्या पाठीशी दीपस्तंभासारखे उभे राहणारे, तालयोगी
पद्मश्री पं सुरेश तळवलकर यांना त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त उदंड निरोगी
आयुरारोग्यासाठी शुभेच्छा व सादर नमन ...
~ हेमकांत नावडीकर
9823054241



Very nice and apt ....
ReplyDeleteThanks 🙏🏻
Deleteअतिशय सुरेख चपखल वर्णन
ReplyDeleteमनापासून धन्यवाद 🙏🏻
Deleteसुंदर व उद्बोधक माहिती.. कमी शब्दात छान लिहिले आहे..
ReplyDeleteमनापासून धन्यवाद 🙏🏻
Deleteअतिशय सुंदर 👌👌 गुरुजी great आहेत.आम्ही भाग्यवान आहोत की गुरुजींचा सहवासात आहोत गुरुजींना सादर प्रणाम 🙏🙏🙏
ReplyDeleteमनापासून धन्यवाद 🙏🏻
Deleteअप्रतिम 👌
ReplyDeleteमनापासून धन्यवाद 🙏🏻
DeleteVery nice excellent writeup Hemkant ji. .
ReplyDeleteThanks 🙏🏻🙏🏻🙏🏻
Deleteअत्यंत समर्पक आणि उत्कृष्ट लेख.
ReplyDeleteमनापासून धन्यवाद 🙏🏻
Delete