जिंदादिल नंदूजी

जिंदादिल नंदूजी ...


     आहेत का मालक ? अशी मोठया आवाजात आपुलकीची हाक मारत त्यांची दुकानात एंट्री व्हायची. उंचीपुरी देहयष्टी. डोक्यावर हॅट, डोळ्यावर गॉगल आणि ऐटदार पोशाख, अशा मोठया रूबाबात ते दुकानात येत. दुकानाच्या मालकाशी इतक्या सलगीने सहसा कोणी अनोळखी गिऱ्हाईक येत नाही. माझ्याशीच काय पण कोणाशीही तितक्याच सहजपणे सलगी करायची त्यांची विलक्षण हातोटी होती. आनंद सिनेमातल्या आनंद प्रमाणे, आनंद वाटत जायचा त्यांचा स्वभाव होता. व्यसनच म्हणा ना. कोणाला भलभलते व्यसन असते, त्यांना माणसं जोडायचे व्यसन होते. संगीत वाद्यांच्या दुकानात वरचेवर यायला, संगीत ही काही रोजच्या गरजेची वस्तू नव्हे. तरीही हे गृहस्थ महिन्या दोन महिन्यातून, आहेत का मालक, अशी हाक मारत नक्की यायचेच. काय नवीन काय आलं आहे असं विचारत एखादी बासरी घेऊन जातील, तर कोणाला पेटीचं कव्हर पाहिजे, म्हणून कव्हर घेऊन जातील, किंवा कधी तर, 'आमच्या त्या यांना', अमुक अमुक वाद्य पाहिजे, एखादे छानसे वाद्य काढून ठेवा, मी पुढच्या वेळी आलो कि नक्की घेउन जाईन, असे म्हणून लापता व्हायचे, ते पुन्हा महिन्या-दोन-महिन्यात हजर!!!  प्रथम त्यांची ओळख नव्हती तेंव्हा खूप विशेष वाटे. अरे काय हा माणूस आहे. गिऱ्हाइक हवं तर यांच्यासारखं असंच मनात येई. ओळख दृढ झाल्यावर लक्षात आलं कि ज्यांच्यासाठी वाद्य न्यायला ते आले आहेत, त्यांच्यासाठी आणि त्यांच्या ओळखीतल्या प्रत्येकासाठी ते, 'आमचेच' होते. आणखी जवळीक झाल्यावर लक्षात आले कि ' आमच्या ' लोकांचा प्रचंड संग्रह असलेला व त्याची श्रीमंती मिरवणारा हा सद्गृहस्थ म्हणजे एक अजबच रसायन होतं. हळूहळू ओळख वाढत गेली. मी ही एक छोटासा कलाकार आहे, याचा त्यांना पत्ता लागला आणि बुवा तुम्हाला एकदा किडनॅप करणार आहोत, कधी येताय आमच्याकडे, असा प्रेमळ दम देऊन स्वारी गायब. बऱ्याच दिवसांनी तो योग आला. आम्हा समानधर्मी कलाकारांचा अड्डा त्यांनी जमवलाच. त्या दिवशी त्यांनी वाद्यासहित खाण्या-पिण्याची सर्व साग्रसंगीत तयारीही तितक्याच प्रेमाने केली होती. झकास मैफल जमली होती. निवडकच मंडळी असल्याने गाण्या बजावण्याचा कार्यक्रमही झकास रंगला. मध्यरात्री केंव्हातरी त्यांची बेल वाजली बघतो तर त्यांचा नेहमीचा बिर्याणीवाला बिर्याणी घेऊन आला होता. त्यांच्या संपर्कात आलेला प्रत्येक माणूस त्यांनी अक्षरशः प्रेमाच्या धाग्याने जोडलेला होता. पहिल्याच भेटीत अनोळखी व्यक्तीलासुद्धा आपलंसं करण्याची त्यांचं कसब विलक्षण होतं. मग ही त्यांची माणसं, त्यांच्यासाठी काहीही करायला आनंदाने तयार असत. एरवी रात्रीचे १०ः३० वाजले कि किचन बंद होईल लवकर ऑर्डर द्या, अशी कुरकुर करणारा हॉटेलमालक, स्वतः त्यांचे पार्सल घेऊन रात्री-अपरात्री हजर होई ! इतकेच काय पैसे विचारायला सुद्धा थांबत नसे. 



     हळूहळू गोष्टी उलगडत गेल्या. त्यांची कसली तरी कन्सल्टन्सी होती. भारतभर फिरायला लागे. पण कौतुकाची गोष्ट अशी कि, जिथे जिथे ते जात त्या प्रत्येक गावात त्यांचा असाच गोतावळा होता! माणसं जोडणे, नुसती जोडायची नाहीत तर प्रेमाच्या निरलस, निरपेक्ष धाग्यानी घट्ट बांधून ठेवायची अनोखी देणगीच त्यांना होती. आजच्या काळात अशी, कोणत्याही अपेक्षेशिवाय मैत्री फार दुर्मिळ झाली आहे. दुसऱ्यासाठी काही करायचं म्हटलं कि मंडळी पळून जातात, पण या माणसाला आपल्याकडे कोणी येणार, मग तो कोणी कलाकार असो किंवा श्रोता असो, त्याच्यासाठी काय करु आणि काय नको असे होत असे. त्यांच्या गोतावळयात सामील होण्याची एकमेव अट होती, ती म्हणजे माणूस रसिक हवा, कोणत्याही गोष्टीचा आनंद घेणारा किंवा देणारा हवा. बाकी कसलीच अपेक्षा नसे. आठ दहा मंडळी जेवायला असली, तर तू भाजी आण, मी पोळ्या आणतो असले काही त्यांच्या मनातही येत नसे. त्यांच्याबरोबरच्या अनेक साग्रसंगीत मैफलीत, महाराज वाद्य घेऊन येताय ना, एवढंच ते विचारायचे. कारण कोणासाठी काही करायचं म्हणलं कि स्वारी खूष. मग त्याच्यासाठी काही करताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, त्या कलाकाराची उत्तम बडदास्त ठेवतानाचा त्यांचा अटोकाट प्रयत्न व सगळे उत्तम पार पडल्यावर, त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहताना प्रकर्षाने जाणवे ती त्यांच्या मनाची श्रीमंती. 
त्यांची धावाधाव नुसत्या संगीत मैफलीसाठी करत असतील असं मुळीच नव्हतं. अशाच त्यांच्या एका घरच्या मैफलीला, ठरलेल्या वेळेत पोहोचायला मला थोडासा उशीर होतोय, पण तुम्ही मित्रमंडळी मात्र वेळेत पोहोचा, असा फोन आला. घरी जाऊन पहातो तर घराच्या किल्लीपासून पुढची सगळी व्यवस्था जय्यत तयार होती. हे सगळे करायला दूरूनही त्यांना कसे जमायचे तेच जाणे. पण उशीर का झाला होता तर, एका जुन्या स्नेह्याला, ते बिचारे एकटेच होते व त्यांना त्रास झाला म्हणून हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करून स्वारी मैफलीत हजर. असंच एकदा एका मित्राच्या मुलीला दिल्लीमध्ये काहीतरी अडचण आली. बहुदा आर्थिकच असावी. हे महाशय जवळच म्हणजे कानपूरला होते ! तेथून त्यांनी थेट दिल्ली गाठली. त्या मुलीची मदत करून पुढच्या स्वतःच्या कामावर स्वारी हजर. हे सगळं करताना मी काही विशेष केलं आहे हे त्यांच्या गावीही नसे. चुकून पैसे मागितले तर काय, असला पळपुटा विचार मनातही येत नसे. मला खात्री आहे, कि अशा त्यांच्या निरपेक्ष वृत्तीने केलेल्या मदतीचे असंख्य किस्से, त्यांच्या प्रत्येक मित्राकडे निश्चित असणार आहेत. कोणासाठी काही करताना त्यातून मिळणारा आनंद आणि समाधान हेच, त्यांच्या अखंड उत्साहाचे इंधन होते. 

     एकदा दुकानात आले, गाडी रस्त्यातच पार्क केलेली. अनेकांना गाडी वेडीवाकडी पार्क करायची सवय असते. दोनच मिनिटात येतो, छोटंच काम आहे, लगेच येतो, अशा सबबी सांगून दुसऱ्याची गैरसोय करून मंडळी खुशाल तासन् तास गायब होतात. आमच्या या अवलिया मित्राला सोडायला रस्त्यावर गेलो तर, त्यांचीही गाडी रस्त्याच्या मध्येच लावलेली होती पण गाडीच्या पुढच्या काचेमध्ये, कोणाची गैरसोय होऊ नये म्हणून, स्वतःचे दोनही मोबाईल क्रमांक ठळक अक्षरात लिहीलेले ! खरंच अजबच रसायन होते या गृहस्थाचे. 

     त्यांच्या मुलाच्या लग्नातील एक प्रसंग त्यांनी स्वतः सांगितला होता. मुलाचे लग्न ठरल्यावर असाच उत्साह ओसंडत होता. कामासाठी लखनौला गेले होते. काम संपल्यावर थोडा वेळ शिल्लक होता. टॅक्सी पकडली व ड्रायव्हरला एके ठिकाणी गाडी न्यायला सांगितले. ते ठिकाण ऐकून ड्रायव्हर उत्तरला; साब, आप जैसे लोग वहाँ जाते नही है', ते म्हणाले ठीक आहे, घेऊन तर चल. स्वारी पोहोचली ती तवायफच्या कोठीवर ! त्यांना सांगितले कि माझ्या मुलाचे लग्न आहे, या निमित मला तुमचा कार्यक्रम करायचा आहे तुम्ही याल का ? त्यांनी या सद्गृहस्थाला आपादमस्तक न्याहाळले व उद्या सांगतो असे सांगितले. एखाद्या तवायफेला एका सद्गृहस्थाघरचे आमंत्रण द्यायचे आणि त्यांनी ते स्वीकारायचे म्हणजे सगळीच आफत ! पण त्या तवायफा व त्यांचे साजिंदे यांचा गाण्याचा कार्यक्रम तर त्यांनी आयोजलाच, पण त्यांची उत्तम बडदास्त ठेवली. इतकंच नव्हे, तर त्यांचा व्यवस्थित बिदागी देऊन यथोचित सन्मान केला. या सुसंस्कृत, घरंदाज मंडळींसमोर कार्यक्रम करायला मिळाला व अशा लोकांच्या मिळालेल्या प्रेमाने, त्या तवायफा व त्यांचे साजिंदे अक्षरशः भारावून गेले. अशा समाजासमोर झालेला सन्मान पाहून, त्या तवायफांनी आपले आवरलेले अश्रू मोकळे केले. वधू- वर आणि त्यांचे माता-पिता यांना सजदा, म्हणजे सर्वांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला, तोंडभरून आशिर्वाद दिले. कलारसिक, कलाकार व त्यांच्या कलेवर मनापासून प्रेम करणारा, त्यांच्या कलेचा सन्मान करणारा व त्याच्यासाठी अक्षरशः काहीही करायला तयार असणारा, अनोखे दातृत्व असलेला, कलंदर म्हणा, असा हा जिंदादिल अवलिया म्हणजे नंदकुमार वडाळकर. 

      नंदूजी मूळचे बडोद्याचे, काही काळ वास्तव्य नागपूरला झाले. अर्थातच तिथेही त्यांचा मोठा मित्रमंडळींचा गोतावळा. स्वतः एक हौशी वादक. वेगवेगळी वाद्ये गोळा करण्याचा छंद अनेकांना असतो पण वाद्यांबरोबर वादक व गायकही गोळा करण्याचा त्यांचा छंद अनोखा होता ! पुण्यात आमची त्यांची गट्टी जमली आणि या दिलदार, रसिक आणि मनाने श्रीमंत असलेल्या नंदूजींच्या उमद्या स्वभावातील वैभव जवळून अनुभवता आले. त्यांच्या स्वभावातील वाटणारा वात्रटपणा, वाह्यातपणा वरकरणीच होता. त्यांच्या अंतरंगात लपलेले मूल व जीवन रसरशीतपणे जगण्याचा त्यांचा मूळ स्वभाव त्यांनी अखेरपर्यंत जपला. नाना म्हणजे चटकन कोणाला कळणार नाही पण नाना हे नाव नसून उपाधी होती. नाना म्हणजे नागपूरचे नालायक!!! तसेच आमचे पूना मित्रमंडळ होते !



     मागच्याच वर्षी त्यांच्या घरी दोन मोठे संस्मरणीय कार्यक्रम झाले. एक तर त्यांचे मित्र पं. उल्हास बापट यांच्या एकसष्टीचा घरगुती सोहळा व मनोज पटवर्धनच्या गझ़लांचा व मुंबईच्या आणखी एका हौशी गायिकेचा कार्यक्रम. नंदुजीनी पं उल्हास बापट यांना चांदीची संतूरची प्रतिकृती व एक मानपत्र सगळे स्वतः हौसेने केलेच, वर ४०-५० जणांना मस्तपैकी खाऊ पिऊ घातले. अशा कार्यक्रमांच्या उपास्थित मित्रांमध्ये बरेच वेळा रविंद्र साठे, सुधीर गाडगीळ, प्रदीप निफाडकर अशी आपापल्या क्षेत्रात धुरीण आणि खाशी मित्रमंडळी नंदूजींच्या प्रेमापोटी हमखास आपले कार्यक्रम बाजूला ठेवून हजेरी लावणारच. कारण इतर कार्यक्रमात न मिळणारी एक गोष्ट नंदूजींच्या घरी नक्की मिळणार हे त्यांना ठाऊक होतं ती म्हणजे आपुलकी, प्रेम, जिव्हाळा आणि हे सगळंच. थेट आनंद सिनेमातल्या हिरो सारखं प्रेम वाटत जाणे, हाच नंदूजींचा छंद होता. आणि... वर्ष सव्वा वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नंदूजींचा स्वतःच फोन आला, अरे मी के. इ. एम्. मध्ये अॅडमिट झालो आहे ! सर्व तपासण्या झाल्या आणि विचित्र योगायोग असा कि, आनंद सिनेमाप्रमाणेच त्यांना नको त्या रोगाने त्यांना गाठल्याचे निदान झाले. ते स्वतःच हसत हसत सांगत होते, थर्ड स्टेज ८० % क्रॉस झाली आहे आणि आता लढायला सज्ज झालो आहे. या दुर्मिळ व्यक्तीला ग्रासले तेही, रक्त आणि स्किनच्या कॅन्सरच्या दुहेरी, दुर्मिळ व दुर्धर रोगाने ! रोगाचे निदान, काही दिवसांचेच सोबती, असे सांगणाऱ्या नियतीशीही त्यांनी चक्क दोस्ती केली आणि तिलाही थोडे थोडके नाही तर जवळजवळ सव्वा वर्षं थांबायला लावले, ते फक्त केवळ स्वतःच्या मनःशक्तीवर. त्याचा परिणाम एवढाच झाला, कि या सव्वावर्षाच्या काळात त्यांनी कल्पनेपलिकडच्या असह्य वेदना सोसल्या. दोन-तीन माहिन्यापूर्वी त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले, त्यावेळीही या रोगाशी अटीतटीची झुंज चालू होती. कोणताही रुग्ण अशा परिस्थितीत मला कधी सोडवतो आहेस अशी देवाला विनवणी करत असतो, पण नंदूजींना, यार, कधी बरा होतो आहे असं वाटतंय, असं म्हणताना पाहून, त्यांच्यातल्या सकारात्मक उर्जेला मनोमन सलाम केला. नंदूजी त्या रोगाशी हसत हसत, मोठया धीराने लढले खरे, पण दुर्देवाने शेवटी नियती जिंकलीच.



     सारखी खंत एकच वाटते कि, अशा या मनमोकळ्या, रसिक मित्राचा परिचय तसा उशीराच झाला. 
आता वाटतं, याची तक्रार नियतीकडे करायला हवी. हे सगळं भूतकाळात लिहीतोय. काय करणार काय. कधीही, कोणतीही गोष्ट एकट्याने एन्जॉय न करणारा, सर्वांना बरोबर घेऊन मैफलीचा आस्वाद घेणारा आमचा मित्र, यावेळी मात्र आम्हाला बरोबर न घेता पुढे गेला. मला खात्री आहे नंदूजी, तिथेही आम्हाला काही कमी पडू नये, म्हणून मैफलीची व्यवस्था करायला पुढे गेलात ना. खरंच, बाबू मोशाय, सारखी त्यांची हाक अजूनही कानात ऐकू येते..."आहेत का मालक" ?

     हृदय जिंकण्याची कला लाभलेला, माणसांमध्येच रमणारा व प्रेम वाटत जाण्याची कला लाभलेला हा एक दुर्मिळ कलावंतच होता !!!


- हेमकांत नावडीकर...

Comments

  1. Excellent depiction of dear Nandu's personality so very axactly.Salutes to you & Nandu.heartfelt thanks.regards.

    ReplyDelete
  2. Really Hemkant...Nanduji was great human being.. We had attended number of programs at his home in Pune... We stayed lot times in his house at Pune.. He was very close to us.. and good friend.. He had gone to Delhi to make an temporary arrangement for one month stay of his friends daughter..she was selected by the Government in the Parliament " study of law of parliament " ..He has made residential arrangement very close to parliament by his influence.. He was master in Marathi, English,Bangali, Gujarati, Telugu.. Excellent cook and use to host and serve every friend... Music lover.. Broad minded.. Really a loss of a great friend.. RIP 🙏🙏.... Sandeep Patil

    ReplyDelete
  3. हेमकांत किती छान लिहिले आहे तुम्ही. त्या नंद्याला (साल्याला !!!) समोर ऊभे केले.

    ReplyDelete
  4. माझा तर लहान भाऊच होता, अजून ही वाटते की तो इथे कुठेतरी आहेत ,अशा जगमित्र नंदू आपल्या मध्ये नाही हे मनाला पटतच नाही !!!! निसर्गा पुढे काय चालणार आपलं ??? त्याची खूप आठवण येते.😢एखाद गाणया चा अंतरा नाही आठवला की माला रात्री फोन करायचा, सकाळी ६ वाजता फोन येयचा मी त्याला शोधून सांगायचो, संगीता चा माझा गुरू होता.खुप सांगायचे आहे पण शब्द फुटत नाही, आमच्या परिवाराचा तो स्तंभ होता.

    ReplyDelete
  5. सुंदर परिचय

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान ...

मार्दवपूर्ण गाण्यांचे माळपदक : माणिक वर्मा

कुमार नावाची चिरतरुण मैफल