रियाजाची मात्रा

रियाजाची मात्रा !!!



   रियाजाचे खूपच महत्व आहे. रियाज़ फ़ार महत्वाचा आहे. रियाजा शिवाय संगीत अशक्य आहे, हे आणि असे उपदेश कम डोस कम ढोस देणारी विधाने संगीत शिकायला लागलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला गुरुंकडून किंवा एखाद्या बजुर्गाकडून नेहमीच ऐकायला लागतात. रियाज केल्याने एखादी गोष्ट किंवा ज्या गोष्टीचा सराव करु ती झळाळून निघते असे म्हणतात. त्यातून प्रकाश, तेज दिसायला लागते वगैरे वगैरे.. खरंच रियाजाने असे होते का?  रियाज एवढा महत्वाचा आहे का?

  रियाज म्हणजे अभ्यास, सराव, प्रॅक्टीस, मेहनत, सातत्य, खर्डेघाशी, किंवा एकच गोष्ट खूप वेळ करणे. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा केल्यामुळे त्या गोष्टीवर आपण हळूहळू प्रभुत्व मिळवु शकतो एवढे तर सर्वांनाच माहिती आहे. तीच गोष्ट वारंवार केली कि ती आपण अधिक चांगल्या प्रकारे करु शकतो याही विषयी कोणाचे दुमत नाही. एखादे कोणी चित्र काढलेले असू दे, एखादे गणित सोडवणे असू दे, क्रिकेटच्या एखाद्या शॉटची पुनरावृती असू दे, गाण्यातली तान असू दे किंवा अंगमेहनत किंवा कोणतीही गोष्ट पुन्हा पुन्हा केली तर आपल्याला छान जमायला लागते. अगदी एखादे रांगणारे बाळसुद्धा पडते, धडपडते पण पुन्हा पुन्हा प्रयत्न करते आणि त्याला आपोआप उभे रहायला जमते, मग त्याच्या चेहऱ्यावर छान जमल्याचा आनंद दिसू लागतो. सगळ्या क्षेत्रात अगदी तसेच आहे. बॅटच्या मध्यभागी चेंडू लागल्यावर होणारा तो आवाज आणि सहजगत्या लांब गेल्यामुळे होणारा आनंद हे सरावामुळेच शक्य होते. संगीतातही अगदी तसेच आहे. गायकाने वादकाने एखाद्या तानेचा, पलट्यांचा, स्वरांच्या ठेहराव, लगावाचा सराव, रियाज करायला सुरवात केल्यावर त्या त्या क्रियेचे आजच्या भाषेत सरावाचे पॉईंटस जसे वाढत जातील तशी ती क्रिया अधिक चांगल्या प्रकारे करता येते. मग ती कला सादर करणाऱ्याला जसा त्याचा आनंद मिळतो तसाच आनंद त्या रियाजाच्या प्रभावामुळे ऐकणायाला पण जाणवू लागतो. 
पूर्वीच्या काळी खूप रियाज म्हणजे १६ ते १८ तास केलेले अनेक कलाकार व त्यांची त्यामुळेच आजही न गाठता येणारी उंची पाहून थक्क व्हायला होते. अर्थात तो काळ निराळा होता. नव्याने पेटवलेली मेणबत्ती विझेपर्यंत एकच बोल वाजवणे, उत्तरेतल्या थंडीतही उघड्या अंगाने घाम येईपर्यंत वादन करणे,  घड्याळ्याच्या काट्याकडे सहा सहा तास पहात रियाज करणे ही एक तपश्चर्याच आहे. शोकसभेत एक मिनिट स्तब्ध उभे रहाताना ते एक मिनिट तासासारखे वाटते. इथे स्वत:च्या मर्जीने घड्याळ्याचा न हलणारा काटा सहा सहा तास पहायचा म्हणजे एक अग्निदिव्यच असते. या ही पलिकडच्या, रियाजाच्या स्वत:लाच विसरायला लावणाऱ्या अवस्थेतून होणारा कलेचा तेज:पुंज आविष्कार अनुभवणे, हा एक अलौकिक आनंदच असतो. पूर्वी चिल्ला म्हणजे सतत चाळीस दिवसांचा रियाज आणि असे अनेक चिल्ले केलेले उस्ताद थिरकवॉं, उस्ताद अमीर हुसेन यांसारखे तबलिये आणि अनेक कलाकार होते. त्यांनी केलेल्या रियाजाच्या अत्युच्य पातळीमुळेच त्यांच्या कलेची उंची आपण गाठू शकत नाही याची जाणीव आजही अस्वस्थ करते. जगप्रसिद्ध चित्रकार व्हॅन गॉगला कोणी तरी विचारले कि तो अमुक अमुक चित्रकार कसा आहे त्यावर ते उत्तरले कि अरे तो तर रविवारचा चित्रकार आहे ! म्हणजे फ़क्त रविवारी चित्र काढून अशी किती उंची गाठणार? तेंव्हा आपल्याला किती उंचीवर जायचे त्याप्रमाणे कलाकाराने रियाज करायला हवा किंवा याउलट आपण जेवढा करु तेवढीच उंची आपण गाठु शकतो. अधिक रियाज म्हणजे अधिक उंची !!! इतके हे सोपे गणित आहे.
थोडक्यात कलेच्या आविष्काराची उंची गाठायचा रियाज ही एक शिडीच आहे असे म्हणाना.    

हेमकांत नावडीकर

Comments

  1. अप्रतिम!! लेख आवडला. खुप वाचला गेला पाहिजे. धन्यवाद हेमकांत आणि अभिनंदन

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद ...

      Delete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. फार नेमके शब्द वापरून महत्त्व विशद केले आहे. अप्रतिम! !

    ReplyDelete
  4. वा हेमकांत दादा अतिशय योग्य शब्द रचना आणि आत्ताच्या काळातील समर्पक उदाहरण याची उत्तम जोड आहे या लेखात.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद ..

      Delete
  5. खूप छान हेमकात

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान ...

मार्दवपूर्ण गाण्यांचे माळपदक : माणिक वर्मा

कुमार नावाची चिरतरुण मैफल