नवरत्नहार
नवरत्नहार हल्ली गायक वादकांचे कार्यक्रम ठरवणे खूप सोपे झाले आहे. कार्यक्रमाचे ठिकाण, ध्वनिसंयोजक, वृत्तपत्रातील जाहिरात, कलाकार, त्यांच्या तारखा ठरवणे इतक्या सगळया गोष्टी आता अजिबात अवघड राहिल्या नाहीत. फेसबुक, व्हॉट्स अॅप आणि एकूणच मोबाइल क्रांतीमुळे तर सर्व हाताच्या बोटावर आले आहे. आजच्या पिढीला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण पूर्वी कलाकारांचे पत्ते मिळवणे, त्यांच्यापर्यंत पोहोचणे, त्यांच्याशी पत्रव्यवहार करणे सगळेच अवघड होते. त्या काळी कलाकार, रसिक, संयोजक या तीनही वेगवेगळ्या संस्था होत्या. हे तीनही जण एकमेकांत ढवळाढवळ करत नसत. म्हणजे त्याची कोणाला आवश्यकताही वाटत नव्हती. संयोजकाने कलाकारांशी संवाद साधून कार्यक्रम ठरवायचा. कार्यक्रम कोठे करायचा, केंव्हा करायचा हे ही त्या संयोजकानेच ठरवायचे. कलाकाराने ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी येउन आपली कला सादर करायची आणि कार्यक्रम जाहीर झाल्यावर रसिकांनी उपस्थित राहून संगीताचा आस्वाद घ्यायचा. असे एखाद्या कार्यक्रमाचे साधे सरळ गणित होते. एवढेच नव्हे तर कलाकाराने थेट संयोजकांना कार्यक्रम आयोजित करायला सांगणे हे कला...