वो कोई और ना था....

our friends

सहज सुचलं म्हणून.....
__________________________________________
वो कोई और ना था चंद खुष्क पत्ते थे
शजरसे टूट के फस्ले गुलपे रोये थे



ही कवि मंडळी दोन ओळीत जणू विश्व सामावतात असं म्हणतात ते अगदी खरं आहे. वो कोई और ना था अशा अहमद नदीम कासमी नावाच्या पाकिस्तानी शायरनी दोन ओळी लिहिल्या आहेत. गुलाम अली साहेबांनी त्या गाऊन, त्यामध्ये स्वरांचा नवा रंगही भरला. खरं तर इतक्या साध्या ओळी आणि शब्द आहेत. फार जड उर्दू पण नाहीये.
वो कोई और ना था, असं नदीमसाहेब म्हणतात, म्हणजे तो किंवा ती दुसरं कोणीच नव्हतं, असा प्रथमदर्शनी साधा सरळ अर्थ वाटतो, तोही बरोबरच आहे. पण संपूर्ण शेर वाचता वाचता त्या गोष्टीतली गंमत एखादं मिळालेल्या प्रेझेंटचं रंगीबेरंगी वेष्टन उलगडताना कुुतुहल किंवा त्यातली गंमत वाढत जावी तसं होतं. कोणाची तरी चाहूल लागावी आणि माझ्या मनातला तो किंवा तीच ती, खरंच आली कि काय असं वाटावं पण... कोणीच आलं नव्हतं. चंद खुष्क पत्ते थे म्हणजे फक्त पाचोळ्याचा आवाज तेवढा झाला..! खरी या ओळीची खुमारी, गंमत इथेच आहे, कोणी आलं तर नाही, पण भास तर झाला ना... तो कोणाचा तरी होता !!! मग कोणी आलंच नाही असं तरी कसं म्हणावं ? पाचोळ्याचा आवाज तर झाला !
वो कोई और ना था, चंद खुष्क पत्ते थे... पण छे शेवटी भासच तो... पाचोळयाचा आवाज झाला आणि माझं मन ज्याची वाट पहात होतं ते खरंच कोणी आलं कि काय, असं एक क्षण वाटलं खरं, पण तो भासच होता...
येथपर्यंत साध्या प्रेमाच्या गावाच्या दिशेने जाणाऱ्या या ओळी, नंतर मात्र शायर अशा काही विलक्षण उंचीवर नेऊन ठेवतो, कि त्या कवीच्या प्रतिभेला मनोमन वंदन करावंसं वाटतं.
शजरसे टूट के, फस्ले गुलपे रोये थे, म्हणजे हिरवा बहर झाडावरून जीर्ण होऊन, पाचोळा होऊन खाली पडतो त्याची ही गोष्ट आहे. बहरलेल्या झाडांची हिरवीगार पानं जीर्ण झाली कि पाचोळा होऊन, कुसुमाग्रजांच्या भाषेत मातीवर चढणे एक नवा थर अंती.. अशीच होणार. मर्ढेकरही असंच काहीसं म्हणून गेले आहेत..
शिशिर ऋतुच्या पुनरागमे एकेक पान गळावया,
का लागता मज येतसे न कळे उगाच रडावया..
पानगळीचे निसर्गाचे चक्र अस्वस्थ करते. आज हिरवे आहे ते उद्या वाळणार आहे, शुष्क, निष्प्राण होणार आहे, ही जाणीव थेट पैलतीराची आठवण करून देते, तेंव्हा अंग शहारतं. वरून पडलेला पाचोळा सहज खाली येत नव्हता, तर फस्ले गुल म्हणजे बहराची थट्टाच करत होता. जीर्ण झालेल्या माझ्यावर हसणाऱ्या बहराला, बेट्या थांब जरा, हसू नकोस माझ्यावर, तुझ्यावरही हीच वेळ येणार आहे, याची जाणीव ठेव आणि मग माझ्यावर हास खुशाल ! दुसऱ्या ओळीच्या या अर्थानंतर पाहिली ओळ पुन्हा वाचताना, ती किंवा तो म्हणजे, सर्व भौतिक गोष्टींच्या पालिकडला सर्वांनाच भिववणारा पाचोळ्याचा आवाजाने भास झालेला तो, म्हणजे मृत्यु तर नाही ना ...
ही कवि मंडळी दोन ओळीत कुठुन कुठे पोहोचवतील सांगता येत नाही !!! पण नदीम साहेबांच्या प्रतिभेला मात्र मनापासून दाद द्यायला हवी ...
हेमकांत नावडीकर

************************************** 

Comments

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान ...

मार्दवपूर्ण गाण्यांचे माळपदक : माणिक वर्मा

कुमार नावाची चिरतरुण मैफल