गुरुत्वाकर्षक तालयोगी : पं सुरेश तळवलकर
गुरुत्वाकर्षक तालयोगी : पं सुरेश तळवलकर १९७५-७६ साली पुण्याच्या नूमवि प्रशालेत विख्यात गिटारवादक पं ब्रिजभूषण काबरा यांच्या साथीला तालयोगी पं सुरेश तळवलकर यांना प्रथम ऐकल्याचे स्मरते. त्यांना ऐकतो आहे त्याला आज जवळजवळ पन्नास वर्ष होतील. त्यावेळी तबल्याच्या विद्यार्थीदशेत असूनही, त्यांचे मंचावर असलेले चैतन्यपूर्ण अस्तित्व व त्यांचे वादन काही वेगळे होते हे, आजही चांगलेच लक्षात आहे. नुकताच त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त झालेला सत्कार सोहळा पाहिला आणि गेल्या सुमारे पन्नास वर्षात एका संगीतप्रेमी, तबल्याचा विद्यार्थी किंवा श्रोत्याच्या भावनेतून केलेल्या श्रवणभक्तीबद्दल आलेले कृतज्ञ विचार कुठेतरी व्यक्त करावेसे वाटले. त्यानंतर सुरेशजींना अनेकवेळा अनेक वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कारणाने भेटलेलो आहे. कधी श्रोता म्हणून, कधी तबल्याचा विद्यार्थी, तर कधी तबल्याच्या वाद्याच्या बनावटी संदर्भात, तर कधी आणखी काही कारणाने. पण प्रत्येक वेळी त्यांच्यातली गुरु ही भावना किंवा आपण विद्यार्थी असल्याची भावना ठळकपणे समोर येत राहिली आहे. किंबहुना संगीतावर प्रेम असलेली कोणतीही व्यक्ती त्...