अद्वितीय पखवाजवादक : पं. अर्जुन शेजवळ
अद्वितीय पखवाजवादक - पं . अर्जुन शेजवळ
१९८२ च्या सुमारास आमच्या उमेदवारीच्या काळात तबला शिकायला मुंबईला शिकायला जात असू. त्यावेळी केवळ संगीत शिकण्यासाठी आम्ही मुंबईला जातो याचं अनेकांना अप्रूप वाटत असावं. कारण मुंबईला गेल्यावर रहाण्यासाठी मिळालेल्या अनेक घरांमध्ये हे घर तुझे आहे, केंव्हाही रात्री-अपरात्री घरी ये, असा प्रेमाश्रय अनेक घरांतून मला मिळाला. इतक्या लांबून येऊन कोणीतरी संगीत क्षेत्रात काही धडपड करतो आहे, याचं त्याकाळी अप्रूप व कौतुक होतं. आसऱ्यासाठी लाभलेल्या घरांमधील एक म्हणजे पं अर्जुन शेजवळ यांचं घर होतं. खरं तर त्यांचा आणि माझा तसा काहीच सबंध नव्हता. मी काही पखवाज वाजवत नव्हतो आणि त्यांच्याकडे शिकतही नव्हतो. त्यांचा मुलगा प्रकाश याचा मी मित्र एवढाच काय तो परिचय. पण त्या घराने मला सहज सामावून घेतले. त्यांच्या घरात मला कधीच परक्यासारखं वाटलं नाही. जसा त्यांचा मुलगा प्रकाश तसाच मी, असेच मला व त्यांनाही वाटे. अण्णा म्हणजे पं अर्जुन शेजवळ, नानी म्हणजे त्यांच्या पत्नी, मोठा मुलगा नितीन, प्रकाश व भावना असं हे कुटुंब. मस्जिद बंदर स्टेशनच्या रेल्वे प्लॅटफॉर्मला लागून असलेल्या भल्या मोठया किल्लेवजा चाळीतील दोन खोल्यांमध्ये आनंदाने रहात होतं. त्या चाळीत रस्त्याच्या बाजूने उंच उंच पायऱ्यांचे चार मजले चढून गेल्यावर, तेही पलीकडच्या विंगमधील अगदी कोपऱ्यात त्यांच्या खोल्या होत्या. एरवी, नुसते चार मजले चढले तरी पाहुण्यांना धाप लागे व पाच मिनिटे दम टाकल्याशिवाय बोलता येत नसे. मात्र अण्णा दोन हातात दोन पखवाज घेऊन तो किल्ला सहजपणे चढत. गुरुजींकडे शिकून झाल्यावर रिकाम्या वेळात काय करायचे, तर प्रकाशमुळे अण्णांच्या घरात सहज प्रवेश मिळाला. त्यांच्या घरात कधीच परकं वाटलं नाही ते घरातल्या सर्वांच्या प्रेमळ वागणुकीमुळेच. त्यांच्या घरात नवीन असताना एक दिवस रेडिओवर श्रावणात घननीळा हे गाणं लागलं होतं. हे गाणं सुरु होताच अण्णा म्हणाले, तू तबला वाजवतोस ना मग हे गाणे लक्षपूर्वक ऐक. ते गाणं ऐकायला लागल्यावर असं लक्षात आलं, कि जसा गाण्याच्या चालीचा डौल आहे, अगदी तशाच डौलाचा व प्रत्येक ओळीला, चालीच्या वळणदार झोलांच्याप्रमाणे फिरणारा रमाकांत म्हापसेकरांचा तो नजाकतदार ठेका ऐकून चकित झालो. पण अण्णांनी जाता जाता गाणं ऐकायचं कसं ते सहज शिकवलेलं पाहून अण्णांच्याबद्दलचाही आदर दुणावला.
ज्यावेळी त्यांच्या घरात माझा शिरकाव झाला, त्यावेळी अण्णांचं नाव कलाकारांमध्ये आदराने घ्यायला सुरवात झाली होती. अगदी सुरवातीला क्रॉफर्ड मार्केटमध्ये चहाच्या ठेल्यावर बसणारे अण्णा, तितक्याच सहजपणे पखवाज हातात घेऊन कार्यक्रम, रेकॉर्डिंगला जात असत. मग कधी अण्णांचे रेकॉर्डिंग असे, कधी आकाशवाणी, नाहीतर कुठे ना कुठे कार्यक्रम असेच. मग काय, त्यांच्याबरोबर प्रकाश तसा मी, त्यांच्याबरोबर जात असू. मग रात्री अपरात्री उशीर झाला कि पायधुनीला हातगाडीवरची पावभाजी ! आयुष्यातली पाहिली पावभाजी अण्णांबरोबर खाल्ली.
सुरवातीला हा कोण नवीन कलाकार रेकॉर्डिंगला आला आहे, असं म्हणणारे कलाकार, अण्णांचं वादन ऐकताच प्रेमात न पडते तरच नवल. त्यांच्या पखवाजाचा खुल्या व जोरकस थापेचा घनगंभीर आवाज, खरेच मनमोहक होता. आजकाल बरेच वेळा अनेक पखवाजवादक, संपूर्ण पंजाचा किंवा तळहाताचा वापर न करता, केवळ वेग दर्शवण्यासाठी, तबल्याप्रमाणे बोटांनी वाजवणारे वादक ऐकले कि वाईटच वाटतं. वाटतं कि यांनी अर्जुनरावांचे धीरगंभीर एका विशिष्ट लयीतच बहरणारे पखवाजवादन एकदातरी ऐकायला हवे. प्रत्येक वाद्याचा एक गुणधर्म, एक प्रकृती असते ती जपायला हवी. जसं चपळाई पहावी तर चित्त्याची आणि गजगती ती गजगतीच. चित्त्याने सावकाश पळू नये आणि हत्तीने स्प्रिंट मारू नये ! चौताल,धमार, शूलताल, झंपा, तेवरा ताल कोणताही असो, शृंगार, रेला, परण, चक्करदार मोठया दिमाखात वाजे. ऐकायला समोर आमच्यासारखा विद्यार्थीवर्ग असला तर त्याने टाळीवर ताल धरायलाच हवा असा त्यांचा आग्रह असे. जवळच्यांपैकी कोणी नुसताच बसला असला, तर वाजवतानाही मिस्किलपणे त्याला एखादा शाब्दिक चिमटा घेऊन ताल धरायला लावणार ! त्यांच्या वादनातला सर्वात सुंदर, मलाच काय सर्वांनाच आवडणारा भाग म्हणजे पढंत. दहा दहा मिनिटे सलग, इतकी सुंदर पढंत करत, कि त्या आनंदाचे वर्णन करायला, जे अवर्ण्य वाणिलागी, सुख असे ! असे म्हणणारे कविवर्य गडकरीच आठवतात. इतकं कशाला अर्जुनरावांची पढंतही एखादी जणू सुंदर कविता ऐकावी अशीच असे, यात मुळीच अतिशयोक्ती नाही.
16 फेब्रुवारी 1986 माझ्या घरच्या कार्यक्रमात..
आण्णांचे ठिकठिकाणी कार्यक्रम असत तिथे त्यांच्याबरोबर प्रकाश प्रमाणेच मलाही कित्येक वेळा जायला मिळाले याबद्दल स्वतःला खूप भाग्यवान समजतो. कारण मोठमोठ्या कलाकारांबरोबर ग्रीनरूममध्ये वावरायला मिळायचे, ते ही कलाकार जवळून अनुभवायला मिळत. पं. के जी गिंडे आणि भट यांची धृपद-धमारची जुगलबंदी आणि साथीला अण्णा, अशी मैफल जमली कि धमाल यायची. कारण गिंडे आणि भट दोघेही उत्तम तालिये त्यामुळे अशी लयीची कामगत व्हायची. गाणारे आणि समोर ऐकणारे सुद्धा बरेच वेळा हातावर ताल देऊनच ऐकत, त्यामुळे मैफलीची उंची आणि आनंद केवळ अवर्णनीय असे. अण्णा त्यांचे गुरू पं. नारायणराव कोळी व नानासाहेब पानसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक कार्यक्रम दरवर्षी करायचे. घराजवळच मस्जिद बंदर येथील रघुनाथमहाराज मंदीरात हा कार्यक्रम होत असे. आजही प्रकाशने ही परंपरा पुढे चालू ठेवली आहे. उदयोन्मुख कलाकारांपासून अनेक नामांकित गायक वादक कलाकार तिथे आपली सेवा रुजू करण्यात धन्यता मानत. भाई गायतोंडे, अरविंद मुळगांवकर, सुधीर संसारे, श्रीधर पाध्ये यांपासून योगेश सम्सीं पर्यंत तर तुळसीदास बोरकर, दिनकर कायकिणी बुवा, गिंडे-भट यांच्यापासून सुहास व्यास, आरती अंकलीकर हे आणि असे अनेक दिग्गज कलाकार नित्यनेमाने येत व आपली संगीत सेवा आनंदाने, प्रेमाने सादर करत. शेवटी अण्णांचे सोलो पखवाजवादन आणि गिंडे-भट यांची जुगलबंदी होऊन सर्व कार्यक्रम संपला कि पहाटे पहाटे नानींच्या हातचे कांदेपोहे व जोडीला दिग्गज कलाकारांच्या हास्यविनोदात कधी सकाळ होई पत्ता लागत नसे.
त्यांचा माझा काय ऋणानुबंध होता माहिती नाही. मोठमोठया कलाकारांबरोबर संगत करणारे व सोलो वादनातही आभाळाएवढी उंची गाठलेले हे थोर पखवाजवादक एके दिवशी मला म्हणाले, मला तुझ्या घरी वाजवायचंय. एवढंच नाही तरी घरी आले राहिले आणि मनसोक्त वाजवलं देखील !!! एवढया मोठया कलाकाराने माझ्यावर एवढं प्रेम करावं, खरंच शब्द नाहीत. आदल्या दिवशी रात्री राहिले होते माझ्याकडे, सकाळी उठून मला म्हणाले, अपरात्री एकदम दचकून जागा झालो. का काय झालं विचारताच म्हणाले, अरे काय ही शांतता !!! जवळजवळ सर्व आयुष्य व्ही टी लगत, मस्जिद स्टेशनला लागून असलेल्या, रेल्वेच्या बारा बारा ट्रॅक्सचा खडखडाट ऐकण्यात गेलेलं. नंतर त्यांचे कार्यक्रम वाढत गेले. पं. रविशंकरांपासून लता मंगेशकरांसारख्या कलाकारांकडून कार्यक्रम, रेकॉर्डिंगसाठी नियमित बोलावणी यायला लागली. चांगला शिष्यवर्ग, चाहता वर्ग तयार होत गेला. परदेश दौरे झाले. मस्जिदच्या चाळीतून मालाडला प्रशस्त फ्लॅटमध्ये स्थलांतर झालं. एकाचे दोन फ्लॅटस् झाले. ९२ साली अण्णा जर्मनीत होते, तिथे त्यांना त्रास होऊ लागला आणि निदान झाले ते कॅन्सरचे ! त्यानंतर त्यांना फार अवधी मिळाला नाही आठ नऊ माहिन्यातच २८ ऑक्टोबर १९९२ रोजी त्यांना देवाज्ञा झाली. ५८ हे काही जाण्याचे वय नव्हते. खरं तर हा त्यांच्या बहराचा, स्वास्थाचा काळ, त्यांना उपभोगायला मिळाला नाही व त्यांचे नादमधुर वादन ऐकायाला आपण मुकलो, हे आपले दुर्देव. प्रकाश त्यांच्या पखवाजवादनाचा वारसा समर्थपणे चालवतो आहे. नानी, नितिन, भावना आपल्या श्वशूरगृही आनंदात आहेत पण अचानक एखाद्या क्षणी त्यांची सुस्पष्ट, कवितेसारखी, एखाद्या मंत्रोच्चारासारखी पढंत तक्क धिकिटधागे तकधुमकिटतक धाकिटतकिटतका धाकिटधाsन धा स्पष्ट आठवते आणि अस्वस्थ व्हायला होतं...
हेमकांत नावडीकर


पं. अर्जुन शेजवळ यांचे सुंदर शब्दचित्र उभे केलेत .. धन्यवाद!
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteखूपच छान लिहिले आहेस. इतका निकटचा सहवास तुला लाभला हे भाग्यच. मलाही त्यांचा पखवाज खूपच भावला होता. छान.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteवरील भावना मी व्यक्त केल्या आहेत..धन धनं खरवंडीकर.
ReplyDeleteअप्रतिम. ������
ReplyDeleteधन्यवाद
Deleteवाचून खूप छान वाटलं. त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteव्वा क्या बात है..खुपच छान लिहिलंयस.लिहिण्याची कलाही आहे तुझ्यात.. असाच छान व्यक्त होत रहा.. शुभेच्छा
ReplyDeleteधन्यवाद
DeleteAprateem! wah kya bat hai!
ReplyDeleteधन्यवाद
DeleteAprateem! wah kya bat hai!
ReplyDeleteधन्यवाद
Deleteअप्रतिम
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteपखवाज म्हतजे अर्जुन शेजवळ एव्हढे च माहिती होतेऑ पण आज कळले माहिती बद्दल धन्यवाद !
ReplyDeleteमनःपूर्वक आभार 🙏🏻
Deleteखूप छान लेख....जुन्या आठवणी जाग्या झाल्या
ReplyDeleteमनःपूर्वक आभार 🙏🏻
Deleteसुंदर लेख!
ReplyDeleteमनापासून आभार 🙏🏻
ReplyDeleteमाझे व त्यांचे असेच प्रेम समब्ध होते. ते सोलापूरला कारकर्मासाठी आलेकी मला निरोप यायचा.पाखवजच्या भाषेचा नाद अतिशय गोड रित्या अर्जुनराव मांडायचे. जय..गुरू
ReplyDeleteवा,क्या बात है... खूप मोठा कलाकार आणि अतिशय साधे व्यक्तिमत्व ..
Deleteजय...गुरू
ReplyDeleteवा वा हेमंतदा अभिनंदन अशा अनेकअनेक महान अप्रकाशित महान कलाकारांचे शब्दचित्र सहजसुंदर शैलीत केलय.खरच फार मोठ्ठ काम करतोयस
ReplyDeleteमनापासून आभार 🙏🏻
Deleteमनापासून आभार 🙏🏻
ReplyDeleteपं. शेजवळ यांचे अप्रतिम शब्दचित्र आपण साकारले आहे. थोर कलावंत.
ReplyDeleteमनापासून आभार 🙏
Delete