गझलांचे शहनशहा : उस्ताद मेहदी हसन

१३ जून म्हणजे खाँसाहेबांना जाऊन आज ७ वर्षं झाली.... त्यांना भावपूर्णआदरांजली



         गझलांचे शहनशहा : उस्ताद मेहदी हसन



          १९७० च्या दशकात रेकॉर्ड प्लेयर म्हणजे ध्वनिमुद्रिकांचा जमाना होता. घरामध्ये रेकॉर्डप्लेयर असणे हे त्याकाळी श्रीमंतीचे लक्षण होते. त्यामुळे प्रत्येक सुसंस्कृत घरात सोनी, ग्रुन्डीग, अकाई, फिलिप्स असे प्लेयर असत. आणि अशा प्रत्येक घरात नाट्यसंगीत, शास्त्रीय, सुगमसंगीताच्या ध्वनिमुद्रिकांचा संग्रह असे. त्यामध्ये बालगंधर्व, बडे गुलाम अली, हिराबाई बडोदेकर, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, परवीन सुलताना, रविशंकर यांच्याबरोबर लता, आशा, हृदयनाथांची कोळीगीते पण असत. मात्र या संग्रहामध्ये, या एका गायकाची एक तरी ध्वनिमुद्रिका असल्याशिवाय हा संग्रह पूर्ण होत नसे. हा संग्रह पूर्ण होई, तो पाकिस्तानमधील सुप्रसिद्ध गायक उस्ताद मेहदी हसनखां यांच्या  गझलांच्या ध्वनीमुद्रिकांनी. त्या काळात मेहदी हसन खाँसाहेबांनी, आपल्या दर्दभऱ्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने आणि अर्थपूर्ण गझलांनी रसिकांच्या हृदयाचा ठाव घेण्यास सुरुवात केली होती.  गुलो मे रंग भरे बादे नौबहार चले, ये धूआं सा कहासे उठता है, रंजिश ही सही, अबके हम बिछडे, आये कुछ अब्र अशा एकाहून एक सुंदर गझला रसिकांना अक्षरशः पागल करत होत्या

मेहदी हसन खाँसाहेबांच्या अगोदर अख्तरीबाई गझल रसिकांच्या हृदय सम्राज्ञी होत्या. अख्तरीबाईंना शास्त्रीय गायकीची व्यवस्थित तालीम होती. अतिशय तयार व फिरणाऱ्या गळ्याबरोबर नैसर्गिकपणे व पोषक वातावरणातून उमटलेला दर्दभरा स्वर, यामुळे अख्तरीबाई अतिशय लोकप्रिय होत्या. त्याकाळी खमाज, पिलू, खंबावती, भैरवी अशा पारंपरिक स्वरांमध्ये जरी गझला बांधलेल्या असल्या, तरी आपल्या समर्थ गायकीने अख्तरी बाईंनी रसिकांना खरोखरच दिवाना बनवले होते.  अख्तरीबाई कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असताना मेहदी हसन खाँसाहेबांनी गायला सुरुवात केली होती. मुख्यत्वे पाकिस्तानी चित्रपटातून व रेडिओवरून हळूहळू त्यांच्या गझला लोकप्रिय होऊ लागल्या. खाँसाहेबांच्या अगोदरच्या काळातील रचना किंवा गझल, शास्त्रीय संगीतातील गायला जाणारा उपप्रकार, अशा व्याख्येत बसणाऱ्या होत्या. खाँसाहेबांनी त्यात लालित्य आणले, शास्त्रीय संगीताचा बोजडपणा कमी केला.



          खाँसाहेब जन्माने भारतीय. राजस्थान मधील लुना गावचे. संगीताचा वारसा त्यांना घरातच मिळालेला. पण तरीही त्यांच्या गझला परंपरेची चौकट मोडून एक नवाच रंग घेऊन आल्या. त्या काळी उस्ताद बरकत अली मुख्तार बेगम,  अखतरी बाई यांच्या परंपरेशी नाते न सांगणारी, शास्त्रीय संगीताची चौकट न मोडणारी, पूर्ण शास्त्रीय नसूनही, अभिजात असलेली, जडजंबाल उर्दू शायरी नसूनही अर्थगर्भ असलेली, दर्जेदार शायरांच्या कलामांवर, रूढार्थाने पारंपारिक नसूनही स्वरावटींचा नवा साज ल्यालेली आणि या सर्वांवर आपल्या सुंदर मखमली, भारदस्त आणि सुरेल आवाजाने केलेली अभिजात कलाकुसर रसिकांना‌ भावली नाही तरच नवल. खाँसाहेबांनी गायलेल्या गझलांची संख्या फार नसेल, फारतर शे-दोनशे च्या घरात. पण प्रत्येक गझल म्हणजे एक बंदिशच जणू. मेहंदी हसन खाँसाहेबांच्या गझलगायकीचे वैशिष्ट्य एका शब्दात सांगायचे झाले, तर त्यात त्यांनी सर्वार्थाने जपलेला अभिजातपणा !!!



           खाँसाहेबांना गझल गायकीचे शहनशहा संबोधले जाते. कारण गझल गायनासाठी निवडलेली अतिशय दमदार शायरी, त्यातील अर्थानुसार व गझलांच्या  शेरमधील शब्दांच्या नाट्यमयतेला, शब्दमाधुर्याला अनुसरून चढवलेला संगीत साज व त्यांच्या जादूई आवाजातील सादरीकरण, यामुळे आजही त्यांच्या एकेक गझला, एक एक अजरामर कलाकृती बनल्या आहेत. वानगीदाखल किती पुरावे द्यायचे असे होऊन जाते. रंजिश ही सही  दिल ही दुखाने के लिये आ, अबके हम बिछडे तो शायद अभी खाबोमे, मिले शोला था जल बुझा हू, जो चाहते हो सो कहते हो चुप रहने की लज्जत क्या जानो,  रोशन जमाले यार असे  है अंजुमन तमाम, या आणि अशांसारख्या कितीतरी शब्दसुरांच्या द्वैताला त्यांच्या गायकीने अक्षरश: चार चांद लावले आहेत. रंजिश ही सही ही गझल तर त्यांच्या पुढच्या पिढीतील गझल गायकांसाठी मैलाचा दगड ठरली आहे, असे म्हणल्यास मुळीच अतिशयोक्ती होणार नाही. पुढील पिढीतील बहुतांश गझलगायकांच्या शाम आणि शब- ए-गझलांच्या कार्यक्रमाची सुरवात खाँसाहेबांच्या या यमनमधील अजरामर गझलेनेच झाली आहे.



क्या भला मुझको परखने का नतीजा निकला

ज़ख्मे दिल आपकी नजरो से भी गहरा निकला



अशा सुंदर शब्दांना चढवलेला मालकंसचा अप्रतिम स्वरसाज, किंवा



ये मौज झा भी मोहब्बत कभी दिखाए मुझे

के संग तुझपे गिरे और ज़ख्म आए मुझे



          म्हणजे, प्रेमाच्या ताकदीने असाही चमत्कार दाखवून द्यावा, की तुला दगड लागला तर जखम मला व्हावी ! अशा असंख्य सुंदर गझला, गझल शौकिनांच्या मनात घर करून राहिल्या आहेत. अबके हम बिछडे तो शायद कभी खाबोमे मिले, या शब्दातील विरहाची हुरहूर खाँसाहेबांच्या गायनाने अधिकच गहीरी आणि अधिकच बोचरी होऊन येते.



          शब्दांची दर्जेदार निवड हे जसे खाँसाहेबांच्या गझलांचे वैशिष्ट्य, तसेच त्याला चढवलेला  वैशिष्ट्यपूर्ण स्वरसाज  हे ही एक त्यांच्या गझलांचे  बलस्थान म्हणावे लागेल. कैसे छुपांउ राजे ग़म, फिक्र ही ठहरी, जब तेरे नैन मुस्कुराते है, अशा गझलांमधून स्वरावलींची नाट्यमयता दर्शवणाऱ्या अनेक रचना आहेत. कैसे छुपांउ राजे ग़म यासारखी रचना ऐकताना, हृदयामधले दु:ख लपवू पाहणाऱ्या संवेदनाशील शायरची तगमग त्या सुरावटीने आणि खाँसाहेबांच्या गायनाने, ऐकणार्‍याला अक्षरशः घायाळ करते. जब तेरे नैन मुस्कुराते है असे म्हणणाऱ्या कवीची अमूर्त कल्पना सुरांमधून तितक्याच प्रभावीपणे मांडण्याची किमया खाँसाहेबच करू शकतात. अप्रतिम शब्दरचना, तितकीच प्रभावी चाल आणि त्याला साजेसे गायन या तीनही गोष्टींच्या संगमातून झालेले सुरेख संमिश्रण खऱ्या रसिकांना आपोआप आकर्षून घेते. मात्र ज्याला त्यातील ताकद जाणवत नाही, त्यांच्यासाठी मात्र मेहंदी हसन खाँसाहेबांनी, कधी सवंग शब्दांचा बाजार मांडला नाही. मुद्दामून पीने-पिलाने वाली शायरी पेश केली नाही. ना कधी स्वर लांबवणे, स्वरांच्या चमत्कृतीपूर्ण कोलांट्या उड्या मारणे किंवा इतर कोणत्याही संगीतेतर गोष्टींच्या आश्रयाला ते बिलकुल फिरकले नाहीत. चाक गिरेबान म्हणजे प्रेमाच्या वेडापायी आयुष्याची  लक्तरे करून फिरणाऱ्या माणसांमधील वास्तवापेक्षा, प्रेमाच्या वेडाचे झपाटलेपण त्यांना कदाचित आकर्षित करत असावे. त्या बाह्यरूपापेक्षा माणसातील अंतर्मनाचा अविष्कार, त्यातील कवि मनाचा गहिवर, त्यांना अधिक भावला, म्हणूनच ते खऱ्या अर्थाने शहनशाह ठरले. शास्त्रीय गायनाची उत्तम तालीम मिळाल्यामुळे कि काय किंवा मूळच्या स्वभावामुळे असेल कदाचित, अर्थाला न्याय देण्याची, अर्थाची हानी न होऊ देता, त्यातील अवघडलेपणा सोपा करून गाण्याची त्यांची ताकद विलक्षण होती. कुठेही मी कसा गातो हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही, कुठेही गळ्याची तयारी दाखवण्याचा अभिनिवेश नाही. म्हणूनच त्यांनी रसिक मनावर राज्य केले. आजही त्यांच्या गझला ऐकताना, गझलांमधील तबलजी बरोबर केलेली माफक दंगामस्ती  गझलांमधील शब्दांची गंमत कुठे हरवू न देता, रस निष्पत्ती करणारी ठरते. आपल्या गायनाने आपण शब्दांवर मात तर करत नाही ना, याचे सतत भान ठेवल्यामुळे, त्यांचा चाहतावर्ग जगभर तयार झाला. सुमारे वीस-पंचवीस वर्षांपूर्वी खाँसाहेबांची पुण्यातील अरोरा टॉवरमधील मैफल प्रत्यक्ष अनुभवण्याचा अभूतपूर्व योग आला, तो देखील त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांपैकी एका पुणेकर चाहत्याच्या दिवानगीमुळे. केवळ धनाढ्यांनी त्यांच्याचसाठी चालवलेल्या कलामंडळात, साहेबांची मैफल आयोजण्यात आली होती. मनोज पटवर्धन या आमच्या गझल गायक मित्राने, खाँसाहेबांची मैफल ऐकता यावी, म्हणून त्या धनाढ्यांच्या कलामंडळाचे, सामान्य रसिकाच्या अवाक्याबाहेर असलेले वार्षिक सभासदत्व, केवळ खाँसाहेबांच्या प्रेमापोटी घेऊन टाकले. त्यामुळे त्यांचे अभूतपूर्व गायन ऐकता आले. त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचा ऐकण्याचा व अनुभवण्याचा दुर्मिळ योग जुळून आला. दुसऱ्या दिवशी त्यांचे आशीर्वादही घेता आले. आपल्या चाहत्यांच्या हृदयात दैवताचे स्थान मिळवलेल्या मेहदी हसन खाँसाहेबांच्या निधनाने एक पर्व समाप्त झाले. आजही ज्यावेळी त्यांचा दर्दभरा आवाज आता ऐकू येतो, तेव्हा रसिकांच्या आणि त्यांच्या चाहत्यांच्या मनाची अवस्था खाँसाहेबांच्या अशाच एका सुंदर गझलद्वारे शायरने अचूक व्यक्त केली आहे ....



जब भी आती है तेरी याद कभी शामके बाद

और बढ़ जाती है अफसुरदा दिली शाम के बाद..



हेमकांत नावडीकर

navdikar@gmail.com

Comments

  1. अतिशय सुंदर लेख .. प्रेमाच्या वेडाचे झपाटलेपण, बाह्यरूपापेक्षा अंतर्मनाचा आविष्कार हे अगदी तंतोतंत खरे! त्यांच्या गाण्यात जो सुकून होता ती त्याचमुळे होता.

    ReplyDelete
    Replies
    1. खरं आहे... खूप खूप धन्यवाद 🙏

      Delete
  2. अप्रतिम लेख आहे

    ReplyDelete
  3. अप्रतिम, अभ्यासपूर्ण लेख. खांसाहेबांच्या गायकीचा मीही असाच एक पागल चाहता आहे. हेमकांत, कॉलेजमधले आपल्या पिढीचे दिवस खांसाहेबांच्या दर्दभर्या आवाजाने सुनहरी झाले यात शंकाच नाही. धन्यवाद..
    ... धनंजय खरवंडीकर

    ReplyDelete
  4. वा। अप्रतिम लेख।

    ReplyDelete
  5. वाह हेमकांत ! आवश्यक ती उपयुक्त माहिती, मेहदीसाहेबांच्या गाण्याचा रसास्वाद आणि माफक विश्लेषण यांचा सुरेख समतोल या छोट्याशा लेखात सुरेख साधला गेलाय . त्यासाठी अभिनंदन . असेच लेख नेहमी वाचायला मिळोत .... !

    ReplyDelete
  6. अतिशय सुंदर लेख....

    ReplyDelete
  7. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  8. मेहंदी हसन खा साहेब म्हणजे संगीत क्षेत्राला मिळालेली एक दैवी देणगीच.शास्त्रीय संगीताचा अभ्यास,सुरांवरील पकड,वर-खाली अगदी लीलया फिरणारा अप्रतिम आवाज, गझल गायकीतून दिसणारा राग विस्तार हे सगळेच विसमयकारक होते.खा साहेब नेहमी म्हणत असत की प्रत्येक कलाकाराने शास्त्रीय संगीताचा (त्यांच्या शब्दात एशिया की मेलडी) प्रचार आणि प्रसार केला पाहिजे.असा कलाकार हजार वर्षात होणे नाही.आज एकही दिवस त्यांची गझल ऐकली नाही असे होत नाही.फक्त एकच खंत आहे की मेहंदी हसन खा साहेब भारतातच राहिले असते तर....
    आपली त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली आपण खरोखरच भाग्यवान आहात.वरील लेखातून आपण त्यांना वाहिलेली आदरांजली मला मनापासून भावली.
    अभय केसकर.

    ReplyDelete
    Replies
    1. अभय केसकर आपल्या खूप छान प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

      Delete
  9. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  10. Replies
    1. मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

      Delete
  11. गझल सम्राट मेहंदी हसन खाँ साहेब यांच्यावर लिहिलेला हा सार्थ सुंदर लेख आहे . त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा आहे . खाँसाहेबांची गझल म्हणजे शब्द - सूर - अर्थ - भाव यांनी एकूणच नेहमीच भारलेला माहोल ! खाँसाहेबांना विनम्र भावपूर्ण आदरांजली!🌹🌹🙏🙏🌹🌹

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान ...

मार्दवपूर्ण गाण्यांचे माळपदक : माणिक वर्मा

कुमार नावाची चिरतरुण मैफल