राजहंसी पखवाजवादक : पं प्रकाश शेजवळ
२ ऑक्टोबर २०२२ रोजी श्रेष्ठ पखवाजवादक पं अर्जुन शेजवळ यांचे सुपुत्र व आमचा बालमित्र पं प्रकाश शेजवळ याचे अकाली निधन झाले त्यानिमित्त काही आठवणी ....
राजहंसी पखवाजवादक : पं प्रकाश शेजवळ.....
आयुष्याची गाडी आता अशा वळणावर येऊन ठेपलीय कि,कोणती बातमी काय सांगावा घेऊन येईल सांगता येत नाही. कधी अनपेक्षित येणारी बातमी किंवा क्वचित येणारा सुहृदाचा फोन, बहुदा अशुभाचेच संकेत देतो. काल रात्री असाच भावनाचा फोन आला. संबंध तसे तिचे म्हटले तर काहीच नाहीत, म्हटले तर कधीच विसरता येणार नाहीत असे. फोनवर फारशा प्रास्ताविकाशिवाय, अरे प्रकाश गेला असे तिने सांगितले... मात्र पुढचे ना काही ऐकू आले, ना काही दिसेनासे झाले...
भावना डुंबरे म्हणजे श्रेष्ठतम पखवाजवादक पंडित अर्जुन शेजवळ यांची कन्या. तिचा भाऊ म्हणजे, म्हणजे आमचा बालमित्र प्रकाश शेजवळ. तिच्या या फोनने, बातमीने, असंख्य आठवणींचे मोहोळच उठवले जणू. अत्यंत मनस्वी स्वभावाचा, स्वर्गीय आण्णांचा म्हणजे पंडित अर्जुन शेजवळांच्या विद्येचा वारसा निष्ठेने पुढे नेण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणारा प्रकाश, असा अचानक अवेळी, एकाएकी अंधाराच्या दिशेने प्रवास सुरु करेल हे सगळेच अतर्क्य. आपला पखवाजाचा वारसा प्रकाश पुढे नेत आहे म्हणून आण्णांना केवढे कौतुक होते. तेही स्वाभाविकच होते. प्रकाशही आण्णांइतकाच उत्तम पखवाज वाजवत असे. आण्णांच्या वादनातील तोच डौल प्रकाशच्याही हातात होता. तशीच सुंदर पढंत. चौताल, धमार, झंपा सूलफाक्ता किंवा ताल कोणताही असो वादनातील सौंदर्य यत्किंचीतही कमी होत नसे. तबला वादनातील पेशकाराप्रमाणे वाजणारा शृंगार असू दे, रेला, परण, प्रकाशचे वादन सर्व काही आण्णांच्या हाताची आठवण करून देणारेच होते. अनेक मोठ्या कलाकारांची संगत असो, अगर मुंबापुरीतील भजनी मंडळींचे सत्संगाचे कार्यक्रम असोत, प्रकाशही स्वर्गीय आण्णांप्रमाणेच स्वत:चे भवितव्य यशस्वीपणे आकारत होता. आण्णांचा वरदहस्तही प्रकाशवर एवढा जबरदस्त होता कि कधीच, कशाचीच कमतरता पडू नये. पण अचानक प्रकाशच्या आयुष्याची काही गणिते चुकली, चुकीच्या वेळी चुकीचा पेपर आला किंवा आयुष्याचे फासे, काही अप्रीय दान देऊन गेले आणि उत्तरे दुर्दैवाने चुकतच गेली. प्रकाशच्या दुर्दैवाने आण्णा म्हणजे पंडित अर्जुन शेजवळही अकाली गेले. मस्जिद बंदरातील चाळीत वास्तव्य असल्याने असंख्य रेल्वे रूळांचा खडखडाट ऐकत, त्या रुळांच्या संगतीने स्वर्गीय आण्णांचे, पंडित अर्जुन शेजवळ यांचे बहुतांश आयुष्य व्यतीत झाले, तसेच प्रकाशाचेही झाले. पण आण्णांच्या अकाली निधनाने प्रकाशच्या आयुष्याची रुळावरून घसरलेली गाडी पुन्हा पूर्ववत रुळावर आणायला आण्णा मात्र नव्हते. तरीही नेटाने प्रकाशने आण्णांची परंपरा चालू ठेवली होती. पंडीत अर्जुन शेजवळ हयात असताना अनेक बुजुर्ग, गुणवंत कलाकारांच्या मांदियाळीत होणारी स्व नानासाहेब पानश्यांची पुण्यतिथी व त्यानिमित्त होणारे कार्यक्रम प्रकाशानेही निष्ठेने सुरु ठेवले होते.
उत्तम पखवाज वाजवूनही त्या राजहंसाप्रमाणे त्याचे झाले. राजहंसाचे देखणेपण आणि पंडित अर्जुन शेजवळ यांच्या वादनातील सौंदर्य, लालित्य यात कुठेतरी निश्चित एक समान धागा होता. पंडित अर्जुन शेजवळ यांसारख्या उत्तुंग दर्जाच्या पखवाज वादकाचा शिष्य, सुपुत्र असूनही, दिग्गज कलाकारांबरोबर असंख्य वेळा सहजपणे वावरूनही तो दुर्दैवीच राहिला. उस्ताद झाकीर हुसेन यांच्याबरोबर एका मंचावर बसण्याचे भाग्य त्याला लाभले, पंडीत जसराजजी, पंडीत गिंडे - भट, यांपासून विदुषी श्रुती सडोलीकर, पंडीत मुकुल शिवपुत्र, विदुषी आरती अंकलीकर, डॉ अश्विनी भिडे यांसारख्या अनेक गुणीजनांबरोबर वाजवायचे, संगत करण्याचे भाग्य लाभले खरे, पण नाव प्रकाश असूनही प्रसिद्धी, लोकप्रियता, जनमान्यता त्याला काहीशी नेहमीच हुलकावणी देत राहिली. असंख्य मोठमोठ्या मैफलीत त्याने पखवाजवादन केलेच, त्याशिवाय अनेक दूरदर्शनवरील, विशेषतः अनेक धार्मिक मालिकांचे पार्श्वसंगीत किंवा त्यातीलं युद्धप्रसंगाचे गांभीर्य वाढवणारा पखवाज प्रकाशनेच लीलया वाजवला आहे, हे सामन्य रसिकांसमोर कधी आले नाही. तो श्रेष्ठ पखवाजवादक पंडीत अर्जुन शेजवळ यांचा सुपुत्र व शिष्य होता, व त्यांच्या इतकाच उत्तम पखवाजवादक होता. तो राजहंस होता शिवाय दुर्दैवीही होता. अनेक तालांमध्ये सहजगत्या समेवर येणारा प्रकाश शेजवळ, त्याच्या आयुष्याची सम मात्र तो स्वत: कशी काय चुकवून गेला, या कोड्याचे उत्तर आता कोण देणार.. कटू सत्य एवढेच आहे कि प्रकाश मात्र आज आपल्यात नाही .....
हेमकांत नावडीकर

Comments
Post a Comment