गझलांचे शहनशहा : उस्ताद मेहदी हसन
१३ जून म्हणजे खाँसाहेबांना जाऊन आज ७ वर्षं झाली.... त्यांना भावपूर्णआदरांजली गझलांचे शहनशहा : उस्ताद मेहदी हसन १९७० च्या दशकात रेकॉर्ड प्लेयर म्हणजे ध्वनिमुद्रिकांचा जमाना होता. घरामध्ये रेकॉर्डप्लेयर असणे हे त्याकाळी श्रीमंतीचे लक्षण होते. त्यामुळे प्रत्येक सुसंस्कृत घरात सोनी, ग्रुन्डीग, अकाई, फिलिप्स असे प्लेयर असत. आणि अशा प्रत्येक घरात नाट्यसंगीत, शास्त्रीय, सुगमसंगीताच्या ध्वनिमुद्रिकांचा संग्रह असे. त्यामध्ये बालगंधर्व, बडे गुलाम अली, हिराबाई बडोदेकर, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, परवीन सुलताना, रविशंकर यांच्याबरोबर लता, आशा, हृदयनाथांची कोळीगीते पण असत. मात्र या संग्रहामध्ये, या एका गायकाची एक तरी ध्वनिमुद्रिका असल्याशिवाय हा संग्रह पूर्ण होत नसे. हा संग्रह पूर्ण होई, तो पाकिस्तानमधील सुप्रसिद्ध गायक उस्ताद मेहदी हसनखां यांच्या गझलांच्या ध्वनीमुद्रिकांनी. त्या काळात मेहदी हसन खाँसाहेबांनी, आपल्या दर्दभऱ्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने आणि अर्थपूर्ण गझलांनी रसिकांच्या हृदयाचा ठाव घेण्यास सुरुवात केली होत...