अद्वितीय पखवाजवादक : पं. अर्जुन शेजवळ
अद्वितीय पखवाजवादक - पं . अर्जुन शेजवळ १९८२ च्या सुमारास आमच्या उमेदवारीच्या काळात तबला शिकायला मुंबईला शिकायला जात असू. त्यावेळी केवळ संगीत शिकण्यासाठी आम्ही मुंबईला जातो याचं अनेकांना अप्रूप वाटत असावं. कारण मुंबईला गेल्यावर रहाण्यासाठी मिळालेल्या अनेक घरांमध्ये हे घर तुझे आहे, केंव्हाही रात्री-अपरात्री घरी ये, असा प्रेमाश्रय अनेक घरांतून मला मिळाला. इतक्या लांबून येऊन कोणीतरी संगीत क्षेत्रात काही धडपड करतो आहे, याचं त्याकाळी अप्रूप व कौतुक होतं. आसऱ्यासाठी लाभलेल्या घरांमधील एक म्हणजे पं अर्जुन शेजवळ यांचं घर होतं. खरं तर त्यांचा आणि माझा तसा काहीच सबंध नव्हता. मी काही पखवाज वाजवत नव्हतो आणि त्यांच्याकडे शिकतही नव्हतो. त्यांचा मुलगा प्रकाश याचा मी मित्र एवढाच काय तो परिचय. पण त्या घराने मला सहज सामावून घेतले. त्यांच्या घरात मला कधीच परक्यासारखं वाटलं नाही. जसा त्यांचा मुलगा प्रकाश तसाच मी, असेच मला व त्यांनाही वाटे. अण्णा म्हणजे पं अर्जुन शेजवळ, नानी म्हणजे त्यांच्या पत्नी, मोठा मुलगा नितीन, प्रकाश व भावना असं हे कुटुंब. मस्जिद बंदर स्टेशनच्या रेल्व...