कुमार नावाची चिरतरुण मैफल
२०१२ साली कुमारजींच्या जन्म दिनाचे निमित्ताने मटामध्ये प्रसिद्ध झालेला लेख.... कुमार नावाची चिरतरुण मैफल ... पूर्वीच्या काळी म्हणजे किमान तीस चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत, नामांकित, बुजुर्ग गायकाची खासगी किंवा छोटेखानी मैफल फारशी दुर्मिळ गोष्ट नव्हती. मोठे कलाकार हे आज इतके मोठे झाले आहेत, की त्यांची सर्वसामान्य श्रोत्यांशी असलेली नाळ तुटल्यासारखीच अवस्था झाली आहे. मोठया, किंवा स्टार कलाकारांची खाजगी किंवा छोटेखानी मैफल ही आता विस्मृतीतच गेलेली गोष्ट झाली आहे खरी. आणि आजच्या कलाक्षेत्राचा एकूण व्यवहार पाहता, तो ही या कालचक्राचा माहिमाच म्हणायचा. पूर्वी कलाकाराने आज मी तुम्हाला अमुक एक राग ऐकवतो, असे म्हटल्यावर, अरे, खरेच आपण हे ऐकूया किंवा ऐकायला पाहिजे, असे श्रोत्यांना मनापासून वाटे. खूप वेळ लांब ताना घेतल्यावर टाळ्या वाजवणे, एकच प्रकार बराच वेळ करणे, असे सवंग प्रकार, हे सवंग आहेत, हे पटणाऱ्या श्रोत्यांची संख्या जास्त होती. तबलजी व मुख्य कलाकार यांची आज एकमेकांवर कुरघोडी करण्याची, भर मैफलीमध्ये चाललेली धडपड पाहून, ही कला आहे की त्या...