नवरत्नहार

नवरत्नहार

       हल्ली गायक वादकांचे कार्यक्रम ठरवणे खूप सोपे झाले आहे. कार्यक्रमाचे ठिकाण, ध्वनिसंयोजक, वृत्तपत्रातील जाहिरात, कलाकार, त्यांच्या तारखा ठरवणे इतक्या सगळया गोष्टी आता अजिबात अवघड राहिल्या नाहीत. फेसबुक, व्हॉट्स अॅप आणि एकूणच मोबाइल क्रांतीमुळे तर सर्व हाताच्या बोटावर आले आहे. आजच्या पिढीला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण पूर्वी कलाकारांचे पत्ते मिळवणे, त्यांच्यापर्यंत पोहोचणे, त्यांच्याशी पत्रव्यवहार करणे सगळेच अवघड होते. त्या काळी कलाकार, रसिक, संयोजक या तीनही वेगवेगळ्या संस्था होत्या. हे तीनही जण एकमेकांत ढवळाढवळ करत नसत. म्हणजे त्याची कोणाला आवश्यकताही वाटत नव्हती. संयोजकाने कलाकारांशी संवाद साधून कार्यक्रम ठरवायचा. कार्यक्रम कोठे करायचा, केंव्हा करायचा हे ही त्या संयोजकानेच ठरवायचे. कलाकाराने ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी येउन आपली कला सादर करायची आणि कार्यक्रम जाहीर झाल्यावर रसिकांनी उपस्थित राहून संगीताचा आस्वाद घ्यायचा. असे एखाद्या कार्यक्रमाचे साधे सरळ गणित होते. एवढेच नव्हे तर कलाकाराने थेट संयोजकांना कार्यक्रम आयोजित करायला सांगणे हे कलाकारांना कमीपणाचे वाटे. 

हे सगळे आठवायचे कारण म्हणजे, काही म्हणजे, चाळीसहून अधिक वर्षांपूर्वी, गोपाळ लक्ष्मी नारायण गोखले नावाचे मुंबईस्थित गृहस्थ होते. आम्ही त्यांना आजोबाच म्हणायचो. कारण ते आमच्या आजोबांच्याच वयाचे होते ! त्यांच्या नावाची पण गंमत होती. त्यांच्या वडीलांचे खूप लवकर निधन झाले. त्यांचा सांभाळ मुख्यत्वे आईनेच केला म्हणून ते वडीलांच्या नावाअगोदर आईचे लक्ष्मी नाव लावत. त्यांचा उद्योग काय, तर ते हौसेने नवोदित, उदयोन्मुख कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करायचे. तसा पोटापाण्यासाठी ते नाटकांसाठी प्रकाशयोजनेचे काम करत होते खरे. पण संगीताची आवड असलेल्या त्यांच्या प्रिय पत्नीच्या अकाली निधनानंतर काय करायचे, तर त्या काळात संगीत शिकलेल्या स्त्रियांना आपले कलागुण दाखवण्याची संधी मिळावी, यासाठी पुणे,मुंबई, जळगाव, नागपूर अशा सहा विविध शहरातून केवळ स्त्रियांसाठी संगीत स्पर्धा घ्यायला सुरुवात केली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर १९७९ साली आंतरराष्ट्रीय बाल दिनाचे औचित्य साधून पुण्यामध्ये व नंतर मुंबईमध्ये लहान मुलांचा संगीत महोत्सव आयोजित केला. यामधूनच आश्वासक तरुण गायक वादकांना बरोबर घेऊन त्यांचे पुणे, मुंबई इतकेच नव्हे तर कोल्हापूर, रत्नागिरीपासून ते थेट जळगाव, भुसावळ  नागपूर अशा ठिकाणी त्यांचे कार्यक्रम घडवून आणायची कल्पना गोखले आजोबांना सुचली. त्यांची पद्धत अशी होती, कि संगीतात काम करणाऱ्या नवीन नवीन गुणवान मुलांना शोधून काढायचं. मग गावोगावी जाऊन त्या त्या गावातले संगीताच्या मैफली आयोजित करणारे कार्यक्रम आयोजक शोधून, त्या आयोजकांपर्यंत पोहोचायचं. मग आजोबांना माहिती असलेली मुले, कशी गुणी व उत्तम संगीत सादर करतात हे पटवून, त्यांचा कार्यक्रम ठरवून, त्या गावाच्या, शहराच्या जवळपास फिरून, अजून काही कार्यक्रम ठरतात कां ते पाहायचं आणि कार्यक्रम ठरवून परतल्यावर या मुलांना घेऊन जाऊन कार्यक्रम करायचे. त्यांचे यथायोग्य कौतुक झाल्याची पावती रसिकांकडून, उपस्थितातील जाणकारांकडून, आयोजकांकडून मिळाली, कि पुढच्या कार्यक्रमाचा वायदा घेऊन समाधानाने परतायचं. प्रवासखर्च, रहाण्याचा खर्च, जेवणा-खाण्याचा खर्च वजा जाता, त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हाच काय तो त्यांना मिळणारा नफा. सर्व कलाकार ही मुले किंवा किशोरावस्थेतील असल्यामुळे रहाण्या-खाण्याच्या त्यांच्या काहीही मागण्या नसत, ना आजोबांकडून त्यांचे कोणते विशेष लाड केले जात. हॉटेलमध्ये रहायला मिळणेही चैनच असे. बहुतांश वेळेला एखाद्या धनिकाच्या घरातील एखादी मोठी खोली, म्हणजे हल्लीच्या भाषेत डॉर्मिटरी अशीच व्यवस्था असे. पण कोणत्याच मुलाची किंवा मुलीचीही तक्रार नसे. एक तर ही सर्व कलाकार मुले, मुली सुसंस्कृत घरातील होती, ज्यांच्या घरी उतरत असू तीही मंडळी तशीच असत, त्यामुळे कोणतीच अडचण येत नसे. त्याउलट या मुलांची मस्तपैकी मौजमजा चालायची. सगळीच काही मुले, मुले या वयोगटातील नसत, तर बाळासाहेब माटे यांच्या सारखे ज्येष्ठ आणि अनुभवी हार्मोनियम वादक, माधुरीताई जोशी असत, शशिकला शिरगोपीकर यांसारखे आमच्यापेक्षा ज्येष्ठ वयाने, मानाने कलाकारही आमच्यामध्ये मस्तपैकी मिसळून जात. त्यांना कुठे पोरांमध्ये येऊन पडलोय असे अजिबात वाटत नसे. आमच्या थट्टामस्करी मध्ये तेही तेही सामील होत असत. 


गोखले आजोबांनी शोधलेल्या तरुण कलाकारांचे त्यांनी अनेक ठिकाणी कार्यक्रम घडवून आणले. मुंबई पुण्यामध्ये बालकलाकारांची संमेलने, गायन स्पर्धा घडवून आणल्या. मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरीपासून नागपुरच नव्हे, तर सतना म्हणजे मध्य प्रदेशातही या कलाकार मुलांचे कार्यक्रम घडवून आणले. या कलाकारांमध्ये कोणकोण होते, तर आजच्या प्रतिथयश गायकांमधील आरती अंकलीकर, अश्विनी भिडे, देवकी पंडीत, संजीव अभ्यंकर, आनंद भाटे, साधना सरगम, रूपक कुलकर्णी, चंद्रशेखर वझे, प्रकाश शेजवळ, अतुल केसकर आणि इतर अनेक जण, जे आजही आपला परिचय व संगीत सेवा आपापल्या परीने करत आहेत. यातील काही कलाकार स्पर्धेच्या रूपाने, तर काही कार्यक्रमाच्या रूपाने, आजोबांनी नवरत्नहार या नावाने सुरु केलेल्या कार्यक्रमरुपी उपक्रमात सहभागी झाले होते. याशिवाय त्यांची कन्या गायिका नलिनी आपटे व नात रसिका फडके याही कलाकार व आजोबांच्या असिस्टंट अशा दुहेरी भूमिकेत असल्या, तरी त्यांनाही आमच्याचसारखी वागणूक असे. आमच्या सर्वांसाठी ते आजोबाच होते. एखाद्या आजोबांनी घराची, कुटुंबाची शिस्त सांभाळावी, तशीच शिस्त, दरारा व प्रेमही गोखले आजोबांनी आम्हाला दिले. १९८४ साली आजोबांनी पं राम मराठे यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती निमित्त तीन दिवसांचा महोत्सव आयोजित केला होता. त्यातही आमच्यासारख्या तरूण मंडळींबरोबरच शुभदाताई पराडकर, श्रुती सडोलीकर, वंदना बखले, कमल तांबे, पं अर्जुनराव शेजवळ, पं के जी गिंडे यांसारख्या दिग्गजांबरोबर खुद्द पं रामभाऊ मराठे हेही स्वतः गायले होते. त्याच वर्षी डोंबिवली मध्ये सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक पं माधवराव टेंबे (गोविंदरावांचे चिरंजीव) यांच्या पंचाहत्तरीनिमित्त असाच महोत्सव करण्यात आला होता. त्यामध्येही गोविंदराव पटवर्धन यांचे हार्मोनियम वादन आणि इतर अनेक मान्यवरांचा सहभाग होता. या कार्यक्रमांमधून या सर्व नावाजलेल्या गुरूंचे मार्गदर्शनही आम्हां मुलांना मिळत असे. रामभाऊ मराठे असतील, डोंबिवलीमध्ये पं गजाननबुवा, पं निंबर्गीबुवा, पं यशवंतबुवा, इचलकरंजीचे काणेबुवा, सांगलीचे व्ही सी देवधर, कणेकरबुवा अशी अनेक गुरु मंडळी स्वतःहून कौतुकाने व आनंदाने आम्हां मुलांना मार्गदर्शन करत आणि अर्थातच ही पूंजी या सर्वांसाठी आयुष्यभर पुरेल एवढी मोलाची ठरली. 

या कार्यक्रमांच्या दरम्यान लहान वयात अनेक वेगवेगळे अनुभवही आम्हाला अनुभवायला मिळाले. आजोबा दादर स्टेशनसमोरील बिल्डिंगसमोर रहायाचे. त्यामुळे दादर स्टेशनवर रेल्वे पकडायला दहा मिनिटे अगोदर निघाले तरी पुरत असे. अशाच एका नागपूर कार्यक्रमाच्या दौऱ्यात दुपारची रेल्वे गाठताना आम्ही सगळे तरुण वेळेत पोहोचलो, पण आजोबा रेल्वे डब्यापर्यंत पोहोचेपर्यंत गाडी सुटली, आजोबांनी नाशिक पर्यंत टॅक्सीने रेल्वेचा पाठलाग केला, पण प्रत्येक स्टेशनावर टॅक्सीमधून उतरून गाडीपर्यंत पोहोचेपर्यंत गाडी सुटत असे. त्यात टीसीने आम्हाला पकडले, आम्हां सगळ्यांची तिकिटे आजोबांकडे होती, कोठे उतरायचे, उतरवायला कोण येणार, हे फक्त आजोबांनाच माहिती, आजच्यासारख्या फोनच्या सुविधा तेंव्हा नव्हत्या, विद्यार्थीदशेत असल्यामुळे दंड अधिक तिकीट भरण्यापुरते पैसे, आम्हा सगळ्यांकडे मिळूनही नव्हते. पण अशा प्रसंगातून किंवा अशा छोट्या मोठ्या अनेक अनुभवांमधून गेल्यामुळे लहान वयात मोठीच शिदोरी जमा झाली. असा प्रवासाचा अनुभव तर मिळालाच, पण १९८३ साली इचलकरंजी जवळील अबदुललाट, या त्याकाळी केवळ दोन हजार वस्ती असलेल्या खेड्यात, गणेश विष्णुपंत दांडेकर नावाचे गुरुजी राहायचे, त्यांच्याकडे हजारो धृपदांचा संग्रह आहे, अशी माहिती आजोबांनी मिळवली. इतकेच नव्हे तर पं बाळासाहेब माटे व काही मुंबई एसएनडीटीच्या विद्यार्थिनी असा आठ दहा जणांचा ग्रुप घेऊन आम्ही सगळे तिथे महिनाभर राहून अनेक धृपदे शिकलो. या अबदुल लाट गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आजचे नावाजलेले प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे हेही याच गावाचे. दांडेकर गुरुजींना तर पुण्या-मुंबईहून आपल्याकडून काही विद्यार्थी शिकायला आले याचे कोण कौतुक. सकाळ संध्याकाळ चार-पाच तास अशा रोजच्या किमान आठ तास बैठकी चालत. तो अनुभव काही विलक्षण होता. एका मोठ्या खोलीमध्ये आमचा हा दहा-एक जणांचा संसार महिनाभर होता. या सगळ्यामध्ये सांगायची गोष्ट अशी, कि दांडेकर गुरुजींचे शिकवणे एकीकडे चालू असे आणि खोलीच्या दुसऱ्या बाजूला आजोबा आम्हां सर्वासाठी स्वत: छानपैकी स्वयंपाक करत असत ! दिवसभर संगीतसेवा आणि जेवणे झाल्यावर, सर्वांनी मग गावाबाहेरील छोट्याश्या दत्ताच्या देवळापर्यंत चालत चक्कर मारायची, असा शिरस्ता असे. एवढे विस्तीर्ण माळरान आणि विस्तीर्ण निरभ्र चांदण्या रात्रीचे आकाश परत पाहिल्याचे आठवत नाही.  

वरील फोटोमध्ये सर्वात डावीकडून पं.माधवरावे टेंबे, पं.काणेबुवा, श्री दांडेकर गुरुजी, पं.व्ही सी देवधर, सरपंच अनंतराव कुलकर्णी व गोखले आजोबा... 


आजही ते सोनेरी दिवस आठवतात. त्यातील अनेक कलाकार, आम्ही एकमेकांचे मित्र कधी झालो ते कळलेच नाही. त्यांच्याशी नंतर झालेले घरोब्याचे संबंध आणि घट्ट मैत्री, आजही तशीच टिकून आहे. आजच्या व्यावसायिकतेच्या जमान्यात गोखले आजोबांच्या नवरत्नहार या संस्थेचे ऋण, त्यामुळे समृद्ध झालेले संगीताचे विश्व, त्यातून मिळालेले अनुभव, त्यातूनच दृढ होत गेलेले अगोदर कलाकार असलेले मित्र, आधी मित्र व मग कलाकार, कसे आणि कधी झाले ते समजलेच नाही. नाती आणि नातेवाईक कधी निवडता येत नाहीत असे म्हणतात, पण या संगीतवेड्या आजोबांनी नातवंडे आणि कलाकार मुलांनी, आजोबा मात्र निवडले होते !

हेमकांत नावडीकर
navdikar@gmail.com

Comments

  1. सुंदर... 😊👌👍👌😊

    ReplyDelete
  2. त्या काळात आजोबा त्यांचं नाव गोपाळ लक्ष्मी नारायण गोखले असं लिहीत असत.कारण त्यांचे वडील लवकर गेले होते आणि त्यांचा सांभाळ करण्यात आईचा जास्त मोठा वाटा होता. आजकाल सगळेच हे follow करतात.पण त्या काळात ही अगदी unique गोष्ट होती.
    खूप खूप आठवणी जाग्या आल्या.छान लिहिलं आहेस. बालपण ते आत्ता पर्यंत चा प्रवास आठवला सगळा

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरं आहे...
      धन्यवाद 🙏🙏🙏

      Delete
  3. Farach surekh 👌
    Ajoba ani tyanchi hi kalakaar natvande mihi pahili ahet...tyanchi kala javlun aikli ahe hyacha mala khup khup Anand hotoy
    Ani tu he farach samarpak ani sundar shailit lihile ahes hyache khup kautuk vatate...

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून आभार 🙏🙏🙏

      Delete
    2. Khupach chan. Aajkal ashi niswarthi manase milane khup kathin ahe. Sangit premapoti aajobani kiti kasht ghetlet. Tyana manapurvak pranam.

      Delete
  4. खूपच ओघवत्या भाषेत लिहिले आहे. खूप नशीबवान आहात तुम्हाला हे सगळे अनुभवायला आणि शिकायला मिळाले. त्या आजोबांना साष्टांग प्रणिपात केवळ संगीतावरील प्रेमापायी त्यांनी एवढे कष्ट घेतले.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

      Delete
  5. This your association with Gokhale sakina must have taught you a lot & may during that period you must have got some of the best friends in your life. After all people in your life make your life more rich than money.
    Regards,

    Sanjeev Kulkarni.

    ReplyDelete
  6. Pl. read as Gokhale aajoba
    Regards

    ReplyDelete
  7. Pl. read as Gokhale sakina. Typing mistake.
    Regards.

    ReplyDelete
  8. वा दीपू फारच छान...

    ReplyDelete
  9. खरंच खूप छान, गोड आठवणी जाग्या झाल्या.सुधना गोखले शास्त्रीय संगीत स्पर्धा असायची.निस्पृहपणे काम करायचे ते...खूप छान लिहीला आहे लेख..

    ReplyDelete
    Replies
    1. शुभदाताई तुमच्यासारख्या कलाकाराने दिलेल्या सुंदर अभिप्रायाने भरून पावलो... मनापासून आभार 🙏🙏🙏

      Delete
  10. आम्ही दांडेकर बुवांच्या तोंडून या गोष्टी ऐकल्यात.मोठा भाऊ श्रीराम त्यांच्याकडे शिकला आहे.मी ८व्या वर्षी त्यांची साथ केली आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. भाग्यवान आहात आपण. मनापासून आभार 🙏🙏🙏

      Delete
  11. मित्रा,
    खूप सुंदर, काहीही माहिती नसलेल्यांना एकाचवेळेस मोहून टाकणारं आणि हूरहूर लावणारं लेखन .....
    धनंजय खुर्जेकर

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून आभार 🙏🙏🙏

      Delete
  12. मनापासून धन्यवाद या लेखाची लिंक पाठवल्याबद्दल. मी केसकरांकडे शिकत असतानाचा तो काळ. मी त्यांना भेटले होते.😊😊

    ReplyDelete
  13. लेख सुंदर लिहिला आहे. अतुलकडून गोखलेआजोबांविषयी खूप ऐकले आहे, तुमच्या प्रवासाचे किस्से तर खूपच रोचक आहेत. ते सर्व वर्णन तुमचा लेख वाचून डोळ्यांसमोर उभे राहिले.

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान ...

मार्दवपूर्ण गाण्यांचे माळपदक : माणिक वर्मा

कुमार नावाची चिरतरुण मैफल