अद्वितीय तबलावादक :- पं. लालजी गोखले
अद्वितीय तबलावादक पं. लालजी गोखले
**********************************
सुप्रसिद्ध तबलावादक पं. लालजी गोखले यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. या निमित्त दि. २७ जानेवारी ला शामराव कलमाडी प्रशाळेत विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांचे शिष्योत्तम श्री दत्ता भावे यांचे तबलावादन, श्रीमती सोनाली चक्रवर्ती यांचे कथक नृत्य व पं केदार बोडस यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते व पं लालजी गोखले यांचे पुतणे श्री विक्रम गोखले यांची विशेष उपस्तिथी या कार्यक्रमासाठी असणार आहे.
मागील पिढीतील संगीत प्रेमींना पं लालजी यांची योग्यता व त्यांचे सांगीतिक योगदान या विषयी नव्याने सांगण्याची गरज नाही पण आत्ताच्या पिढीला त्यांची ओळख करून देणे व त्या निमित्ताने त्यांचे स्मरण करणे आवश्यक आहे असे वाटते. पं लालजींचा जन्म १६ जानेवारी १९१९ चा. त्याचे वडील रघुनाथराव व मातोश्री कमलाबाई दोघेही नाट्य-चित्रसृष्टीशी निगडीत. बाबुराव पेंटर निर्मित मुरलीवाला चित्रपटात त्यांनी कृष्णाची भूमिकाही केली. त्याकाळातील पहिले कृष्ण म्हणून त्यांचा राजकमल स्टुडीओत सत्कार करून व्ही शांताराम पुरस्कारही देण्यात आला होता. तरी चित्रपट सृष्टीत त्यांचे मन रमले नाही. लहान पणापासूनच त्यांचा तबल्याकडे ओढा होता. पं भास्कराव चौगुले यांच्या कडे त्यांनी सुरुवातीचे धडे गिरवले. पण एकदा त्यांनी उ. अहमदजान थिरकवा यांचे वादन ऐकले आणि तबला शिकायचा तर यांच्याकडेच, असे त्यांच्या मनाने घेतले. इतकेच नव्हे तर त्यांचे खांसाहेबांकडे रीतसर शिक्षण सुरु झाले व १९३७ साली पं लालजी यांनी तबल्यातील गौरीशंकर उ. अहमदजान थिरकवा यांचा गंडा बांधला. खांसाहेबांकडे रीतसर शिक्षण चालू असताना योगायोगाने त्यांची दिल्ली येथे आकाशवाणीची नोकरी चालू झाली. दिल्लीत स्थायिक झाल्यावर खां साहेबांकडे त्यांची तालीम सुरु होतीच, पण तेथे आकाशवाणीवर असलेले बुजुर्ग पंजाब घराण्याचे उ. मलंग खां, उ. करीम बक्ष पेरणा आणि अजराडा घराण्याचे उ. हबीबुद्दीन खां अशा दिग्गजांचा सहवास मिळाला व त्यातून त्यांची विद्या समृद्ध होत गेली. हळूहळू आकाशवाणीवर लालजींची साथसंगत कलाकारांना आवडू लागली व ते कलाकारांचे 'लाला गोखले' झाले. आकाशवाणीच्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये त्यांनी अक्षरशः शेकडो कलाकारांना साथ केली. पं कुमारजींपासून उ. अमीरखां साहेबांपर्यंत हिंदुस्थानातील जवळजवळ सर्व दिग्गज गायक वादकांच्या साथी केल्या. भारतभर त्यांच्या बरोबर दौरेही केले. पं कुमारजी, कुमार गंधर्व म्हणून ओळखले गेले, त्या सुरुवातीच्या काळातील जवळजवळ सर्वच कार्यक्रम लालजींना वाजवले. मध्यंतरी काही कारणाने खंड पडला पण अखेरीस पुनः त्यांचे सूर जुळले व अखेरच्या मैफिली लालजींनी वाजवल्या. निवृत्ती नंतर पुण्यात आपली कन्या आशाताई व जावई मधुभाऊ जोशी यांचेकडे ते रहात असत. त्यानंतर त्यांनी विद्यादानास सुरुवात केली. अवधूत मिराशी, संजय फगरे, दत्ता भावे, संजय दाबके अशी मंडळी शिकायला लागली.
अनेक महान कलाकार, संगतकार यांच्या आणि लालजींच्या चरित्रात वेगळे काय असे कदाचित कोणाला वाटेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पं लालजी गोखले ज्यांच्याकडे तबला वादन शिकले ती काही साधी सुधी असामी नव्हती तर ते होते, तबला वादनातले सर्वोच्च शिखर गाठलेले उ. अहमदजान थिरकवा. अविश्रांत सोळा तासांच्या रियाजानंतर झोपेतही फक्त तबला हाच त्यांचा श्वास होता. अशा महान तबलावादकाला इतक्या जवळून पाहताना, वाजवताना, ऐकताना पं लालाजीच काय कोणीही, खांसाहेबांच्या वादनाच्या मोहात न पडल्यासच नवल. खांसाहेबांची ती अफाट उंची पाहून पं लालजींना खांसाहेबांच्या पलीकडे काहीही न दिसणे सहज शक्य होते. वाजवावं तर फक्त खांसाहेबांसारखंच अशीच त्यांची यथोचित धारणा होती. त्यामुळेच त्यांची गुरुभक्तीहि अनन्यसाधारण होती. पं लालजींनी साथसंगत भरपूर केली पण त्यांचे स्वतंत्र तबला वादनाचे कार्यक्रम त्यामानाने खुपच कमी झाले. आत्यंतिक गुरुभक्तीमुळे खांसाहेबांची उंची गाठणे शक्य नाही असे वाटल्यामुळे स्वतंत्र वादन करण्याचे धारिष्ट्य कसे दाखवायचे, अशी या निष्ठावान शिष्याची धारणा निरुउत्तर करणारी होती. आजच्या व्यवहारिक आणि व्यावसायिक जगात त्यांच्या या धारणा, मूल्ये कदाचित चुकीची किंवा विसंगत वाटतील. शिष्यांना ते नेहमी सांगत, निसर्गतः तबल्यातून जो आवाज येईल तोच खरा, मुद्दामून जोर लावण्याची गरज नाही. दाबून डग्गा वाजवायचा नाही, डग्ग्याचा गळा आवळू नका, त्याला बोलते करा असे ते सांगत. तबल्यातील अक्षरांचा निकास गुरु सांगतील तसाच यावयास हवा तरच ते बोल परिणाम करतात. तबल्यातील काही विशिष्ठ अक्षरे घिडनग, तिरकीट किंवा अश्यांसारखी अक्षरे, जसे रागानुरूप स्वरांचे लगाव बदलतात, त्याचप्रमाणे प्रत्येक बोलांमध्येसुद्धा ही अक्षरे वेगवेगळ्या पद्धतीने व वेगवेगळ्या बोटांनी लागतात. त्यामुळे त्यांचे उमटणारे नाद व नादवैविध्य जपले गेले पाहिजे, तरच ते बोल हुबेहूब वाजतील व श्रोत्यांना आनंद देतील असे ते सांगत. तबल्यातील साहित्य, त्यातील काव्य, एकसुरी राहून कसे चालेल ? आसदार वाद्य म्हणजे आसदार ठेका नाही तर, तबला डग्ग्याच्या सुयोग्य आघाताच्या समतोलातून आसदार नाद तयार होतो, हे त्यांच्या ठेक्यातून स्पष्टपणे दृगोचर होत असे.
पं लालजी म्हणजे गुरुभक्तीचे आदर्शच म्हणायला हवेत. जन्मभर खांसाहेबांची मनोभावे सेवा तर त्यांनी केलीच, पण खांसाहेबांच्या निधनानंतर, एकदा खांसाहेब त्यांच्या स्वप्नात आले व त्यांना काही होत असल्याचे भासले. लालजी थेट लखनौला गेले, पाहतात तर खांसाहेबांची कबर एका बाजूने उद्ध्वस्त झाली होती. ती त्यांनी व्यवस्थित बांधून तर घेतलीच, पण खांसाहेबांच्या दोन अविवाहित कन्यांना आपल्या निवृत्ती वेतनातील ठराविक भाग अखेर पर्यत त्यांना पाठवत राहिले.
पं लालजींसारख्या श्रेष्ठ गुरुकडून कान उपटून घेऊनही राग न येत जेंव्हा आपल्यातल्या न्यूनतेची जाणीव होत राहते, तेव्हां तो शिष्य योग्य वाटेवर आहे हे निश्चित.
पं लालजींची असीम गुरुभक्ती, वादनातील कडक शिस्त, अचूकतेचा ध्यास व हवातसा नाद शिष्याकडून न निघाल्यावर कमालीचे रागवणारे लालजी शिष्यांवर तितकेच प्रेमही करत. शिष्यांना जेवूखावू घालण्यापासून प्रसंगी आजारामध्ये शिष्याचे पाय चोळून देणारे लालजी हे अद्वितीय व्यक्तीमत्व होते.
त्यांना सविनय सादर प्रणाम......
हेमकांत नावडीकर

सुंदर आलेख. सादर प्रणाम
ReplyDeleteधन्यवाद🙏🏻
Delete