मार्दवपूर्ण गाण्यांचे माळपदक : माणिक वर्मा
मार्दवपूर्ण गाण्यांचे माळपदक : माणिक वर्मा स्व पद्मश्री माणिक वर्मा यांची गाणी मला फार आवडतात असं जर मी म्हणलं तर त्यात विशेष आणि वेगळं असं काय आहे. कारण माणिकताईंची गाणी मलाच काय सर्वांनाच तितकीच आवडतात. कोणत्याही प्रसंगी एखाद्या बेसावध क्षणी असो किंवा प्रवासात गाडीमध्ये आवर्जून लावलेली असो. माणिकताईंच्या आवाजातले गाणे सुरू झाले, त्यांचा आवाज ऐकला की आपोआप सर्व विसरून त्या गाण्यांमध्ये कधी मुग्ध होऊन जातो खरंच समजत नाही. आज माणिकताईंचा जन्मदिन. त्यांच्यावर आजवर पुलं पासून अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ दिग्गज मंडळींनी लिहिले आहे. पण जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्या गाण्यातून मिळालेल्या आनंदातून थोडं उतराई व्हायचा प्रयत्न करून पहावा म्हणून हे शब्दांचे माळपदक. सुगम संगीत गाणाऱ्यांचा एक विशिष्ट प्रकारचा आवाज असावा लागतो असा एक सार्वत्रिक समज किंवा गैरसमज आहे असं अनेक वेळा जाणवतं. हे कदाचित थोडं विवादास्पद वाटेल पण माणिकताईंचा आवाज ऐकला की मात्र हे विधान खटकणार नाही. कारण माणिकताईंच्या आवाजात असलेले वेगळेपण. सुगम संगीतासाठी जसा आवाज लागतो तसा त्यांचा आवाज नक्कीच नव्हता....