स्वरांतून शिल्प साकारणारे : पं. अजय चक्रवर्ती
स्वरांतून शिल्प साकारणारे : पं. अजय चक्रवर्ती नुकताच काही कामासाठी मुंबईला गेलो होतो. कामं संपल्यावर संध्याकाळी वेळ रिकामा होता म्हणून कुठे काही कार्यक्रम आहे का पहात होतो , तर एन सी पी ए मध्ये अजय चक्रवर्ती यांचा कार्यक्रम आहे असे कळले. एन सी पी ए च्या एक्सपिरीमेन्टल थिएटरमध्ये संध्याकाळी दाखल झालो. कार्यक्रम होता श्रुतीनंदनच्या निमित्ताने. श्रुतीनंदन म्हणजे पं अजय चक्रवर्ती यांचे गुरुकुल. जिथे आजे शेकडो शिष्य तयार होत आहेत नव्हे , तर तिथे तयार शेकडो शिष्य आहेत ! अजय दादा आणि त्यांची सुविद्य कन्या कौशिकी यांची रसिकांना ओळख करून देण्याची मुळीच आवश्यकता नसली तरी त्यांच्या गाण्याच्या सादरीकरणाशिवाय जे त्यांचे प्रचंड काम आहे , त्याचा बंगाल बाहेर फारसा परिचय नाही. शास्त्रीय गायनाच्या असंख्य अविस्मरणीय मैफली तर त्यांनी रसिकांना ऐकवल्याच आहेत पण त्याशिवाय बंगाली सुगम संगीताच्या क्षेत्रातही त्यांची कामगिरी भरीव आणि मोलाची आहे. बंगाली आधुनिक संगीत असो , रवींद्र संगीत असो , नजरूल गीती असो , सिनेमा संगीत असो , किंवा ज्याला बंगाली कीर्तन म्हणतात , असे संगीताचे जवळजवळ...