स्वरांच्या लोचनांनी विश्व पाहणारे संगीतकार - श्रीनिवास खळे
स्वरांच्या लोचनांनी विश्व पाहणारे संगीतकार
- श्रीनिवास खळे
काही माणसांचे आणि आपले ऋणानुबंध का आणि कसे जुळावेत याला काही उत्तर नाही. एक तर ऋणानुबंध जुळायला खरंतर कुठेतरी काहीतरी समान धागा हवा. पण केंव्हा केंव्हा आयुष्यात नियती असे काही श्रीमंत दान पदरात टाकते कि आश्चर्यमुग्ध व्हायला होते. एके दिवशी माझ्या बाबतीतही असेच झाले. झोप उडवणारी अंगाई गीते देणारे संगीतकार, असं पुलंनी ज्यांचं वर्णन केले ते ज्येष्ठ, श्रेष्ठ संगीतकार पं श्रीनिवास खळे यांची अचानक भेट घडली आणि आयुष्य खरंच श्रीमंत होऊन गेले. त्यांच्याशी माझे ऋणानुबंध दैवानेच योजिले होते हेच खरे ! लता-आशा या संगीतातील सूर्य चंद्रांनाही त्यांच्या चाली गायच्या म्हणजे मोठं बिकट आव्हान वाटतं. मी तर खळे साहेबांच्या लेखी एक सर्वसाधारण कलाकार होतो. पण एके दिवशी, पुण्यातल्या सत्यशील देशपांड्यांच्या घरी अचानक खळेसाहेबांची भेट झाली. सत्यशीलजींनी हा मुलगा तबला वाजवतो असे सांगताच, उद्यापासून भीमसेनजींच्या घरी रिहर्सलस् चालू होताहेत, सकाळी दहा वाजता या त्यांच्या घरी. त्या दिवशी नियतीने एकदम दोन दोन दाने पदरात टाकून मला एकदम कुबेरच केले ! मग तेथून पुढचे जवळजवळ पंधरा दिवस माझ्या एका बाजूला खळेसाहेब तर दुसऱ्या बाजूला भीमसेनजी, अशी दोन उत्तुंग शिखरे ! असे विलक्षण अनुभवसंपन्न असे ते दिवस होते. खळे साहेब त्यावेळी तुका झालासे कळस आणि सुन भई साधो या अल्बम्सच्या रिहर्सल्सच्या निमित्ताने पुण्यात आले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी पंडीतजींच्या घरी पोहोचलो. थोडया वेळातच खळेसाहेबांनी ' मधुकर शाम हमारे चोर' या भजनाची रिहर्सल सुरू झाली. रोज सकाळी १० वाजता मी हजर व्हायचो ते साधारणपणे दोन-अडीच वाजेपर्यंत. रिहर्सल जशी रंगेल, जशी गाणी बसतील, त्याप्रमाणे वेळ थोडी मागे पुढे होत असे. पुन्हा संध्याकाळी ७ च्या सुमारास चालू होई आणि रात्री जसा गायला रंग भरेल, त्याप्रमाणे रात्री उशीरापर्यंत चाले. असे सलग पंधरा दिवस केवळ मंतरलेले होते. भीमसेनजी त्यावेळी कार्यकमात व्यस्त असत. त्यांच्याकडे भेटायला येणाऱ्या पाहुण्यांचा राबता पण खूप असे. महत्वाचे फोन असत. मधेच त्यामुळे एखादा ब्रेक होई. बरेच वेळा पंडीतजींना कोणी भेटायला आल्यावर किंवा पंडीतजी रिहर्सलला येईपर्यंत, त्या खोलीमध्ये खळेसाहेब, त्यांची पेटी, मी व तबला असे आम्ही फक्त चौघेच असू !!! तेंव्हा खरी मजा यायची. म्हणजे खरं तर त्या एकांताची मी वाट पहात असे. कारण त्यावेळी खळेसाहेब नवनवीन रचना रचताना, पहायला व ऐकायला मिळे. इतर कोणी नसताना खळेसाहेब त्यांच्या सॅन्योच्या वॉकमनवर, स्वतःची नवीन कॉम्पोझिशन्स रेकॉर्ड करून ठेवत. हे गाणं लताबाईंसाठी करतोय, हे आशाबाईंसाठी केलं आहे, इतकं सगळं त्यांनी मनाशी योजिलेलं असे. संगीतातील सर्व अलंकार लेऊन सजलेल्या, त्यांच्या एकाहून एक श्रीमंत चाली ऐकतानाचा अनुभव शब्दातीत असे. 'ते म्हणाले चेहरे चुकवीत होतो' हे गाणं त्यांनी नुकतेच रचले होते. त्याचबरोबर 'माझीच तू' ही सुद्धा रचना अगदी नवी होती. ही दोनही गाणी नंतर त्यांनी सुरेशजींकडून गाऊन घेतली. 'जागो बन्सीवारे ललना ' हे नंतर त्यांनी शोभा गुर्टु यांच्याकडून गाऊन घेतलं. 'सोबतीला चंद्र देते' हे मुंबई आकाशवाणीवर प्रथम कविता कृष्णमूर्ती व नंतर देवकीताईंच्या आवाजात ध्वनिमुद्रित केलं. त्यावेळी नवीन असलेल्या या व अशा त्यांच्या रचना, त्यांच्या तोंडून ऐकणं, म्हणजे आनंदाची पर्वणीच असायची. त्यांच्या रचनांचं एक वैशिष्टय असं होतं, कि त्यांचा तालाचा अंदाज अत्यंत अनोखा होता. गाण्याचं मीटर कोणतेही असू दे, त्यांनी मीटरप्रमाणे ठेक्यात चाल बांधल्याचं कधीच आठवत नाही. किंबहुना गाण्याची चाल करताना, त्यांना मीटर किंवा ठेका कधीच लागत नसे. गाण्याचा मुखडा मनाजोगता झाला, कि तो मुखडा, जो कोणता ताल निवडतील, त्यामध्ये लयीशी छानपैकी खेळत सहज सुंदर समेवर येत. हा चमत्कार मला अनेक वेळा जवळून अनुभवायला मिळाला. तालांशी त्यांची मैत्रीच होती म्हणाना. मुखडयाची स्वरावली मनाजोगती जमल्यावर मीटरप्रमाणे, मात्रेबरहुकुम किंवा बीट टू बीट पेक्षा लयीशी क्रीडा करण्याचा त्यांना छंद होता. कारण लयीवर त्यांचं प्रभुत्व होतं. कितीतरी गाणी आहेत तशी. किंबहुना बहुतांशी गाण्यांमध्ये मात्रेच्या ठोक्याबरहुकुम किंवा आघातवर त्यांची गाणी कधीच बेतलेली नव्हती. खेळ मांडियेला वाळवंटी काठी या अभंगात तर, 'एक एका लागतील पायी रे', ही संपूर्ण ओळच्या ओळ, ऑफबीट ठेवण्याचं त्यांचं कौशल्य आणि असं काही करायचं त्यांच्या धाडसाचं कौतुकच वाटतं. त्यांच्या खास स्वतःच्या आवडत्या रचनांपैकी 'दूर सूर चौघडयात सनई साद घाली' हे त्यांच्या अत्यंत जवळचे होतं. अजूनही हे गीत ध्वनिमुद्रित झाल्याचे आठवत नाही.
त्यांच्या संगीताबद्दल मी बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास होतो आहे खरा. त्यांच्याच एका गीतात म्हणल्याप्रमाणे, मी स्वरांच्या लोचनांनी विश्व सारे पाहिले, असे स्वरांच्याच दिव्य दृष्टीने विश्वाकडे पाहणारे खळेसाहेब, गीतांमधून सर्वस्व माझे वाहिले याचा अनुभव देणारे संगीतकार होते, याबाबत मात्र कोणाचेही दुमत नसावे. बाकी शब्दांना चाली लावण्याचं हे विश्वच मोठं अनोखं आहे. कधी, कोणी, कुठे एखादं गाणं ऐकलं, म्हणजे कोणतंही, कि त्याचे तरंग मनात, अंतरंगात कसे आणि किती उमटतात, ते गाणं आतपर्यंत किती पोहोचतं, त्यावरून त्या गाण्याचा दर्जा सहजच लक्षात येतो. कधी कधी एखादं गाणं ऐकलं कि, एकदम छान प्रसन्न वाटतं, तर कधी एखादं गाणं ऐकलं कि नाचावसं वाटतं. कधी आपोआप मान डोलायला लागते. कधी काही गाणी आपल्याच आयुष्यातल्या एखाद्या जागेशी, घटनेशी जोडलेली असतात. ते गाणं ऐकलं कि ती व्यक्ति, ती जागा, तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. खळेसाहेबांची गाणी ऐकताना याच्या अगदी विरुद्ध होतं. त्यांची गाणी ऐकताना ती आपल्याला स्वतःच्याच अंतरंगात घेऊन जातात. त्यांचं गाणं ऐकलं कि सर्व बाहेरच्या जगाचा जणू विसर पडतो. आपोआप डोळे मिटतात. आणि स्वतःशीच संवाद सुरू होतो. एखादा वेध घेतलेला बाण जसं आतलं फाडूनच बाहेर येतो. तशीच ही विद्ध, घायाळ आणि अंतर्मुख करणारी त्यांची गाणी आहेत. नीज माझ्या नंदलाला हे अंगाईगीत कानावर पडलं कि आपोआप डोळे मिटतात, काहीतरी आत अस्वस्थ व्हायला होतं. कुठल्याशा आवेगाचा उमाळा जीवाची घालमेल करतो. आजपर्यंत अनेक आईबापांनी आपल्या पिटुकल्याला निजवायला, कदाचित बेसुऱ्या आवाजातही, नीज माझ्या अनेक वेळा गायलं असेल. पण आपण चांगले गात नाही हे माहिती असूनही, ते गावसं वाटण्याची शक्ती त्या चालीत आहे. ते गाणं मनात ऐकू आलं, तरी वात्सल्याचा उमाळा प्रत्येक गाणाऱ्या आईबापाला अस्वस्थ करतो. या चिमण्यांनो याही गीताचं तसंच आहे. कधी संध्याकाळी, विशेषतः परक्या गावात जेंव्हा एकटे असतो, त्यावेळी अनेक अस्वस्थ विचारांचं काहूर डोक्यात माजतं. कसलीशी अनामिक हुरहुर, काळजी, एक असहाय, असुरक्षित भितीची भावना वेढून टाकते. जवळच्या सगळ्यांची आठवण येते. कातरवेळच ती. हे सगळं सगळं म्हणजे अगदी नेमकेपणाने खळे साहेबांच्या, या चिमण्यांनोच्या सुरावटीतून ऐकणाऱ्याच्या काळजाचा अचूक वेध घेतं. अशाच एका रिहर्सल्सच्या एकांतात आणखी एक अद्भूत चाल त्यांच्या तोंडून ऐकली होती. तितकीच विलक्षण आणि ताकदवान, तितकीच हळूवार.
पाऊस कोसळे हा अंधारले दिसे
डोळे भरून आले माझे असे कसे
या शब्दातून कविच्या मनातील विचारांचं काहूर आणि ही कविता लिहिण्याची प्रेरणा देणारी, कविच्या अंतरंगातील भूतकाळातील संपूर्ण कहाणीच जणू, त्या चालीतून अशी काही अंगावर येते, कि खरोखरच अंग शहारतं. रसिकांच्या दुर्देवाने हे ही गीत ध्वनिमुद्रित होऊ शकलं नाही. आज जवळ जवळ २८ वर्ष झाली, ती सुरावट मनात अजूनही रुंजी घालते. त्या ध्वनिमुद्रित न झालेल्या सुरावटीचं गारूड मनाला कधी प्रफुल्लीत, तर कधी अस्वस्थ करतं.
खळेसाहेबांच्या असामान्यत्व दर्शवणारा अजून एक पैलू म्हणजे, सुगम संगीताच्या प्रत्येक प्रांतात मैलाचा दगड ठरतील अशी गाणी त्यांनी करून ठेवली. म्हणजे अभंग म्हणले कि लताबाईंचे तुकयाचे अभंग, भेटी लागी जीवा, हा ची नेम आता, कन्या सासुऱ्यासी, किंवा भीमसेनजींच्या बरोबरचे राम शाम गुणगान किंवा राजस सुकुमार असो, असे एकाहून एक सरस अभंग करावेत तर खळे साहेबांनीच. किलबिल किलबिल, कोणास ठाऊक कसा या सारखी बालगीतं असो किंवा कळीदार कपूरी पान ऐकलं कि वाटतं, लावणी करावी तर खळे साहेबांनीच. नाटयसंगीत म्हणलं तर उगवला चंद्र पुनवेचा, विकल मन आज अशी नाटयगीतं, शास्त्रीय संगीतातील बंदीश म्हणून वाखाणण्याजोगी. शांत रसातल्या गाण्यांवर त्यांचं प्रभुत्व आहे असं एकीकडे वाटतं, तर दुसरीकडे काळ देहासी आला, जेंव्हा तु़झ्या बटांना, प्रिया तुज काय यासारखी ताना, हरकती, खटके यांनी युक्त गाणी भुरळ पाडतात. नुसते गायनाचे वेगवेगळे प्रकारच त्यांनी हाताळले नाहीत तर वेगवेगळ्या गायकांची क्षमता, त्यांची वैशिष्ट्ये ओळखून त्या गायकाच्या गळ्याला खुलुन दिसतील अशी गाणी रचायचं त्यांचं कसब अनोखं होतं. वसंतरावंच्या गळ्याप्रमाणे बगळ्यांची माळ, राहिले ओठातल्या किंवा वेगवेगळी फुले उमलली, लाजून हासणे, हृदयनाथांकडून गाऊन अजरामर झाली. वीणाताई, शोभा गुर्टुंपासून देवकी पंडीतांपर्यंत गायकाच्या गळ्याचे गुणधर्म ओळखून त्या प्रत्येकासाठी स्वतंत्र रचना करणारे खळे साहेब ग्रेटच होते.
प्रत्यक्ष रेकॉर्डिंगच्या वेळी देखील खळेसाहेब त्यांच्या रचना मनाजोगत्या बसल्याशिवाय पुढे जात नसत. पंडीतजींच्याच अल्बमचं रेकॉर्डिंग कुलाब्याला वेस्टर्न आऊटडोअरच्या स्टुडिओत चालू होते. त्या दिवशी म्हणजे संध्याकाळी, रेकॉर्डिंगसाठी पंडीतजींची हीच सर्वात पसंतीची वेळ होती. संध्याकाळी सात वाजता वादक कलाकार हजर होत. साऊंड बॅलन्सिंग वगैरे होऊन आठ वाजता रिहर्सल व नंतर प्रत्यक्ष टेक म्हणजे ध्वनिमुद्रण सुरू होई. रात्री १:३०-२ नंतर पॅकअप व जेवण होऊन वादक कलाकार घरी जात. त्या दिवशी मात्र १-१:३० वाजेपर्यंत चारपैकी एकही टेक ओके होईना. पंडीतजींच्या आवाजात थोडी खर येत होती. जेवण झाल्यावर खळे साहेब पंडीतजींना रेकॉर्डिंगचा एक प्रयत्न करून पहायचा का अशी विनंती केली. आणि आश्चर्य म्हणजे पाहिल्याच झटक्यात टेक ओके झाला ! मग काय भराभर चारही अभंग रेकॉर्ड करून झाले, तेंव्हा पहाटेचे पाच वाजले होते ! आवाज छान लागलेला, तापलेला होता मग काय, खळे साहेबांना भीमसेनजी म्हणाले, उद्याचीही गाणी आजच घेऊन टाका ! पंडीतजींचा तो आवेश पाहून रेकॉर्डिस्ट दमन सूद चाट पडले. रोज फिल्मी गायकांबरोबर काम करण्याची सवय असल्यामुळे अर्ध्या तासातच दमणारे 'गवई' पहायची सवय असलेले दमन सूद पंडीतजींचा तो आवेश पाहून थक्क झाले. अशी कामावर प्रेम आणि निष्ठा असलेले हे दोन दिग्गज !
रेकॉर्डिंगच्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट वादकच हवे असत. माझ्यापुरते बोलायचे तर याच सुन भई साधोच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी तू रिहर्सल्स केल्या आहेस, त्यामुळे तुझाही यात सहभाग हवा, असे म्हणून खळे साहेबांनी सर्व दिग्गज वादकांच्या ताफ्यामध्ये लिंबूटिंबू म्हणून का होईना मला सामावून घेतले. आमच्या शेजारी पं.भवानीशंकर तबल्याच्या साथीला (होय भवानीशंकर अप्रतिम तबला वाजवतात), पखवाजावर पं अर्जुन शेजवळ ! व त्यांच्या बरोबर मी व प्रकाश शेजवळ टाळ वाजवायला ! ध्वनिमुद्रणाचे ते तीन दिवस व रिहर्सल्स् चे मंतरलेले दिवस आजही स्पष्ट आठवतात. त्यानंतरही असाच दैवी अनुभव भीमसेन-खळे यांच्या नवीन अभंगांच्या निमित्ताने पुन्हा अनुभवायला मिळाला. खळे साहेबांची ओळख दृढ झाली. त्यांचं माझ्या घरी अनेक वेळा येणं झालं. त्यांचे शुभाशिर्वाद लाभले याहून अधिक काय हवे.
सुमारे २८ - २९वर्षांपूर्वीच्या या रिहर्सल्स म्हणजे माझ्यासाठी मोठी मेजवानीच होती. खळे साहेबांच्या चाली व भीमसेनजींचा दैवी सूर जवळून ऐकणे हा अनुभव शब्दांच्या पलीकडला होता. भीमसेनजींच्या आवाजातील, स्वरातील अफाट ताकद, प्रत्यक्ष अनुभवताना खरोखरच त्या झोतात वाहून जातोय कि काय असे वाटे. खळेसाहेब आणि भीमसेनजी हे सूर तालाचं द्वैत मोठं देखणं होतं. या आपापल्या क्षेत्रात हिमालयाची उंची गाठलेल्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचा कलाविष्कार जवळून अनुभवायला मिळाला, त्यांचे सान्निध्य लाभले यापेक्षा अधिक श्रीमंत पूंजी मला नको आहे....
हेमकांत नावडीकर..




वाह, सुंदर लिहिले आहेस! 😊👌😊
ReplyDeleteमनापासून आभार 🙏🏻
Deleteवा अप्रतिम .. अगदी मनातलं.. खरं तर अंतरीच्या भावना शब्दात व्यक्त करणं महाकठीण वाटतं मला, पण तुम्हाला अगदी सहजतेने साध्य झालं आहे. 💐🙏🙏
Deleteफारच भाग्यवान आहेस तू.
Deleteधन्यवाद ..
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteVaa vaa. Faarach sundar lihalay.
ReplyDeleteमनापासून आभार 🙏🏻
Deleteहेमकांतजी
ReplyDeleteखळे अण्णांच्या सार्या आठवणींना जागृत केलेत तुम्ही.
धन्यवाद 🙏🏻
Deleteअ प्र ति म..
ReplyDeleteदृश्यमालिका उभी राहिली दिठीपुढं..
धन्यवाद 🙏🏻
Deleteअप्रतिम
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏻
DeleteExcellent written.
ReplyDeleteThanks 🙏🙏🙏
Deleteअप्रतिम,भावस्पर्शी
ReplyDeleteसुंदर लिहिले आहे....
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏻
Deleteअप्रतिम 👌
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏻
Delete